नामाला पर्याय नाही...

21 Jun 2023 22:29:03
Article On Importance Of Ramnaam

ज्याच्या मुखात रामनाम नाही म्हणजे, भौतिकतेत रममाण झाल्याने ज्याच्या मनात कधी रामनामाचा विचार येत नाही, त्याच्या ठिकाणी अहंभाव पुरेपूर भरलेला असतो, त्याला अहंकाराची, गर्वाची बाधा झालेली असते.

मनात साठलेल्या अनेकविध शुद्धाशुद्ध विचारांपैकी अध्यात्माला अनुकूल विचार रामनामाने जागृत होऊन दृश्य पातळीवर आल्यानंतर माणसाचे अंत:करण शुद्ध, निर्मळ होऊ लागते. भौतिक गोष्टींच्या अतिहव्यासामुळे मनात अहंभाव देहबुद्धी पुरेपूर भरून राहिलेली असते. रामनामाच्या सातत्याने देहबुद्धीला आळा बसतो आणि अहंकारापासून होणार्‍या नुकसानाची जाणीव होऊ लागते, म्हणून ज्याच्या मुखात भगवंताचे नाम येत नाही, त्या पामराला मुक्ती कशी मिळणार? या विचारातून नामाचा महिमा अधिक स्पष्ट करण्यासाठी स्वामींनी हा विषय पुढील श्लोकात घेतला आहे-

मुखी नाम नाहीं तथा मुक्ति कैंची।
अहंतागुणें यातना से फुकाची।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥
मुखाने सतत रामनाम घेणार्‍या प्रल्हादाचे उदाहरण सांगून झाल्यावर स्वामींनी लगेच हा श्लोक लिहिला आहे. कधीही रामनाम न घेणार्‍या व नारायणाचा द्वेष करणार्‍या हिरण्यकश्यपूचा अंत कसा झाला, हे मागील श्लोकात सांगितले आहे. म्हणून स्वामी सांगतात की, ज्याच्या मुखात रामनाम नाही, त्याला मुक्ती मिळणे सर्वथा अशक्य आहे. शास्त्रात एकंदर चार प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत. त्यापैकी सलोकता, समीपता आणि सरूपता हे तीन मुक्तिप्रकार कायमस्वरूपी नसतात. भगवंताच्या सगुण मूर्तीसमोर भजनात, कीर्तनात तल्लीन झालेले भक्त सभोवतालचे वातावरणभक्तिमय करून टाकतात. या भक्तिप्रकारात प्रपंचविकारांतून मुक्त होऊन भगवंतांचे सान्निध्य अनुभवता येत असले तरी ते कायमस्वरूपी असत नाही. पुन्हा प्रपंच गुणांच्या सहवासात आल्यावर पूर्वी अनुभवलेली मनाची स्थिरता अर्थात समाधान विरून जाते.

हा ‘सलोकता’ मुक्तिप्रकार फार काळ टिकत नाही. आता ’समीपता’ पाहा. भगवंताच्या सगुणरूपात पशु-पक्ष्यादी वाहने, मूर्तीचे हार अलंकार इत्यादी वर्णने येतात, त्यांना परमेश्वराचे सान्निध्य लाभत असले तरी परमेश्वर स्वरूपापासून ते वेगळे असतात. अर्थात, हे सान्निध्य अल्पकालीन ठरते. ‘सरूपता’ प्रकारची मुक्तीही अशी तात्पुरती असते. भगवंताच्या, भगवंतगुणांच्या चिंतनाने कालांतराने एक प्रकारचे समाधान आणि सात्विक तेज भक्ताच्या मुखावर दिसू लागते. ते भगवद्स्वरूप वाटले तरी फार काळ टिकणारे नसते, या तीनही मुक्ती काहीकाळ अनुभवता येतात. परंतु, ‘सायुज्यमुक्ती’ प्रकारात भक्त भगवंताची मनापासून भक्ती करता करता पूर्णपणे अभिमानरहित होऊन परमेश्वर तत्त्वात तदाकार झाल्याने तेथून परत फिरण्याची शक्यता नसते. या सर्व मुक्तिप्रकारांत मुखात भगवंताचे नाम, रामनाम असावे लागते. आध्यात्मिक क्षेत्रातील साधक सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यावरही त्याला नाम घ्यावे लागते. मुखी रामनाम नसेल, तर सिद्धतेचा मुक्तीचा विचार करता येत नाही. मुक्तीचे चार प्रकार वर सांगितले असले तरी समर्थ जेव्हा मुक्तिस्वरुपाचा उल्लेख करतात, तेव्हा ते सायुज्य मुक्तीबद्दलच बोलत असतात. म्हणून ज्याच्या मुखात सतत रामनाम आहे, तोच सायुज्यमुक्ती अनुभवू शकतो, असे समर्थांना सूचित करायचे आहे.

ज्याच्या मुखात रामनाम नाही म्हणजे, भौतिकतेत रममाण झाल्याने ज्याच्या मनात कधी रामनामाचा विचार येत नाही, त्याच्या ठिकाणी अहंभाव पुरेपूर भरलेला असतो, त्याला अहंकाराची, गर्वाची बाधा झालेली असते. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू अती अहंकारी झाल्याने तो नामाचा, भगवंताचा द्वेष करू लागला. हे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले आहे. त्याच्या अती अहंकाराने, गर्वाने हिरण्यकश्यपूने आपला अंतकाळ ओढवून घेतला आणि त्याला कशा प्रकारच्या मरण यातना सहन कराव्या लागल्या, हे आपण मागील लेखात पाहिले. आपल्या मनातील ‘मी पणा’ची अहंकारी वृत्ती, अहंभाव, गर्व, ताठा, मीपणाच्या श्रेष्ठत्वाची गुर्मी या सार्‍यांना मनातून काढून टाकणे कठीण असते. अध्यात्माप्रमाणे ‘मी पणा’ व्यवहारातही माणसाचे नुकसानच करतो. ‘मी पणा’मुळे प्रपंचही धड होत नाही आणि परमार्थ तर हमखास बुडतो. मीपणा, अहंभाव, गर्व, ताठा इत्यादी विकारांनी प्रपंचात आणि परमार्थातही यश, कीर्ती, प्रताप सारे धुळीला मिळतात. असे स्वामींनी दासबोधात सांगितले आहे. ‘मीच तेवढा श्रेष्ठ’ या कल्पनेपायी अहंभाव, गर्व, ताठा, बेफिकिरी या दुर्गुणांनी मैत्रीमधील स्नेहभावना, कुटुंबातील आपलेपणा, प्रेम, वात्सल्य या सार्‍यांचा विध्वंस घडवून आणला जातो. ‘मी पणा’ कोणालाच आवडत नाही, मग तो परमेश्वराला कसा आवडेल, असे स्वामींनी दासबोधात म्हटले आहे. ‘मी पण कोणासिच न साहे। तें भगवंती कैसेनि साहे।‘

कर्तेपणाची नशा चढल्यावर हा अहंता नावाचा (अव) गुण माणसाच्या ठिकाणी फुकटच्या यातना निर्माण करीत असतो. मागे श्लोक क्र. २४ मध्येही स्वामींनी या ‘अहंते’ला ’दुष्ट पापिणी’ म्हणून संबोधले आहे. तो श्लोकार्थ असा आहे-

सदा सर्वदा नाम वाचें वसो दे।
अहंता मनीं पापिणीं ते नसो दे॥
समर्थांनी अहंकाराला ‘पापिणी’ म्हटले आहे आणि त्या अहंकाराला मनात स्थान देऊ नका,असे स्पष्टपणे सांगितले आहे. अहंकाराच्या आहारी गेलेल्या माणसाचे जीवन अस्वस्थ असते. मन स्थिर नसल्याने व प्रत्येक बाबतीत अहंगंड असल्याने त्याच्या जीवनात उगीचच समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे त्याला यातना सहन कराव्या लागतात. असं असलं तरी वृथा अहंकार त्याला सोडवत नाही. त्यामुळे हा अहंकारी मनुष्य त्याला होणार्‍या यातनांना स्वत:च जबाबदार असतो - अशा अहंकारी माणसाच्या जीवनाचा अंतही दैन्यवाणा असतो. अहंकारामुळे देहबुद्धी बळावते आणि अनेक भौतिक, प्रापंचिक गोष्टीत मन गुंतल्यामुळे अशा व्यक्तीचा अंतकाळ दु:खद असतो. त्याचे मन भौतिक पसार्‍यातील अनेक गोष्टीत गुंतलेले असल्यामुळे देहापासून जीव सोडताना त्याला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. वृथा अहंकार सतत बाळगल्याने त्या व्यक्तीची देहबुद्धी घट्ट झालेली असते.

देहसुखाच्या, इंद्रियसुखाच्या नादी लागल्याने ‘हे माझे, ते माझे’ असे करत करत प्रत्येक गोष्टीत त्याचा जीव अडकून पडलेला असतो. आयुष्यभर या ना त्या मार्गाने जमा केलेले धन, दौलत, संपत्ती, घरदार सारे इथेच टाकून अंतकाळी एकटेच निघून जाताना जीवाला अनंत यातना होतात. त्याच्या मुखात कधी रामनाम न आल्याने तो अंतःकरण स्थिर करू शकत नाही. त्यामुळे हे जग, हा देह सोडून जाताना त्याला खूप कष्ट होतात, यातना होतात. पण, मृत्यू कोणाला टाळता येत नाही, याउलट रामनाम घेणार्‍याचे मन अगोदरच दृश्य वस्तूंपासून वेगळे झालेले असते. त्यामुळे त्याचा अंतकाळ कष्टदायक होत नाही. यासाठी दैन्यवाणा अंतकाळ टाळण्यासाठी रामनाम घ्याच. स्वामी ‘म्हणोनी म्हणा के म्हणा देवराणा’ या ओळीत म्हणा शब्दाची द्विरुक्ती करून रामनाम घेणे, किती आवश्यक आहे. ते पटवून देत आहेत.
७७३८७७८३२२
Powered By Sangraha 9.0