दि. ५ ऑगस्ट, २०१९ या दिवशी ‘कलम ३७०’ रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले. आता या प्रदेशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पर्यटकही मोठ्या संख्येने येऊ लागल्याने अनेकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ हे रद्द केल्यानंतर त्या केंद्रशासित प्रदेशाची विकासाच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू आहे. त्या प्रदेशासाठी दि. १ एप्रिल, २०२२ रोजी जे नवीन औद्योगिक धोरण अस्तित्वात आणले, त्याचेही चांगले परिणाम दिसण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूकही होऊ लागली. या नव्या औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणजे १९४७ नंतर प्रथमच एका वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये २ हजार, २०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये या प्रदेशात सुरू झालेल्या नव्या उद्योगांमुळे दहा हजार तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या. नव्या औद्योगिक धोरणाला प्रतिसाद म्हणून जे गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत, त्यांची आतापर्यंतची संख्या ५ हजार, ३२७ इतकी आहे. हे लक्षात घेता, येत्या काही वर्षांमध्ये या प्रदेशात सुमारे ६६ हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार, २०२३-२४ या वर्षांमध्ये ५ हजार, ५०० कोटी गुंतवणूक असलेल्या उद्योगांची उभारणी करण्यास प्रारंभ होईल. या उद्योगांमुळे भविष्यात हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रदेशासाठीच्या नव्या औद्योगिक धोरणानुसार, आगामी १५ वर्षांमध्ये जम्मू - काश्मीरच्या औद्योगिक विकासावर २८ हजार, ४०० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ७५ वर्षांमध्ये प्रथमच विदेशी गुंतवणूकदार या प्रदेशात गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. दुबई येथील इमार समूह श्रीनगरमध्ये भव्य मॉलची उभारणी करणार आहे. यापूर्वीच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या शोरूम जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये वाढही होणार आहे.
चार वर्षांपूर्वी ‘कलम ३७०’ रद्द करण्याआधी राज्यातील विकास ठप्प झाला होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे या प्रदेशात गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नव्हते. पण, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत आहेत. आता या केंद्रशासित प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित झाली असल्याने गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. २०१९ पर्यंत काश्मीरमधील युवकांपुढे रोजगाराच्या संधी नव्हत्या. पाकिस्तान तेथील तरुणांचा वापर भारताविरूद्ध लढण्यासाठी करीत होता. पाकिस्तान आपला वापर करीत होता, हे आता तेथील युवकांच्या लक्षात आले. पाकिस्तानचे गुणगान गाणार्या जम्मू -काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी कधी प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
पैशाचे आमिष दाखवून या तरुणांना दहशतवादाकडे वळविण्याचा प्रयत्न काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी केला. दि. ५ ऑगस्ट, २०१९ या दिवशी ‘कलम ३७०’ रद्द झाल्यानंतर जम्मू- काश्मीरला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले. आता या प्रदेशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पर्यटकही मोठ्या संख्येने येऊ लागल्याने अनेकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरसाठीच्या या नव्या औद्योगिक धोरणामुळे या केंद्रशासित प्रदेशाचा विकास खूप वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे.
साक्षी मलिक काँग्रेसच्या हातातील बाहुले!
भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांनी एक हजार पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये ब्रिजभूषण यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. एकीकडे असे आरोपपत्र दाखल झाले असताना, कुस्तीगीरांच्या आंदोलनास आता आणखी एक राजकीय वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. ऑलिम्पिक कुस्तीपटू आणि भारतीय जनता पक्षाची नेता बबिता फोगट हिने दि. १८ जून रोजी एक निवेदन प्रसिद्ध करून साक्षी मलिक हिने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओचा उल्लेख करून साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले असल्याचे म्हटले आहे. साक्षी मलिक आणि तिच्या नवर्याने दि. १८ जून रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कुस्तीगीरांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल आणि आंदोलक कुस्तीगीर आणि केंद्र सरकारदरम्यान मध्यस्थाची भूमिका बजाविल्याबद्दल या दोघांनी बबिता फोगट यांचे आभार मानले. पण, साक्षी मलिक आणि तिच्या नवर्याने जो दावा केला आहे, तो बबिता फोगट यांनी फेटाळून लावला आहे. “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास खूप वाईट वाटले. तसेच हसूही आले,” असे सांगून बबिता फोगट म्हणाल्या की, “साक्षी मलिक हिने परवानगी संदर्भातील जी कागदपत्रे दाखविली होती, त्याच्याशी माझा सुतरामही संबंध नाही. तसेच त्या कागदपत्रांवर माझी स्वाक्षरीही नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील न्यायालयीन व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असे आपण पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहोत. सत्य हे निश्चितपणे उघड होईल. एक महिला खेळाडू या नात्याने आपण नेहमीच देशातील खेळाडूंसमवेत आहोत. पण, त्या निदर्शनांना माझा प्रथमपासून विरोध होता. तुम्ही पंतप्रधान मोदी, क्रीडामंत्र्यांना भेटा. त्यातून नक्की मार्ग निघू शकेल, असे त्यांना सांगितले होते,” असे बबिता फोगट यांनी म्हटले आहे. यासंदर्भात बबिता फोगट यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. आपल्या राजकीय फायद्यासाठी ते कुस्तीगीरांच्या भावनांशी खेळत आहेत. साक्षी मलिक ही ‘काँग्रेसच्या हातातील बाहुले’ बनली आहे, असा आरोपही बबिता फोगट यांनी केला आहे. “तुम्ही काँग्रेसच्या हातचे बाहुले झालेले आहेत, हे देशातील जनतेने ओळखले आहे. आता तुमचा नेमका हेतू काय आहे, हे जनतेला सांगण्याची वेळ आली आहे,” असे बबिता फोगट यांनी म्हटले आहे, तर साक्षी मलिकने बबिता फोगट यांच्यावर टीका करून कुस्तीगीरांच्या आंदोलनाचा स्वतःच्या फायद्यासाठी बबिता फोगट वापर करीत आहेत, अशी टीका केली आहे. कुस्तीगीरांच्या आंदोलनात विविध पक्षांसमवेत भारतीय किसान युनियननेही उडी घेतली होती. पण, नंतर त्या संघटनेने त्यातून माघार घेतली. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाची कुस्तीगीरांनी वाट पाहायाला हवी. आपल्या आंदोलनाचा कोणत्याच पक्षाला राजकीय लाभ घेऊ देता कामा नये, एवढे पथ्य आंदोलकांनी पाळावयास हवे!
...म्हणे रामचरित मानस मशिदीमध्ये लिहिले गेले!
सध्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये हिंदू धर्म, हिंदू धर्मग्रंथ यांची बदनामी करण्याची चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे बिहारमधील आमदार रितलाल यादव यांनी नुकतेच असेच एक आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू समाजाची नाराजी ओढवून घेतली. या महाशयांनी तुलसीदासांनी रामायण हे मशिदीमध्ये लिहिले, असा अजब शोध लावला आहे. मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी राजदचे नेते कोणत्या थराला जाऊ शकतात, याची कल्पना यावरून यावी. दानापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या रितलाल यादव यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. खुनासह विविध गुन्हे ज्या रितलाल यादव यांच्या नावावर आहेत, त्याने पत्रकारांसमवेत बोलताना, “लोक राम मंदिराची चर्चा करतात. पण, रामचरितमानस हे मशिदीमध्ये लिहिले होते, हे तुम्ही आठवा. इतिहासाची पाने उलटल्यानंतर त्यावेळी तुमचे हिंदुत्व धोक्यात नव्हते का? जेव्हा मुघल आपल्यावर राज्य करीत होते, त्यावेळी हिंदुत्व धोक्यात नव्हते का,” असे प्रश्न या आमदाराने उपस्थित केले आहेत.
आमदार यादव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. “एखाद्याची मानसिक स्थिती चांगली नसेल, तर ते काही चांगले लक्षण नाही आणि एक गुन्हेगार व्यक्ती रामचरितमानसबद्दल आपले प्रबोधन करू पाहतोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा गुन्हेगार व्यक्तीस लालू प्रसाद यादव यांनी आमदारकीचे तिकीट दिले, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आता ती व्यक्ती आम्हास शिकवायला निघाली आहे.” भाजपचे एक नेते निखिल आनंद यांनी, “कोणत्या इतिहासाच्या पुस्तकात हे लिहिले आहे, हे राजदने दाखवून द्यावे. मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी राजदची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी राजद आमदाराने किती खालची पातळी गाठली, हे या उदाहरणावरून दिसून येते.