मन, मनगट आणि मस्तक बळकट करण्यासाठी राष्ट्रवीर संघाच्या माध्यमातून ते युवा पिढीला शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण देत आहेत. जाणून घेऊया नितीन शेलार यांच्याविषयी...
नितीन बबनराव शेलार यांचा जन्म १९८९ साली बारामतीत झाला. वयाच्या तिसर्या वर्षीच वडिलांचा अपघात झाला. ते ट्रॅक्टर चालविण्यासोबत छोटी-मोठी कामे करत, तर आई मटकी(उसळ) विक्रीचा व्यवसाय करत. बारामती नगरपालिकेच्या मराठी शाळा क्र. दोनमध्ये नितीन यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. शालेय वयात त्यांना स्लो सायकल, तीन पायाची उडी, कबड्डीसह अन्य खेळांची विशेष आवड होती. पुढे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सातव विद्यालयातून पूर्ण केले. शिक्षकांमुळे विशेषतः सावंत सरांमुळे त्यांना इतिहासाची गोडी लागली. दररोज तालीमदेखील सुरू असल्याने अनेक कुस्त्या स्पर्धांमध्येही त्यांनी यश मिळवले. कुस्ती क्षेत्रात नितीन त्यांनी पंचक्रोशीत आपला दबदबा निर्माण केला. इयत्ता दहावीत शाळा सोडण्याचा विचार केला. परंतु, शिक्षकांनी समजावल्यानंतर पुन्हा नितीन शाळेत जाऊ लागले.
घरची बेताची परिस्थिती पाहून नितीन यांनी काही काळ खानावळीत नोकरीही केली. दहावीत ४१ टक्के मिळाले आणि दहावीनंतरच्या सुट्ट्यानंतर त्यांनी मित्रासोबत लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतले. दरवर्षी त्यांनी गटकोट मोहिमेला जाण्यास सुरुवात केली. परिणामी, मित्रमंडळी वाढली, वाचनाची आवड निर्माण झाली आणि जनसंपर्कदेखील वाढला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन देव, देश आणि धर्मासाठी वाहून घेण्याचा निर्धार केला. दहावीनंतर त्यांनी तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात अकरावीला कला शाखेत प्रवेश केला. बारावीच्या परीक्षेच्या काळातच वडिलांचे निधन झाले. घराला हातभार लावण्यासाठी नितीन पुण्यात नोकरीकरिता आले. भाऊ आरोग्य खात्यात रुजू झाल्यानंतर नितीन दोन वर्ष नोकरी केल्यानंतर पुन्हा गावी परतले. गावी ते सुतारकाम करू लागले. पुण्याला जाऊन आपण काहीतरी वेगळं करायचं हा ध्यास नितीन यांनी घेतला होता.
बारामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात त्यांनी मुलांना शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला आठ ते दहा मुलांची संख्या पुढे २०० च्या वर गेली. पहाटेच्या वेळी वर्ग भरवले जाई. त्यात व्यायाम, महाराजांची पूजा, यानंतर लाठीकाठी, दानपट्टे इत्यादींचे मोफत प्रशिक्षण दिले जाई. नितीन यांनी युद्धकलेचे आणखी काही प्रकार शिकण्याचे ठरवले. त्यांना अनेक ठिकाणी सादरीकरणासाठी बोलावले जाऊ लागले. ‘सायबर’ कॅफेमध्ये जाऊन ते युट्यूबवर शिवकालीन युद्धकलेचे व्हिडिओ पाहत आणि समजून घेत. किशोर पवार यांच्याकडूनही त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या. दानपट्टा, भाला, तलवारबाजी अशा अनेक कला नितीन यांनी अवगत केल्या. कोल्हापूरच्या लखन जाधव यांच्या ते संपर्कात आले. नितीन यांनी त्यांची भेट घेतली आणि त्याचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले.
तीन-चार वर्ष प्रवास करत ज्याठिकाणी युद्धकला शिकण्याची संधी मिळेल, तिथे नितीन जात असे. अखेर पूर्णवेळ त्यांनी याच क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. बारामती सोडून त्यांनी पुणे गाठले आणि तिथेच नोकरी सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी वारजे आणि येरवडा येथे लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रशिक्षण वर्गांना प्रतिसाद वाढत गेला. लखन जाधव आणि नितीन यांनी एकत्र येत ‘सर्वोदय’ नावाच्या संस्थेद्वारे काम करण्यास सुरुवात केली. संस्थेतर्फे वार्षिक शिबिरे घेण्यास सुरुवात झाली. ज्ञानेश्वरीचे प्रचार-प्रसारक संजय गोडबोले यांची दिक्षा त्यांनी घेतली. ‘मणिकर्णिका’ चित्रपटात नितीन यांनी ‘असिस्टंट फाईट मास्टर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुढे नितीन यांनी २०२१ साली ‘राष्ट्रवीर संघ’ संस्थेची स्थापना केली.
वारजे, कर्वेनगर, कात्रज, आळंदी, हडपसर, सासवड, खंडाळा, बारामती यांसह मुंबई, नाशिक याठिकाणी संस्थेचे काम सुरू आहे. भारतीय व्यायाम, खेळ, लाठीकाठी, भाला, तलवारबाजी, दानपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. मुलींना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी त्यांना ‘नियुद्ध’ प्रकाराचे धडे दिले जातात. संस्थेच्या सध्या ११ शाखा असून त्या माध्यमातून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक जणांना शिवकालीन युद्धकलेचे धडे देण्यात आले आहेत. मुलांना शिवरायांच्या इतिहासाची आवड निर्माण व्हावी, शिवकालीन शस्त्रांची माहिती आणि महत्त्व युवा पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी राष्ट्रवीर संघ प्रयत्न करत आहे. नितीन सध्या एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत असून ते शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण देतात.
नितीन यांना लखन जाधव, सागर जाधव, संजय गोडबोले, सावंत सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते. जास्तीत जास्त मुलांना शिवकालीन युद्धकला शिकविण्याचा त्यांचा मानस आहे. खेळाच्या माध्यमातून देशाला पंतप्रधान मोदी मिळाले. परकीय युद्धकलेत देशप्रेम नसते. परंतु, शिवकालीन युद्धकलेचे तसे नाही. मन, मनगट आणि मस्तक बळकट करण्याची ताकद शिवकालीन युद्धकलेमध्ये आहे. ही युद्धकला सर्वदूर रूजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नितीन शेलार यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...