‘पेंटेगॉन पेपर्स’ आणि डॅनियल एल्सबर्ग

23 Jun 2023 20:55:37
The Life and Courage of Daniel Ellsberg

डॅनियल एल्सबर्गने अमेरिकन युद्धखात्याने म्हणजेच पेंटेगॉनने ‘आण्विक युद्ध कार्यक्रम’ या विषयावर बनवलेल्या मजकुराची तब्बल सात हजार पाने ’न्यूयॉर्क टाईम्स’च्या स्वाधीन केली. दि. १३ जून, १९७१ या दिवशी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने या ’पेंटेगॉन पेपर्स’वर आधारित पहिला लेख प्रसिद्ध केला आणि अमेरिका हादरली.

अणुसिद्धांताचा शोध लावणारा महान शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन हा मूळचा ज्यू होता. त्या अणुसिद्धांताचा प्रत्यक्षात वापर करून अणुबॉम्ब बनवणारा आणि अमेरिकेला अण्वस्त्रसज्ज देश बनवणारा वैज्ञानिक ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर हादेखील ज्यू होता. हे दोघेही मूळचे जर्मन ज्यू होते. डॅनियल एल्सबर्ग हा अमेरिकन ज्यू होता. त्याचा जन्म १९३१ सालचा. १९७१ साली ’पेंटगॉन पेपर्स’ प्रसिद्ध करून त्याने अमेरिकेच्या अण्वस्त्र हव्यासाविरूद्ध आवाज उठवला. परवा दि. १६ जून रोजी वयाच्या ९२व्या वर्षी तो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात केन्सिंग्टन इथे राहत्या घरीच मरण पावला. म्हणजे गेली ५२ वर्षं तो सतत अमेरिकेचा अण्वस्त्रांचा, नवनवीन शस्त्रास्त्रांचा हव्यास, युद्धखोरपणा या हव्यासापायी शस्त्रास्त्रांच्या संशोधन, विकासावर खर्च होणारा जनतेचा अफाट पैसा आणि त्यातून शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांना होणारा अमर्याद नफा यांविरूद्ध सतत आवाज उठवत होता.

डॅनियल एल्सबर्गच्या कार्याचं महत्त्व नेमकं ध्यानात येण्यासाठी आपल्याला एकप्रकारे संपूर्ण विसाव्या शतकातल्या राजकीय घडामोडींचा मागोवा घ्यायला हवा. इंग्लंड, फ्रान्स, इटली, रशिया, हॉलंड इत्यादी शेजारी युरोपीय राष्ट्रांचं जगभर पसरलेलं साम्राज्य पाहून प्रशिया या देशाची महत्त्वाकांक्षा पालवली. प्रशिया आणि अनेक जर्मन भाषिक संस्थानांना एकत्र आणून ऑटो फॉन बिस्मार्क या महान मुत्सद्याने १८७० साली जर्मनी हा एक नवाच देश निर्माण केला. या नव्या देशाचे वाढते सामर्थ्य इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली सर्वांच्याच डोळ्यांत सलू लागलं. त्यांनी जर्मनीला मोडून काढण्याचा निर्धार केला. या निर्धाराचं फलित म्हणजेच १९१४ साली सुरू झालेलं महायुद्ध. १९१४ ते १९१८ या कालखंडात झालेल्या महायुद्धानंतर पहिलं महायुद्ध म्हणू लागले.
इंग्लंड, फ्रान्स जर्मनीचा मोड करायला गेले, पण घडलं वेगळंच. या महायुद्धाने दोन महाराक्षस जन्माला घातले.

पहिला स्टॅलिन आणि दुसरा हिटलर. पहिल्या महायुद्धातल्या जर्मनीच्या पराभवाचा सूड उगवायचा, इंग्लंड आणि फ्रान्स यांची साम्राज्य नष्ट करून ती आपल्या अंमलाखाली आणायची किंवा जपान, इटली या आपल्या मित्रदेशांमध्ये वाटून टाकायची; त्याचवेळी रशियावर आक्रमण करून तिथल्या साम्यवादी राज्यव्यवस्थेचाही पूर्ण निकाल लावायचा, असे हिटलरचे विविध हेतू होते. एकाचवेळी अनेक शत्रूंशी भिडण्याचे हिटलरचे हे मनोरथ खरं म्हणजे युद्धशास्त्रांच्या नियमाविरूद्ध होते. पण, ते फक्त मनोरथ नव्हते. ते अंमलात आणण्यासाठी हिटलरने केलेली राजकीय आणि सैनिकी तयारी खरोखरच महाभयंकर होती. पहिल्या महायुद्धात एक सामान्य कॉर्पोरेल असणार्‍या अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या कर्तबगारीचा हा झपाटा असामान्य होता. हिटलरने पेटवलेलं महायुद्ध फक्त युरोपपुरतं मर्यादित न राहता जगभर लढलं गेलं. १९३९ ते १९४५ अशी तब्बल सहा वर्षं जगाला होरपळून काढणार्‍या या युद्धाला म्हणतात दुसरं महायुद्ध.

या महायुद्धाचं फलित पुन्हा वेगळंच घडलं, हिटलरसह जर्मनीचा तर निकाल लागलाच; पण इटली, जपान, फ्रान्स आणि इंग्लंड यांचाही निकाल लागला आणि जगाच्या सत्तेच्या सारीपाटाच्या पटावर दोन नव्याच महाशक्ती एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या - अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. अमेरिकेला युद्धाची प्रत्यक्ष झळ लागली नव्हती. आईनस्टाईन आणि ओपेनहायमर या दोन्ही मूळच्या जर्मन ज्यू शाखांच्या मदतीने अमेरिकेने अणुबॉम्ब बनवला आणि तो जपानवर वापरून महायुद्ध संपवलं. या महायुद्धाच्यानिमित्ताने अमेरिकन शास्त्रज्ञांनी अनेक नव्या प्रकारचे रणगाडे, विमानं, पाणबुड्या, क्षेपणास्त्र बनवली आणि वापरलीसुद्धा. गंमत म्हणजे, ही सगळी शस्त्रास्त्र आणि इतर युद्धोपयोगी वस्तू अमेरिकेने अगदी मुबलक प्रमाणात रशियाला पुरवल्या होत्या. कारण, त्यावेळी तो मित्रदेश होता. रशियाचं युद्धातलं नुकसान अफाट होतं. प्रचंड मनुष्यबळ आणि साधनसामग्री जर्मनीचा प्रतिकार करताना नष्ट झाली होती. स्टॅलिनच्या लबाडपणाचं कौतुक असं की, अमेरिकेने दिलेली मदत त्याने आपला जणू हक्कच असल्याच्या थाटात स्वीकारली. अमेरिकेने न दिलेलं अणुबाम्बचं गुपित त्याने आपल्या हेरांकरवी चोरलं, म्हणजे आता राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवरची अमेरिका आणि सर्वेसर्वा स्टॅलिनचा सोव्हिएत रशिया तुल्यबळ झाले.
 
इकडे इंग्लंडने गपगुमान भारतावरचं राज्य काढून घेतलं. पण, फ्रान्स आग्नेय आशियामधल्या इंडो-चायनावरचं स्वामित्वं सोडायला कबूल होईना. इंडो-चायना म्हणजेच आजचा व्हिएतनाम हा देश. फ्रेंचांनी व्हिएतनामचे तीन भाग पाडले होते - कोचीन चायना, अनाम आणि टाँकिन. महायुद्धात जपानने त्यावर ताबा मिळवला. पण, १९४५ साली महायुद्ध संपल्यावर तिथे पुन्हा फ्रेंच सत्ता आली. त्याचवेळी हो-ची-मीन्ह या स्थानिक साम्यवादी नेत्याने जलदगतीने उत्तर व्हिएतनामवर ताबा मिळवला. यातून १९४६ साली साम्यवादी सेना आणि फ्रेंच सेना यांच्यात लढाई जुंपली. लगेच सोव्हिएत रशियाने हो-ची-मीन्हची बाजू घेतली, तर अमेरिकेने फ्रेंचांची बाजू घेतली. १९५४ सालापर्यंत युद्ध चालून अखेर फ्रेंचांचा पराभव झाला. व्हिएतनामची रीतसर फाळणी होऊन उत्तर व्हिएतनाममध्ये साम्यवादी शासन, तर दक्षिण व्हिएतनाममध्ये लोकशाही शासन सुरू झालं.

पण, अमेरिकेला हा आपला पराभव वाटला. यातून हळूहळू संपूर्ण आग्नेय आशिया साम्यवाद्यांच्या ताब्यात जाणार, अशी भीती अमेरिकेला वाटू लागली. मग अमेरिकेने दक्षिण व्हिएतनामी राजवटीला शस्त्रास्त्रं आणि इतर साधनसामग्री पुरवण्याबरोबरच प्रत्यक्ष सैन्य उतरावायला सुरुवात केली. अत्यंत आधुनिक शस्त्रं आणि विमानांनीशी सुसज्ज अशा या अमेरिकन सैन्याने उत्तर, दक्षिण आणि मध्य व्हिएतनाममध्ये सर्वत्र जोरदार लष्करी कारवाया आणि विमानांद्वारे तुफान बॉम्बफेक सुरू केली. युद्ध थांबण्याऐवजी अधिकच भडकत गेलं आणि जगाने आश्चर्याने तोंडात बोट घातलं. उत्तर व्हिएतनामी साम्यवादी सैनिकांना सोव्हिएत रशिया आणि चीन शस्त्रास्त्रं जरूर पुरवत होते. पण, लढायला त्यांचे तेच होते.

उलट दक्षिण व्हिएतनामी सैनिकांपेक्षा त्यांची लढाई अमेरिकन सैनिकच लढत होते आणि अत्याधुनिक, अतिप्रशिक्षित अमेरिकन सैनिक अर्धप्रशिक्षित व्हिएतनामी सैनिकांसमोर मार खात होते. आयसेनहॉवर, जॉन केनेडी, लिंडन जॉन्सन अशा तीन-तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दी संपल्या, तरी व्हिएतनाम युद्धात अमेरिकेला विजयाच्या आशेचा किरणही दिसेना आणि दर वर्षाला शेकडो अमेरिकन सैनिक मरतायत, निकामी होतायत, लक्षावधी डॉलर्सच्या युद्धसाहित्याचा चुराडा होतोय. हे पाहिल्यावर १९६९ साली राष्ट्राध्यक्ष पदावर आलेला रिचर्ड निक्सन भडकला. अणुबॉम्बचा वापर करून व्हिएतनाम युद्धाचा कायमचा निकाल लावून टाकण्याकडे त्याच्या मनाचा कल झुकू लागला.

आपल्याकडे कायदे करण्याचं काम आमदार-खासदार करतात आणि सत्ता प्रत्यक्ष राबवण्याचं काम आय. ए. एस. अधिकारी करतात. अमेरिकेत वेगळी पद्धत आहे. हार्वर्ड, स्टॅनफर्ड, मॅसेच्युसेटस्, कोलंबिया, कार्नेजी अशा एकाहून एक प्रख्यात विद्यापीठांमधल्या चुणचुणीत विद्यार्थ्यांवर राजकारणी नेते आणि प्रशासक लक्ष ठेवून असतात. चमकदार विद्यार्थ्यांना भेट उचललं जातं. गरज वाटल्यास आणखी प्रशिक्षित करण्यासाठी केंद्रीय किंवा ऑक्सफर्डला पाठवलं जातं. मग हळूहळू त्याला प्रशासनातली विविध कामं सोपवून तयार केलं जातं. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा राष्ट्राध्यक्ष असला तरी या तरबेज प्रशासकीय चौकटीच्या फार बाहेर तो जाऊ शकत नाही.

शिवाय तिथे अनेक संशोधन संस्था सतत विविध क्षेत्रांमध्ये संशोधन आणि सर्वेक्षण करीत असतात. या संशोधनाचा मुख्य हेतू जगभरचे विविध प्रवाह अजमावणं, हेरणं आणि त्या प्रवाहांना एकतर अमेरिकेला अनुकूल असं वळण देणं किंवा त्यांचा अमेरिकेला कसा फायदा होईल, हे पाहाणं किंवा त्यांच्यापासून अमेरिकेला काही धोका उद्भवणार असेल, प्रशासनाला सावध करणं, असा असतो. अशी एक नामवंत संस्था म्हणजे कॅलिफोर्नियातील सांता मोनिका शहर स्थित ’रँड कॉर्पोरेशन.‘ रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट - आर अ‍ॅण्ड डी-याचं लघुरूप म्हणजे ‘रँड.’ थोडक्यात, जगभर प्रत्येक देशात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काय नवीन चालू आहे, यावर लक्ष ठेवणारी, म्हणजेच उघड-उघड हेरगिरी करणारी ही संस्था आहे.

डॅनियल एल्सबर्ग हा ‘रँड कॉर्पोरेशन’मध्ये संशोधन करणारा अतिशय उच्चशिक्षित असा अर्थतज्ज्ञ आणि लष्करी तज्ज्ञ होता. जगभरच्या म्हणजे मुख्यत: अमेरिका, रशिया आणि अन्य अण्वस्त्रसज्ज देश यांच्या आण्विक संशोधनाचा सतत आढावा घेत राहणं, हेच त्याचं काम होतं. १९४५ साली महायुद्ध संपल्यापासून पुढे दरवर्षी सोव्हिएत गट आणि अमेरिकन नेतृत्वाखालचा ’नाटो’ गट आपापली अण्वस्त्र सतत वाढवीतच होते. दरवर्षी नव्या-नव्या ठिकाणी दोन्ही पक्ष आंतरखंडीय बॅलेस्टिक प्रक्षेपणास्त्र, आण्विक पाणबुड्या नव्याने तैनात करीतच होते. यासाठी अमेरिकन जनतेचा अमाप पैसा खर्ची पडत होता. त्यातून ‘बोईंग’, ‘लॉकहीड’ वगैरे युद्ध साहित्य बनवणार्‍या कंपन्या आणखी गबर होत होत्या. हे सगळं अभ्यासताना एल्सबर्ग अधिकाधिक अस्वस्थ होत होता. त्यावर निक्सन कदाचित व्हिएतनाममध्ये अणुबॉम्ब वापरणार ही शक्यता उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली.

डॅनियल एल्सबर्गने अमेरिकन युद्धखात्याने म्हणजेच पेंटेगॉनने ‘आण्विक युद्ध कार्यक्रम’ या विषयावर बनवलेल्या मजकुराची तब्बल सात हजार पाने ’न्यूयॉर्क टाईम्स’च्या स्वाधीन केली. दि. १३ जून, १९७१ या दिवशी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने या ’पेंटेगॉन पेपर्स’वर आधारित पहिला लेख प्रसिद्ध केला आणि अमेरिका हादरली. आपले राजकीय नेते, मंत्री, अध्यक्ष यांनी आपली फसवणूक करून व्हिएतनाम युद्ध आणि शीतयुद्ध यांचा सामना करण्यासाठी भरघोस रकमा मंजूर करवून घेतल्या, हे सत्य सर्वसामान्य जनतेला कळलं. हे डॅनियल एल्सबर्गचं कर्तृत्व!

Powered By Sangraha 9.0