मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ३५० वर्षे होत असल्याने शिवभक्तांमध्ये उल्हासाचे वातावरण दिसून येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराजांसाठी अनेकांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने सिहासनाधीश महाराजांना मानवंदना देत आहे. अशातच सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आपल्या फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहून महाराजांबाबत असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विश्वास पाटील आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले, "हे परमेश्वरा, आमच्या शिवाजीराजांना फक्त 49 वर्षांचं आयुष्य देताना तू मनाचा किती कद्रूपणा दाखवलास रे 'महासम्राट' शिवाजीराजाना फक्त ४९ वर्षांच आयुष्य! पूर्ण पन्नास वर्षेही नव्हे! एकूण 18 हजार 306 दिवसांची ती अल्पशी जिंदगी! पण तरीही शिवरायांनी आपल्या पराक्रमी जीवनाची पताका नेपोलियन बोनापार्ट आणि अलेक्झांडर यांच्या पेक्षाही उंच फडकावली!"
पुढे त्यांनी स्वराज्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न सांगत म्हंटल, "अरे देवा, आणखी आमच्या राजाना फक्त आणि फक्त दहा वर्षांच आयुष्य जादा दिलं असतंस तर, तर माझी खात्री आहे, शिवरायांनी मराठ्यांची पराक्रमी घोडी पॅरिस आणि लंडनच्याच नव्हे तर सप्तसागरांच्या किनाऱ्यावरून थयथया नाचवली असती ! 'जय भवानी'चा जगभर जयघोष केला असता!"
या पोस्ट सोबतच त्यांनी आपला एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तोही जोडलेला आहे. त्यांची इतिहासावरील आणि त्यातूनही खास करून शिवाजी महाराजांवरची भक्ती स्पष्ट दिसून येते.