निसर्गात घडणार्या घडामोडींची पूर्वसूचना प्राणी-पक्ष्यांना मानवाच्या आधी मिळते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगातील तंत्रज्ञान जिथे अचूक माहिती देऊ शकत नाही, अशा ठिकाणीदेखील पशू-पक्ष्यांनी दिलेले संकेत तंतोतंत खरे ठरतात. पाऊस येणार असल्याचा संदेश घेऊन येणारा ‘पावशा’ पर्यावरण बदलामुळे रुसला की काय, असे सद्यःस्थितीवरून निदर्शनास येते. ‘पावशा’या पक्ष्याचे आणि पावसाचे घनिष्ट नाते. ’पाऊस आला’, ’पाऊस आला’ किंवा ’पेरते व्हा’, ’पेरते व्हा’ अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची वार्ता हा पक्षी देत असतो. महाराष्ट्रातील लोक याला ‘बळीराजा’हीम्हणतात. ‘पावशा’ने पाऊस येणार असल्याची वार्ता देताच आजही ग्रामीण भागात शेतीच्या कामाला खर्या अर्थाने गती प्राप्त होते. यंदा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा वरुणराजा अद्याप सक्रिय होत नसून ‘पावशा’ही तसे काही संकेत देताना दिसत नाही. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. उच्च तंत्रज्ञानाने युक्त हवामान विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या अधिकृत आगमनाचा पहिला अंदाज दिला. त्यानंतर हवामान बदलामुळे दुसरा आठवडा, त्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पावसाचे वेळापत्रकच बदलले आणि आता तो जूनच्या चौथ्या आठवड्यात सक्रिय होणार असल्याचा अंदाज नव्याने वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ आपल्या अभ्यासातून करत असलेले हे भाकीत यंदा वारंवार खोटे ठरत आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या विश्वासार्हतेवर नेहमीप्रमाणे यंदाही शंका उपस्थित केली जात आहे. ‘पावशा’प्रमाणे अनेक पक्षी पावसाची सूचना घेऊन येतात. त्यात कावळ्याचे घरटे बनविण्याचा कालावधीही महत्त्वाचा मानला जातो. मार्च-एप्रिलमध्ये कावळा आपली घरटे विणत असतो. यंदा मे महिन्यात कावळ्यांची घरटी तयार होताना निदर्शनास आली. त्यातही यावर्षी कावळ्याची घरटी झाडाच्या मध्यावर नसून काहीशी उंचीवर आहेत. याचाच अर्थ यंदा पुरेसा पाऊस होणार नसल्याचा निसर्ग संकेत मिळाला आहे. एकीकडे कावळ्याचे उंचावर असलेले घरटे तर दुसरीकडे ‘पावशा’चा ‘पेरते व्हा’ असा संदेश मिळत नसल्याने चिंता वाढणे स्वाभाविक आहे.
...तू चातक
निसर्गातील घटकांचा पुरेपूर वापर करणार्या मानवाला निसर्गाची भाषा कळतेच असे नाही. ज्यांना कळते ते त्याप्रमाणे सावध होतात. कधीकाळी तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते. त्याकाळी निसर्गातील घटक म्हणजेच पशु-पक्ष्यांच्या हालचाली आणि त्यांच्या आवाजातून मिळणार्या संदेशातून नैसर्गिक घडामोडींची सूचना मिळत होती. हल्ली मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे आपण यांत्रिक झालो असून निसर्गाशी संवाद साधण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. त्यामुळे निसर्गाचे संकेत आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. पाऊस लांबल्यामुळे पुढे काय? असा प्रश्न सर्वांसमोर पडला असताना हवामान विभागाकडून पर्जन्यराजाच्या आगमनाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरावा आणि पाऊस लवकर सक्रिय व्हावा, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, निसर्गाचे तसे संकेत अद्याप मिळत नसल्यामुळे यंदा पावसाचे वेळापत्रक कोलमडणार, हे स्पष्ट झाले आहे. मानवापेक्षाही पावसाची वाट पाहणारे पशु-पक्षी आहेत. त्यात चातक हा पक्षी पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो. त्यातूनच साहित्यात ‘चातकासारखी वाट पाहणे’ हा वाक्यप्रचार प्रचलित झाला. चातक पक्षी पावसाळाआल्याचे संकेत देत असतो. आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी आपल्याकडे पाहुणे म्हणून येताना पावसाचीवर्दीही देत असतात. परंतु, यंदा या चातकांची चाहूलही दिसेनाशी. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल, तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. त्यांचे आगमन लांबले, तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही हवामान तज्ज्ञाची गरज भासत नाही. हवामानाचा विशेष करून पावसाचा अंदाज देणार्या हवामान विभागाची आपण नेहमीच थट्टा करतो. मात्र, निसर्गाने पशु-पक्ष्यांकरवी आपल्यापर्यंत पोहोचविलेले ऋतुमानाचे संकेत कधीही चुकत नाहीत. पशुपक्ष्यांना साधारणत:दीड-दोन महिने आधीपासूनच ऋतूबदलाची चाहूल लागते. तसे संकेतही ते देतात. परंतु, ते संकेत समजून घेण्याइतका वेळ, संवेदनशीलता आपल्याकडे हवी. दुर्दैवाने, या स्मार्ट फोनच्या युगात संवेदनशीलता आणि निसर्गाशी संवादही हरवला आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे आपलीही अवस्था चातक पक्ष्यासारखी झाली असून, सर्वांचेच डोळे आभाळाकडे लागले आहेत.