फडणवीस शिंदेंसह राज्यपालांकडून योगासनांची प्रात्यक्षिके

21 Jun 2023 20:27:23
Maharashtra Government Celebrated International Yoga Day

मुंबई
: जगभरातील १८० देशांनी मान्यता दिलेला आंतरराष्ट्रीय योगदिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ऊर्जदायक वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत विधान भवनाच्या प्रांगणात बुधवारी सकाळी योगासनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी फडणवीस शिंदेंसह राज्यपालांनी योगदिनाचे महत्त्व विशद करत योगासने करण्याचे आवाहन उपस्थितांना दिले.

योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा - राज्यपाल रमेश बैस

“सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहोचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविले पाहिजे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

योगामुळे आत्मविश्वास, सहनशक्ती वाढीस लागत असल्याचे सांगत राज्यपाल बैस म्हणाले की, योगाचा संपूर्ण जगात प्रचार झाला पाहिजे, नव्या पिढीला योग शिकविणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे सामर्थ्य योगात आहे. देशात मधुमेह आजार वेगाने वाढत आहे. या आजारावर योगाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्वाधिक युवाशक्तीचा भारत देश आहे. युवाशक्तीने योग केला पाहिजे. ही योग चळवळ पुढे नेली पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना योगामुळे व्यसनांपासून दूर राहता येऊ शकते. देशात योग विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तणावमुक्तीसाठी प्रत्यके कार्यालयात किमान १५ मिनिटे योगाभ्यास झाला पाहिजे”.

योग करून निरोगी राहूया, करो योग रहो निरोग - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपूर्ण जगात आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून २१ जून हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस निरंतर स्मरणात ठेवावा, असा दिवस आहे. शरीर, मनाच्या आरोग्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. बदलत्या जीवनशैलीत योगाला आपलेसे करून निरोगी आयुष्य जगावे. त्यासाठी प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योग करावा. करो योग रहो निरोग हा मंत्र अंगीकारावा”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात केले.

तर नार्वेकरांना त्रास होणार नाही - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसह देशातील जनतेला योगदिनच्या शुभेच्छा देतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची हलकीशी फिरकी घेतली आहे. फडणवीस म्हणाले की, ''जगातील सर्व बंधू-भगिनींना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी शुभेच्छा देतो. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगाभ्यासाकरता आम्हा सर्वांना विधान मंडळात निमंत्रित केले होते. विधान मंडळात आम्ही सकाळी योगाभ्यास केला. असाच योगाभ्यास सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रित केला तर विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल. अध्यक्षांना फार त्रास होणार नाही,' असे म्हणत फडणवीसांनी नार्वेकरांची फिरकी घेतली आहे.


Powered By Sangraha 9.0