अँटिओक, एडिसा, मालात्या, अलेप्पो इत्यादी या क्षेत्रातल्या शहरांना आणि त्यातील वास्तूंना दोन-तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. यापैकी अनेक वास्तू या भूकंपात उद्ध्वस्त झाल्या आहेत. तुर्कस्तानाला गझियन टेप इथला किल्ला दोन हजार वर्षांपूर्वी रोमन सम्राटांनी बांधला होता. तो कोसळला आहे. जगभरचे पुरातत्व शास्त्रज्ञ ’युनेस्को’च्या मदतीने या वास्तूंची शक्य तितकी डागडुजी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
अलीकडेच मी एका खूप जुन्या मित्राच्या गावी गेलो होतो. मित्राने गेल्या १०-२० वर्षांत गावठाणातलं जुनं घर सोडून सड्यावर नवं घर किंवा बंगला बांधला आहे. साधारणपणे कोकणात गावठाणं ही किनार्यालगत किंवा डोंगराच्या कुशीत असतात. या दोन्हीपेक्षा वरच्या पातळीवर जी थोडी सपाट सलग माळासारखी जमीन असते, तिला ‘सडा’ असं म्हणतात किंवा असंही म्हणायला हरकत नाही की, घाटावर ज्याला ‘माळ’ म्हणतात, त्याला कोकणात ‘सडा’ म्हणतात.
मित्राच्या सड्यावरच्या घरात हवा खात बसलेलो असताना, मला त्याच्या गावठाणातल्या जुन्या खपरेली घराची आठवण झाली. भर गावठाणाच्या मध्यावर असल्यामुळे त्या घराला समोर अंगण नव्हतं. रस्त्याला अगदी लागूनच पाच पायर्या. त्या चढल्या की ऐसपैस ओटी. मग मुख्य खोली, माजघर, स्वयंपाकघर आणि त्यामागे अंगण आणि विहीर अशी त्या घराची रचना होती. मित्र म्हणाला, ‘’ठेवलंय मी अजून ते घर. तिथे मालाचं गोदाम केलंय.” मी म्हटलं, ’‘चल, आपण एक चक्कर मारून येऊया. त्या घरात आपण लहानपणी मनसोक्त धुमाकूळ घातलाय. १९७१ सालच्या गणेश चतुर्थीचा दिवस मला अजून आठवतोय. बाहेरच्या खोलीत बाप्पा विराजमान होते आणि माजघरात आपण सगळे रेडिओवर ‘बीबीसी’ लावून भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसर्या कसोटीचं वर्णन ऐकत होतो आणि जेव्हा अबीद अलीने विजयी चौकार मारून भारताला कसोटीसह मालिका जिंकून दिली, तेव्हा आपण बाप्पासमोर विजयी तांडवनृत्य केलं होतं. भारताने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध प्रथमच मालिका जिंकली होती. आठवतंय तुला? अशी कितीतरी सुगंधी स्मरणं या घराशी निगडित आहेत. चल, एकदा ते घर पाहून येऊ.”
मित्र पण एकदम माझ्याचसारखा ’नॉस्टॅल्जिक’ झाला. त्याच्या दुचाकीवरून भुर्रकन आम्ही त्या जुन्या घराशी पोहोचलो. बघतो तर काय, ’कृष्णाकाठी कुंडल आता, पहिले उरले नाही!’ कसं उरणार? ५०-५५ पावसाळे बरसून गेले होते. खपरेली छपराच्या ठिकाणी आता मंगलोरी कौलांचं छप्पर होतं आणि पायर्या? रस्त्यालगतच्या पाच पायर्यांऐवजी आता दोनच पायर्या शिल्लक होत्या. रस्त्याला अगदी लागून असणार्या पायरीचा दगड काहीतरी वेगळाच; थोडा जांभळा, थोडा तांबडा असा होता. त्या रंगांवरून त्या काळी आम्ही किती तर्क-वितर्क केले होते. गावातल्या अन्य कुणाच्याही घराला तशी पायरी नव्हती आणि आता ती पायरीच गडप झाली होती. मित्र म्हणाला, ’‘आता आमच्याकडे ग्रामपंचायत नव्हे, नगरपालिका आहे. मंडळी दर दोन-तीन वर्षांनी रस्त्याचं डांबरीकरण करताना नवीन भराव टाकतात आणि वर खडी-डांबर टाकतात. त्यामुळे रस्त्याची पातळी उंचावली. पायर्या भरावाखाली गडप झाल्या. या हिशोबाने पुढच्या ५० वर्षांत रस्ता घराच्या वर जाईल,” आम्ही दोघेही हसलो.
अगदी नकळत आम्ही एका ऐतिहासिक प्रक्रियेला येऊन धडकलो होतो. इ.स. १६३६ साली महाराजसाहेब शहाजीराजे भोसले यांनी एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला. ते स्वत: आदिलशहाच्या हुकमाप्रमाणे कर्नाटकात रवाना झाले. पण, पुणे या आपल्या परंपरागत जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी जिजाऊ राणीसाहेब आणि बाल शिवबाराजे यांनी पुण्यातच राहावं, असं त्यांनी ठरवलं. या दोघांच्या दिमतीला त्यांनी अतिशय अनुभवी अशा कारभारी लोकांचं एक मंडळ दिलं. या मंडळाचे प्रमुख होते पंत दादोजी कोंडदेव. कसबे पुणे आदिलशाही फौजांनी जाळून टाकलं होतं. रयत परागंदा झाली होती. जिजाऊ साहेबांच्या आज्ञेनुसार पंत मंडळींनी प्रथम पुण्याची ’पांढर’ शोधून काढली. तिथे नव्याने गाव वसवला आणि मग ’काळी’ कसण्यासाठी रयतेला आमंत्रण दिलं. हे सगळे आपल्याला माहीतच आहे. फक्त ’पांढर’ आणि ’काळी’ या शब्दांकडे आपले बरेचदा दुर्लक्ष होते.
नदीच्या तीरावर, पाण्याची जवळीक बघून कुणीतरी हिंमतबाज, खप्या माणूस गाव वसवतो. गावाजवळच्या काळ्या मातीत घाम गाळून तो मोती पिकवतो. कालचक्र फिरत राहातं. उत्थान, पतन, पुन्हा उत्थान, पुन्हा पतन. किती पावसाळे, नदीचे किती पूर, किती उन्हाळे, क्वचित दुष्काळामुळे परागंदा होणं, परचक्रामुळे पळून जाणं, घटना घडत राहतात. पिढ्या उलटत राहतात. पुरामुळे किंवा दुष्काळामुळे परागंदा झालेली रयत जेव्हा परत येते, तेव्हा तिला दिसते की, दगडांची मातीची, चुन्याची आपली घरं पार भुईसपाट झाल्येत. पण, यामुळेच जमिनीचा रंग बदलून ती पांढरी झालेय. बाकी शेतजमीन मात्र काळीच आहे. मग ते लोक पुन्हा ’पांढर’ वसवतात. म्हणजे त्या जुन्या अवशेषांवरच नवी वस्ती उठवतात आणि काळ्या मातीत पुन्हा खपायला लागतात.
हे फक्त पुण्यात, मोहेंजोदडो-हडप्पा-लोथल-द्वारका इथेच घडले असे समजू नका. जगात सर्वत्र जिथे जिथे म्हणून प्राचीन संस्कृतींची ठिकाणं सापडली आहेत, तिथे तिथे असंच घडलेलं आढळतं. पुरातत्व शास्त्रज्ञ त्याबद्दल बोलताना त्यांच्या खास भाषेत सांगतात, ’अमक्या त्या ठिकाणच्या उत्खननात आम्हाला तीन थर सापडले. सर्वांत वरचा थर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा, त्याखालचा थर सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीचा आणि सगळ्यात खालचा थर सुमारे १५ हजार वर्षांपूर्वीचा असावा, असा आमचा अंदाज आहे.’ याचा अर्थ सर्वांत आधी १५ हजार वर्षांपूर्वी तिथे वस्ती झाली. मग कोणत्यातरी कारणाने ती उठून गेली.
पुन्हा पाच हजार वर्षांनी एका लोकसमुदायाने तिथे वस्ती केली. पुन्हा गेले, पुन्हा आले.....! राजा रामचंद्र आणि महार्षी दुर्वास यांच्या एकांत संभाषणात व्यत्यय आणल्याची शिक्षा म्हणून बंधू लक्ष्मणाने शरयू नदीत जलसमाधी घेतली. त्या घटनेने विव्हल झालेल्या खुद्द रामप्रभूनेही तोच मार्ग अनुसरला. राम-लक्ष्मणांवाचून अयोध्येत राहाणं नकोसे वाटून राजपुत्र लव आणि कुश आणि सगळेच प्रजानन अयोध्येतून परागंदा झाले. शरयूमाई वाहत राहिली, वाहतच राहिली. शतकानुशतकं! तिच्या पुराच्या पाण्याने राजप्रासादांचे ढिगारे झाले. त्यांनाच आपण म्हणतो ’टीला’. छोटीशी टेकडी. मग तीन हजार वर्षांपूर्वी सम्राट विक्रमादित्याने राजा दशरथाचा राजप्रासाद ’लोकेट’ करून पहिलं जन्मभूमी मंदिर बांधलं.
हिमालयाच्या पश्चिमेकडच्या रांगेला म्हणतात शिवालीक रांग. या रांगेतच यमधार नावाचा पर्वत आहे. पाच पांडव आणि द्रौपदी याच यमधार पर्वतावरून प्रवास करीत असताना, एका मागोमाग एक प्राणत्याग करून यमलोकी गेले. फक्त सम्राट युधिष्ठिर आणि त्याचा कुत्रा सदेह स्वर्गलोकी गेले, अशी प्रसिद्ध कथा असलेल्या समधार पर्वताला आज आपण म्हणतो ’जौंधार ग्लेशियर.’ आजच्या उत्तराखंड राज्यातल्या ’हर की दून’ किंवा ’हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे जाताना ’यमधार’ दिसतो.
प्रख्यात सरस्वती नदीचं हे मूळ उगमस्थान. आज मात्र ती हरियाणा राज्यातल्या, यमुनानगर जिल्ह्यातल्या आदिबद्री या गावी प्रथम प्रकटपणे दिसते. पाच हजार वर्षांपूर्वी ही अतिप्रचंड नदी शिवालीक टेकड्यांपासून थेट गुजरातमधल्या कच्छपर्यंत वाहत होती.
मोहेंजोदडो, हडप्पा, धोलनीरा, राखीगढी, कालीबंगन, बाणावली आणि अखेर लोथल अशी अनेक नगरं हिच्या आश्रयाने भरभराटली होती. लोयल हे सरस्वतीच्या अगदी मुखावरचं अत्यंत समृद्ध असं बंदर. ‘सुकी गोदी’ किंवा ‘ड्राय डॉक’ म्हणजे जहाजांना पाण्याबाहेर आणून त्यांची दुरूस्ती करण्याची तांत्रिक जागा, ही अख्ख्या जगात सर्वांत प्रथम आम्ही बांधली, असा टेंभा इंग्रज लोक मिरवत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ’आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने १९५५ ते १९६० या कालखंडात लोथलचं उत्खनन हाती घेतलं. शिकारीपुरा रंगनाथ राव म्हणजेच प्रख्यात डॉ. एस. आर. राव यांनी असे सिद्ध केले की, मोहेंजोदडो आणि हडप्पा इथे जी संस्कृती होती, तीच लोथलमध्येही होती आणि तिचा काळ किमान पाच हजार वर्षांपूर्वीचा असावा. लोथलमध्ये सुकी गोदीदेखील सापडली.
पण मग काश्मीर, पंजाब, हरियाणा, सिंध, राजस्थान, गुजरात एवढ्या मोठ्या प्रदेशात पसरलेली ही सिंधू संस्कृती किंवा सिंधू-सरस्वती संस्कृती नष्टप्राय का बरं झाली? तर सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी हिमालयात एक अनंत भीषण असा भूकंप झाला आणि सरस्वती नदीच्या प्रवाहात एक भला मोठा पर्वतच भूगर्भातून वर उचलला गेला. यामुळे सरस्वती नदीचा मुख्य प्रवाह फुटला-तुटला-विभागला गेला. अनेक धारा पश्चिमेकडे वळून सिंधू, सतलज, रावी इत्यादींना मिळाल्या. एक मोठी धारा पूर्वेकडे वळून यमुनेला मिळाली आणि एक मोठी धारा जमिनीत गडप झाली, ती आजही भूगर्भातून कच्छच्या रणापर्यंत वाहतेच आहे. आता जीवनाचा आधार जे पाणी, तेच नाहीसं झालं म्हटल्यावर सरस्वतीच्या खोन्यातली मोहेंजोदडो, हडप्पासारखी अनेक शहरं परागंदा झाली. त्यांना उपायच राहिला नाही. मग त्या सोडून दिलेल्या मानवी बदलांवर माती-धूळ साठत गेली. शतकानुशतकं! भुपृष्ठावर असणार्या वस्त्या भूगर्भात गेल्या.
या चालू २०२३ वर्षाच्या दि. ६ फेब्रुवारी आणि दि. २० फेब्रुवारीला दक्षिण तुर्कस्तान व उत्तर सीरियामध्ये भीषण भूकंप झाला. किमान ५० हजार माणसं ठार झाली. जखमी आणि निराधार विस्थापितांची संख्या याच्या दुप्पट असावी, असा अंदाज आहे. तुर्कस्तानचे आणि आपले ताणलेले राजनैतिक संबंध बाजूला ठेवून भारताने त्वरेने तुर्कस्तानला सर्व प्रकारची मदत पाठवली. याबद्दलच्या बातम्या, चित्र, चित्रफिती आपण वृत्तपत्रं आणि समाजमाध्यमांमधून पाहिलीच असतील. पुरातत्व शास्त्रज्ञांना यासंदर्भात वेगळीच काळजी वाटत आहे.
भूकंप ज्या क्षेत्रात झाला, ते युफ्रेटिस नदीचं खोरं ऐतिहासिकदृष्ट्या फारच प्रख्यात आहे. युफ्रेटिस आणि तैग्रिस या महान नद्या अनातोलिया म्हणजेच आजच्या तुर्कस्तानच्या उत्तरेकडे उगम पावतात आणि तुर्कस्तान, सीरिया नि इराक या देशांचा साधारण साडेआठ लाख चौ. किमी एवढा प्रदेश समृद्ध करीत दक्षिणेला बसरा इसे पर्शियन आखातात विलीन होतात. या नद्यांच्या समृद्ध प्रदेशात सुमेरियन, अक्केडियन, असीरियन, बाबिलोनियन इत्यादी प्राचीन संस्कृती नांदून गेल्या. अँटिओक, एडिसा, मालात्या, अलेप्पो इत्यादी या क्षेत्रातल्या शहरांना आणि त्यातील वास्तूंना दोन-तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. यापैकी अनेक वास्तू या भूकंपात उद्ध्वस्त झाल्या आहेत. तुर्कस्तानाला गझियन टेप इथला किल्ला दोन हजार वर्षांपूर्वी रोमन सम्राटांनी बांधला होता. तो कोसळला आहे. जगभरचे पुरातत्व शास्त्रज्ञ ’युनेस्को’च्या मदतीने या वास्तूंची शक्य तितकी डागडुजी करण्याच्या प्रयत्नात आहेत. कितीही प्रयत्न केले तरी किल्ला पहिल्यासारखा नक्कीच होणार नाही. कालाय तस्मै नमः।