कात्रज डेअरीचे अरुण चांभारे यांचे पद रद्द

20 Jun 2023 15:43:27
Katraj Dairy

पुणे
: जिल्हा दूध संघाचे थकीत येणे असल्याचे कारण देत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) संचालक अरुण चांभारे यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. सहकारी संस्थांच्या दूग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी आदेश काढले आहेत.
 
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ही मार्च 2022 मध्ये झाली होती. या निवडणुकीत चांभारे हे खेड तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत त्यांनी माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. या पदावरून चांभारे आणि शेटे या दोघांमध्ये 2010 पासून मोठी चुरस आहे. यातूनच अगदी 2015 पासून हे दोघेही हे पद आपल्याकडेच कसे राहील, या उद्देशाने एकमेकांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढत आहेत. 2015 मध्ये झालेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पुतण्याच्या थकबाकीच्या कारणांवरूनच चांभारे यांचा उमेदवारी अर्ज अवैध करण्यात आला होता. त्यामुळे चांभारे हे त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले होते.

दरम्यान, याच विषयावर याआधी मुंबई उच्च न्यायालयाने पुतण्या हा कुटुंबाचा घटक नसल्याचे स्पष्ट करत, मला विजय घोषित केले होते. त्यामुळे विभागीय उपनिबंधकांचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विसंगत आहे. शिवाय माझा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे या निर्णयाला मी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अरुण चांभारे यांनी सांगितले.
 

Powered By Sangraha 9.0