कार्ल्यातील एकवीरेच्या परिसरात होणार वृक्ष लागवड

17 Jun 2023 12:34:01




Tree Plantation

मुंबई (प्रतिनिधी): कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात देशी झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. आई एकवीरा भाविक संघाच्या वतीने साधारण ५०० हुन अधिक झाडे लावण्यात येणार आहेत.


कार्ल्यातील एकवीरा देवी मंदिर आणि डोंगराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निलगिरीची झाडे आहेत. निलगिरी ही एक विदेशी वनस्पती म्हणजेच एक्झॉटिक प्लांट्स या प्रवर्गात येणारी वनस्पती असुन ते लावण्यावर कायद्याने बंदी आहे. शिवाय या वातावरणातील नसल्याने ही झाडे अपायकारक परिणाम ही करु शकतात. त्यामुळेच देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यावर या संघाने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, इत्यादी झाडांची रोपटी लावण्यात येणार आहेत.

एकवीरेच्या मंदिर परिसरात होणाऱ्या या वृक्षारोपणामध्ये प्रत्येक गावातील लोकांना रोपे आणण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातुन किमान पाच रोपांच्या संख्येप्रमाणे ही भरपुर रोपे जमतील, आणि ऐन पावसाळ्याच्या दिवसांत झाडे लावल्यामुळे ही झाडे जगवण्यास मदत होणार आहे. जुलै महिन्याच्या मध्यावर हे वृक्षारोपण केले जाणार असुन त्याच्या तारखा येत्या २५ जुन रोजी जाहिर करण्यात येणार आहे. आपापल्या गावातुन मोठ्या झाडांची रोपे आणण्याबरोबरच वृक्षारोपण करण्यासाठी स्वयंसेवक म्हणुन येण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0