पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवार दिनांक २४ जून रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यास राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्याचे उद्योग मंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड- अलिबाग, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम २४ जून रोजी सकाळी ०९ वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'मोदी @९' कार्यक्रमांतर्गत पनवेल विधानसभा भाजपच्यावतीने शनिवार दि. २४ जून रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी संमेलन होणार आहे.
तसेच, तक्का येथील श्री. संत सावतामाळी सभागृहात होणाऱ्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
'मोदी @९' कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी 'विकास तिर्थ', डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे 'प्रबुद्ध नागरी संमेलन', प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्यांचे 'सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन', विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन अशी विविध कार्यक्रमे मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. त्या अनुषंगाने महाजनसंपर्क अभियानातील लाभार्थी संमेलन एक महत्वाचा कार्यक्रम आहे.