सहाव्या महिन्यांत बाळाचा ‘अन्नप्राशनम’ हा सातवा संस्कार करण्यात यावा. यावेळी शक्य वाटत नसेल, तर बाळाच्या शारीरिक कुवतीप्रमाणे जेव्हा तो अन्न पचवण्यास समर्थ होईल, त्यावेळी (त्यादिवशी) देखील हा संस्कार करू शकतो.
ओम् अन्नपतेऽन्नस्य नो
देह्यनमीवस्य शुष्मिनः।
प्र प्र दातारं तारिष ऊर्जं
नो धेहि द्विपदे चतुष्पदे॥
(यजुर्वेद-११/८३)
अन्वयार्थ
(अन्नपते!) हे अन्नाच्या स्वामी परमेश्वरा, तू (न:) आम्हां सर्वांना, बाळाला (अनमीवस्य) रोगांनी विरहित, कृमिकिटक इत्यादींनी रहित असा स्वस्थ ठेवणारा, (शुष्मिनः) बल प्रदान करणारा (अन्नस्य) अन्नाचा साठा (देहि) प्रदान कर. (दातारम्) अन्नाचे दान करणार्याला (प्र प्र तारिष) खूप खूप, मोठ्या प्रमाणात वाढव! अन्नाभावी ते दुःखी होता कामा नयेत. (न:) आमच्या (द्विपदे, चतुष्पदे) दोन पायांवर आणि चार पायांवर विचरण करणार्या (मानव, पशु, पक्षी इत्यादी... भूचर, जलचर, नभचर) जीवांकरिता (ऊर्जं) बलकारक व पुष्टिवर्धक असे म्हणजेच शक्ती व सामर्थ्याने परिपूर्ण असे अन्न (धेहि) प्रदान कर!
विवेचन
कोणताही प्राणी असो, त्यासाठी अन्न ही सर्वांत मूलभूत गरज आहे. कारण, अन्नाशिवाय जगणे ते अशक्यच! अन्नाचे महत्त्व ओळखूनच आचार्य चरकांनी शरीराचे तीन आधार मानले आहेत-
त्रय उपस्तंभा इत्याहार: स्वप्नो ब्रह्मचर्यमिति।
म्हणजेच आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे शरीराचे मूलभूत आधारस्तंभ आहेत. यात सर्वात आद्यस्थान आहे, ते आहार म्हणजेच भोजनाचे! आहाराचे महत्त्व विशद करताना एके ठिकाणी म्हटले आहे-
प्राणिनां मूलम् आहारो बलवर्णौजसाम्।
अर्थात, सर्व जीवांचे आणि त्यांच्या बलस्वरूपी ओजादींचे मूळ कारण आहार म्हणजेच अन्न आहे. शास्त्रात अन्य ठिकाणी वचन आले आहे-
अन्नं वै प्राणिनां प्राण:।
खरोखरच अन्न हे सर्व प्राणिमात्रांचे प्राण आहे. याच भावनेतून योगेश्वर कृष्णदेखील गीतेत म्हणतात-
अन्नाद् भवन्ति भूतानि!
अन्नामुळेच तर सर्व प्राणी जीवन जगतात व ते जीवंतदेखील राहतात. उपनिषदात म्हटले आहे- आहार हा शुद्ध असावा. पवित्र व शुद्ध आहारामुळेच अंत:करण शुद्ध बनते. त्यामुळे आपली स्मरणशक्ती दृढ राहते. स्मरणशक्ती स्थिर व दृढ असेल, तर सर्व प्रकारच्या दुविधा संशय, अस्थिरता इत्यादी ग्रंथी नाहीशा होतात.
तो विश्वविधाता, पिता परमेश्वर किती महान आहे पाहा. त्याने जन्मापूर्वीच आपल्या समग्र प्रजेकरिता अन्नाचे नियोजन करून ठेवले आहे. मातेच्या उदरी असताना आईचे भोजन हेच त्या शिशूचे अन्न होते. पण, जन्मल्याबरोबर आईच्या स्तनातून मिळणारे दूध हेच त्या बाळाकरिता पौष्टिक अन्न ठरते. हा बाळ जसजसा मोठा होऊ लागतो, तसतशी त्याच्या अवयवांचीही वाढ होऊ लागते. बाळ मातेचे दूध किती दिवस पीत राहणार? कारण, अत्याधिक दूध पाजवल्याने आई दुर्बल होऊ शकते. यासाठी त्या जगदंबेने पुन्हा नियमबद्ध अशी व्यवस्था केली आहे. आईलाही त्रास होऊ नये व बाळदेखील अधिक बलसंपन्न व्हावा आणि त्याची शारीरिक वाढ मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी तिने निसर्गसृष्टीतील अन्नधान्याची व्यवस्था करून ठेवली. पण, त्यांचे चर्वण करण्यासाठी साधन कुठे आहेत? तो ते खाणार तरी कसे? म्हणूनच आता बाळाच्या मुखात हळूहळू दात येण्यास सुरुवात होते. साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या महिन्यांत बाळाला दात येण्यास प्रारंभ होतो. म्हणूनच आश्वलायन गृह्यसूत्रात (१/१६/१) म्हटले आहे- षष्ठे मासि अन्नप्राशनम्।
सहाव्या महिन्यांत बाळाचा ‘अन्नप्राशनम’ हा सातवा संस्कार करण्यात यावा. यावेळी शक्य वाटत नसेल, तर बाळाच्या शारीरिक कुवतीप्रमाणे जेव्हा तो अन्न पचवण्यास समर्थ होईल, त्यावेळी (त्यादिवशी) देखील हा संस्कार करू शकतो.
हा बाळ आता या पहिल्यांदाच प्रकृतीमातेचे अन्न भक्षण करणार आहे. खाण्या-पिण्याची सुरुवात तो आज करतो आहे. म्हणूनच या दिवसाला संस्काराचे रूप देण्यात आले आहे. आयुष्यभर ज्या अन्नाच्या भक्षणामुळे त्याचे शरीर सर्वांगसुंदर बनून तो एक बलिष्ठ मानव बनेल, मग ते प्रथमान्नसेवन सहजपणे कसे काय? यासाठीच तर अग्निहोत्रपूर्वक छोटासा उत्साही कार्यक्रमच हवा. अन्नप्राशन संस्काराच्या दिनी सकाळी बृहद् यज्ञविधीची तयारी करावी. ऋत्विकांचे वरण, आचमन, अंगस्पर्श, ईश्वरस्तुति प्रार्थना-उपासना मंत्र, तसेच स्वस्तिवाचन, शांतीकरण इत्यादी मंत्रांचे गायन व्हावे. तिकडे स्वयंपाक घरात थोडे स्वच्छ केलेले तांदूळ धुवून घ्यावे व ते शिजावयास टाकावे. त्यात थोडे तूप पण मिसळावे. ही क्रिया करताना- ‘ओम् प्राणाय त्वां जुष्टं प्रोक्षामि!’ इत्यादी पाच मंत्र्यांचे पठण करण्यात यावे. त्यानंतर भात चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर त्यास यज्ञस्थळी आणून ‘ओम् प्राणाय त्वा जुष्टं निर्वपामि...!’ इत्यादी पाच मंत्रांनी त्यांना वेगवेगळ्या पात्रात ठेवण्यात यावे.
त्यानंतर अग्नी प्रज्वलित करून पूर्ण अग्निहोत्र करण्यात यावा. तद्नंतर खालील मंत्रांद्वारे भाताच्या आहुत्या प्रदान कराव्यात.
देवीं वाचमयजन्त देवा: तां विश्वरूपा: पशुवो वदन्ति ।........॥ (ऋ.८/१००/११) आणि
वाजो नोऽद्य प्र सुवाति दानं वाजो देवाँऽऋतुभि: कल्पयाति ।(यजु.१८/३३)
यानंतर त्याच भातात तूप मिसळून ‘ओम प्राणेन अन्नमशीय स्वाहा..’ इत्यादी चार आत्या प्रदान करण्यात याव्यात.
वरील सर्व मंत्रातून नूतन अन्नाद्वारे प्राण, अपान, डोळे, कान इत्यादी इंद्रियांना बल व शक्ती प्राप्त व्हावी, अशी भावना व्यक्त होते. त्याचबरोबर हे अन्न बाळासह सर्वांकरिता नवी ऊर्जा प्रदान करणारे ठरो, या अन्नाद्वारे सुयश प्राप्त होऊन शारीरिक व मानसिक शक्ती वाढत राहो, असा उपदेश मिळतो. यज्ञकर्म पूर्ण झाल्यानंतर शेवटी त्या भातात दही, मध व थोडेसे तूप मिसळून ते विवेचित (खालील) मंत्राचे उच्चारण करीत बाळाचा चाटवावे.
अन्नपते अन्नस्य नो देह्यनमीवस्य शुष्मिण:। प्र प्र दातारम......॥
या मंत्रातील भाव अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे. मंत्रोक्त परमेश्वर सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांचा निर्माता असल्याने त्याला ‘अन्नदेव’ किंवा ‘स्वामी’ म्हटले आहे. अन्नाच्या अधिपती त्या भगवंताने आम्हास आमच्या आरोग्यास अनुकूल, उत्तम प्रतीचे, सर्वदोषविरहित व नाना प्रकारच्या कृमी-किटकांनी रहित असे अन्न प्रदान करावे व ते सर्वांकरिता बलवर्धक असावे, अशी कामना करीत जे अन्नाचे दाते आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच त्यांना नानाविध दुःखांपासून दूर करण्याची विनवणी केली आहे.
तसेच, ज्यांच्या कष्टातून व परिश्रमातून आम्हास हे अन्न उपलब्ध झाले आहे, अशा दोन पाय असलेल्या मनुष्य इत्यादी व चार पाय असलेल्या बैल, गाय, इतर जनावरे यांच्या प्रति आभार प्रकट करीत त्यांना शक्ती व बळ प्राप्त होवो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. या मंत्रातील आशय नेहमीच बाळाच्या लक्षात राहावा, म्हणून जेव्हा अन्न खाऊ घालायचे तेव्हा हा मंत्रपाठ करण्यात यावा. तसे तर सर्वांनीच जेवायला बसल्यावर प्रारंभी या मंत्राचे श्रद्धेने उच्चारण करावे. कारण, हा वैदिक भोजन मंत्र आहे. आजदेखील वेदानुयायी कुटुंबात भोजनाच्या प्रारंभी या यजुर्वेदीय मंत्राचे पठण केले जाते.
या अन्नप्राशन संस्कार प्रसंगी भात, तूप, दही, मध इत्यादी पदार्थांच्या बाबतीत विचार करावयास हवा. बाळाला सर्वप्रथम कोणते अन्न खाऊ घालावे? तर ते शुद्ध व बलवर्धक असेच याकरिता स्मृती व सूत्रकारांनी सुपाच्य व शुद्ध अशा आहाराची निवड केली, ती म्हणजे घृतयुक्त भाताची किंवा दही, मध व तूप मिश्रित पदार्थाची! म्हणजेच बाळाचे पहिले अन्नभक्षण हे शुद्ध, पवित्र व मंगलकारक आहे. बाळ कोणत्याही देशात जन्मलेला असो, तेथील आई-वडील हे बाळाला असाच आहार प्रदान करतात. मांसाहाराचे सेवन अजिबात करवित नाहीत. यावरून हे लक्षात येते की, मानव हा जन्मजात शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. जर काय तो मांसाहारी असला असता, तर बाळाचे पहिले अन्न हे मांस असावयास पाहिजे. म्हणूनच गोभिलीय गृहसूत्रात मांसादी तामसिक व राजसिक आहार व मद्यप्राशन इत्यादी अयोग्य आहारास सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे
मांसं रुक्षाहारं मद्यादिपानं च वर्जय!
काही असो मानवाचे मूलभूत शुद्ध, सात्विक भोजन हे अन्न-धान्य, फळे, भाज्या, दूध इत्यादी स्वरूपातीलच आहे. म्हणूनच माणसाच्या प्रथम भोजनाची सुरुवात हेदेखील भात, दूध, दही, मध व तुपाच्या माध्यमातून होते. सध्याच्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेल्या मांसाहारी जीवन पद्धतीतील मानवाने आपला राक्षसी वृत्तीचा अनर्थक प्रवास थांबविला पाहिजे. म्हणूनच अन्नप्राशन संस्कारापासून शुद्ध शाकाहाराचा बोध घेणे हेच सुयोग्य!
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८