आवाजाचा सौदागर

18 Jun 2023 20:38:19
Sachin Suresh

आवाज हीच ओळख असणार्‍या अनेकांपैकी एक, मोठ-मोठ्या अडथळ्यांतून आपला मार्ग शोधणार्‍या, मराठमोळ्या स्पायडरमॅनला आवाज देणारा कलाकार सचिन सुरेश याविषयी..

'ठकठक’, ‘चंपक’, ‘चांदोबा’ अशी छोट्यांची पुस्तकं घरी यायची. पावसाकडे कसे चातक डोळे लावून असतात, तसे हा गोष्टीच्या पुस्तकांकडे. घरातला एक नियम होता. खेळातलाच, लुटुपुटुचा. एकदिवस बाबांनी सचिनला गोष्ट सांगायची आणि मग एकदिवस सचिन बाबाना सांगणार. तेव्हा सचिनच्या आधाराला भक्कम उभे राहिले, हेच ‘चांदोबा’, ‘चंपक’ आणि ‘ठकठक’. आपल्या आईबाबांना आपल्या आवाजच श्रेय देतो तो. लहानपणी दोघांनी त्याच्याकडून गीतेचे १८ अध्याय पाठ करवून घेतले होते. त्यामुळे आत्मविश्वास आला आणि त्यापाठोपाठ सगळ्या वक्तृत्व स्पर्धेतील बक्षिसे घरी आली. हळूहळू विक्रम वेताळाच्या गोष्टींवरून ‘रामायण’ आणि ‘महाभारता’च्या बालकथांवर सचिन आला आणि विचारांच्या, आकलनाच्या कक्षा रुंदावत गेल्या. मग पु. ल. आले, व. पु आले आणि त्याच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. एकदिवस राधेय वाचत असताना आपल्या आईने हे ऐकायला हवं असं त्याला वाटलं आणि त्याने आईला पूर्ण पुस्तक वाचून दाखवलं. तिच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलत जाणारे भाव पाहिले की, एक वेगळंच अवसान यायचं. असं अभिवाचन सुरू झालं.

सचिनचं शिक्षण पूर्ण झालं. अभियांत्रिकी विद्यालयात शिकताना नाटकांतून कामं करायला त्याने सुरुवात केली. घरातून विरोध नव्हता; पण अभिनयाबद्दल अढीच होती. आईच्या वडिलांना अभिनयाची आवड होती. ते भिक्षुकी करायचे आणि फावल्या वेळात अभिनय. त्यावेळी आई मोलकरणीचे काम करायची. अशा प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा आजोबा अभिनयाबद्दल म्हणायचे, त्यामुळे तिचा ठाम विश्वास झाला होता, अभिनयाने पैसे मिळत नाहीत. घराकडे लक्ष लागत नाही. प्रत्येक आईने हा विचार करणे स्वाभाविक आहे. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दलच विचार करत होती ती. सचिन सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आणि त्यानंतर दोन वर्ष नोकरी केली. अभिनय क्षेत्रासाठी २००० साली त्याने नोकरी सोडली. त्यानंतर ‘आभाळमाया’ वगैरे मालिका केल्या. त्यानंतर नऊ वर्षे असेच छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या, २००९ साली ‘तुझं नी माझं घर’ मालिका केली. चित्रगीतं केली. दहा वर्ष गाणं शिकून नंतर काम मिळायला लागल्याने वेळ मिळाला नाही.
२०१३साली सचिनचा आवाज गेला. ज्या आवाजावर आजवर तो उदरनिर्वाह करत होता, तो आवाजच गेला. घशात ट्युमर्स येऊ लागले. चार वर्षांत चार सर्जरी केल्या. एक काढला की, दुसरा यायचा. सचिन फार चिंताक्रांत झाला होता. या वेळेत कामेही फार नव्हती. आवाजाची नाहीत, नाही अभिनयाची. तेव्हा, अनुवादाची काही कामे त्याने केली. ओला उबर चालवावी लागते की, काय असे वाटण्याइतकी गंभीर परिस्थिती त्याच्यावर आली. आवाजच गेला म्हणजे जगण्याचे कारणच गेले. आयुष्याचे ध्येय हरवले. त्या जाण्याला काही कारण नव्हते, त्यावर ठोस असे उपाय नव्हते. एक वेळ अशी आली की, ‘व्हेंन्टिलेटर’वर ठेवावं लागतंय की, काय असे डॉक्टर म्हणाले. त्यावेळी डाएट ट्रिटमेंटच्या माध्यमातून हा आवाज त्यांना परत मिळाला, आणि पुन्हा काम सुरू केले ते आवाजावरच.मागे वडिलांचा आजार आणि अशा अनेक घरगुती कारणांमुळे कामं कमी झालेली. फार वेळ देऊ न शकल्याने सगळेच अडथळे येत होते. सचिन पुन्हा नोकरी कारण्याचा विचार करत होता. २४ तास मराठी असं चॅनेल रेडिओवर प्रथमच लॉन्च झालं. चेतन दीक्षित या सहकलाकाराकडे थोडेफार ’व्हॉईस मॉड्युलेशन टेक्निक्स‘ शिकून झाले होते, त्या आधारावर पुढच्या सर्व करिअरचा डोलारा उभा राहिला.


पहिला रेडिओ जॉकी सचिन झाला आणि त्यानंतर त्याने अभिनयाकडून थोडे बाजूला येऊन पूर्णवेळ आवाजावर आपले लक्षकेंद्रित केले. मध्यंतरी केलेल्या व्हॉईस डिरेक्शनच्या कामाचा यावेळी त्याला फार उपयोग झाला. आवाज परत आल्यानंतर ९२.४ ‘एफ. एम’ वर रात्री मराठी गाण्यांचा एक शो असायचा, तो केला. हे त्याचं आवडत काम होत. सचिनला गाण्यांच्या मागच्या गोष्टी शोधायचा नाद होता. एखाद गाणं तयार होतं, त्यामागे काय किस्से घडतात यात भारीच रस. अंध मुलांचे काही प्रयोग, लावण्यांचा प्रयोग, ‘रंग उधळू चला’ असे काही प्रयोगांचे संचलन केले. ‘स्पायडरमॅन’सारखा अत्यंत गाजलेला चित्रपट मराठीमध्ये डब होऊ पाहतो, तेव्हा त्यासाठी सचिनला विचारणा झाली. ही एवढी महत्त्वाची संधी चालून आल्यानंतर सचिनने आपले सर्व लक्ष या चित्रपटाकडे केंद्रित केले. या चित्रपटातून अनेक गोष्टी त्याने शिकल्या आहेत. त्याचा आवाज असाच महाराष्ट्राला पुढील काळातही ऐकू यावा यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्याला अनेकानेक शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0