सन १८५७... भारताच्या स्वातंत्र्य समराच्या इतिहासातील एक सुवर्णपान. १८५७चा हा उठाव वर वर पाहता अपयशी झाला खरा, पण खरे तर याच उठावाने भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणार्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिकांना एक दिशा मिळाली. या स्वतंत्र समरात अनेक नररत्नांनी प्राणाची बाजी दिली. आपल्या शौर्याने, पराक्रमाने इतिहासात आपले नाव कोरलेले, यातीलच एक रत्न म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या शौर्याचे स्मरण करणारा हा लेख...
चमक उठी सन सत्तावन में,
वह तलवार पुरानी थी
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी
कार्तिक वद्य १४, शके १७५७ म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार दि. १९ नोव्हेंबर, १८२८ रोजी काशी येथे मोरोपंत तांबे व भागीरथी बाई या दाम्पत्याच्या पोटी एका कन्येने जन्म घेतला. या कन्येचे नामकरण ‘मणिकर्णिका’ असे केले गेले. प्रेमाने हीच मनू या नावाने ओळखली जात असे. मनमोहक सौंदर्य लाभलेल्या, हुशार, बाणेदार मनूने तीन-चार वर्षांची असतानाच आपले मातृछत्र गमावले.वडील मोरोपंत तांबे हे विठूरच्या दरबारात पेशवे. पेशव्यांच्या वाड्यात इतर पेशव्यांसह लहानग्या मनूनेही शस्त्र व शास्त्र दोघोंचे शिक्षण घेतले. शस्त्र/ शास्त्रात पारंगत असणार्या ‘मणिकर्णिका’चे छंद तरी काय, तलवारबाजी, दांडपट्टा, बंदूक चालवणे, घोडदौड करणे इ. लहानपणापासूनच युद्धशास्त्र अवगत करणारी हीच ‘मणिकर्णिका’ पुढे ‘झाशीची राणी’ झाली.वयाच्या सातव्या वर्षी मनूचा विवाह झाशी संस्थानचे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी संपन्न झाला आणि तांबे कुळाची ‘मणिकर्णिका’ ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ झाली. काही वर्षांतच आई होण्याचे सौभाग्य लक्ष्मीबाईंना लाभले. पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. तीन महिन्यांतच पुत्रवियोगाचे दु:ख राणी लक्ष्मीबाई व गंगाधरराव यांना सोसावे लागले.
पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने महाराज गंगाधरराव सतत आजारी राहू लागले. झाशीच्या राज्याचा वारस कोण? याचा विचार करता गंगाधररावांच्या इच्छेनुसार नेवाळकर वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव यास दत्तक घेण्याचे ठरले. त्याचे नामकरण ’दामोदरराव’ केले गेले. दत्तकविधी झाल्यानंतर काही दिवसांतच गंगाधररावांना मृत्यूने गाठले आणि वयाच्या १८व्या वर्षी राणी लक्ष्मीबाईवर वैधव्याची कुर्हाड कोसळली. झाशीची सर्व जबाबदारी राणी लक्ष्मीबाईवर आली. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने दत्तक विधान नामंजूर केले आणि राणी लक्ष्मी बाईच्या संघर्षाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने झाशीला ब्रिटिश साम्राज्यात सामील होण्याचे आदेश देणारे राजपत्र जारी केले. ब्रिटिश अधिकारी असलेल्या अॅलिसने काढलेला हा आदेश ऐकल्यावर चवताळलेल्या राणी लक्ष्मीबाई नामक वाघिणीने ‘मेरी झाशी नही दूंगी’ चा ललकार करत बंडाचा झेंडा उगारला आणि झाशी इंग्रजांच्या विरोधाचे, बंडाचे केंद्र बनले. पण, काही दिवसांतच राणीला गड सोडावा लागला. मेणातून गडाखाली येताना राणीचे मन दु:ख, चीड, संतापाने भरून गेले होते. ‘आज मी जातेय, पण लवकरच मी परत येईल’ या संकल्पाने त्यांनी गड सोडला, तो इंग्रजांविरुद्ध सूड उगवायचा, या दृढ निश्चयानेच!
युद्धासाठी वापरल्या जाणार्या तोफा व बंदुकींना गोमांस व डुकराच्या मासाचा उपयोग केल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व १८५७च्या उठावाला दि. १० मे रोजी मीरत येथे सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारला उठाव मोडून काढणे अधिक महत्त्वाचे वाटले, म्हणून त्यांनी तात्पुरते झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या हाती सोडण्याचा निर्णय घेतला. मीरतबरोबरच दिल्ली, बरेली पाठोपाठ झाशीही इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाली. झाशीतील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यावर राणी लक्ष्मीबाई यांनी तीन वर्षांनंतर तेथील सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली.
किल्ल्यात गेल्यावर लगेच त्यांनी दारुगोळा, शस्त्र, बंदुका, तोफा यांच्या सज्जतेबरोबरच आपले सैन्य वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आपल्या विश्वासक सरदारांच्या मदतीने राणी लक्ष्मीबाईंनी आपले एक सैन्य उभारले. या सैन्यात पुरुषासह महिलांचाही समावेश होता. महिलांची एक स्वतंत्र तुकडी उभारत राणीने त्यांनाही शस्त्र/युद्धकला शिकवून लढण्यासाठी प्रशिक्षित केले. सुंदर, मुंदर, काशीबाई, झलकरी, मोतीबाई यांसारख्या अनेक वीरांगना त्यांनी आपल्या सैन्यात तयार केल्या. गावाच्या तटाची दुरूस्ती करत बुरुजावर तोफा चढविल्या गेल्या. या रणरागिणीच्या प्रचंड सामर्थ्याच्या तोफांची नावे ही तिच्यासारखीच! ‘कडक बिजली’, ’भवानीशंकर’, ‘शत्रूसंहार’, ‘घनगर्ज’ इ. राणीचे सैन्य आता १४ हजारांवर पोहोचले होते.
इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी झाशी सज्ज होत होती आणि अशातच सर ह्यूरोज प्रचंड सैन्यानिशी रायगड, चंदेरीचा किल्ला हस्तगत करून झाशीच्या दिशेने निघाल्याची वार्ता कानी आली. झाशीच्या गळ्याभोवातीचा फास दिवसेंदिवस आवळला जात होता. सर ह्यूरोजच्या नेतृत्वाखाली शत्रू चारही बाजूचे प्रदेश जिंकून स्वत:साठी रसद व धनधान्याची व्यवस्था करीत आहे, हे पाहता लक्ष्मीबाईंनी शत्रूला नामोहरम करण्याकरिता ‘दुग्धभू’ रणनीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. झाशीच्या चारही बाजूंचा प्रदेश बेचिराख करून धान्याचा एक कणही शिल्लक ठेवला नाही. निर्मनुष्य, बेचिराख प्रदेश, सर व्ह्यू रोजच्या सैन्याचे स्वागत करायला सज्ज झाला होता. जणू म्हणत होता, ‘झाशी घ्यायचीय ना तुला? जा पुढे जा. बघ काय होतंय. आग पेटेल, वडवानल पेटेल, होरपळून जाशील त्यात.’ झाशी म्हणजे राणीच्या मुकुटातील हिरा... जीवापाड जपते ती त्याला! त्या नागिणीच्या मस्तकावरील मणी मिळविणे, म्हणजे मृत्यूशी झुंज आहे.
सर ह्यूरोज हा कसलेला सेनापती. त्याने हे आव्हान स्वीकारले आणि दि. २० मार्च १८५८ ला ब्रिटिश सैन्याने झाशीत प्रवेश केला. लक्ष्मीबाईंना शरणागती पत्करावी, असा निरोप पाठवला. मात्र, शरणागती न पत्करता ती स्वत: सैन्याला लढण्यास स्फूर्ती देण्यास सज्ज झाली. लढाई सुरू झाली. झाशीच्या तोफा इंग्रजांची दाणादाण उडवत होत्या. बलाढ्य इंग्रज सेनेला दाद न देता राणी हिमतीने, धैर्याने लढत होत्या. सतत लढाई करूनही झाशीच्या किल्ल्यावर तोफा डागता येत नसल्याने सर ह्यूरोजने फितुरीचा मार्ग अवलंबला आणि घात झाला. बालेकिल्ल्यातून राणी लक्ष्मीबाईंना गड सोडावा लागला. निवडक घोडेस्वारांनिशी आपल्या छोट्या दामोदरास पाठीशी बांधून किल्ल्याबाहेर पडत लक्ष्मीबाईंनी काल्पीच्या दिशेने घोड्याला टाच मारली.दोन दिवसांच्या अविश्रांत रपेटीनंतर राणी काल्पीस जाऊन पोहोचल्या. पेशव्यांनी सर्व परिस्थिती जाणून वस्त्र प्रावरणाची व्यवस्था केली. क्रांती युद्धात लढण्याचा निश्चय करत राणीने सैन्याची तयारी करून घेण्यास सुरुवात केली आणि ‘काल्पी’ क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र बनले. सर ह्यूरोजने आपला मोर्चा काल्पीकडे वळविला. क्रांतिकारकांच्या सैन्यातील कमतरता ओळखत ब्रिटिश सैन्य लढत होते. ‘काल्पी’वर इंग्रजांच्या तोफा आगीचा वर्षाव करत होत्या. राणी लक्ष्मीबाई स्वत: हातात तलवार घेत विजेच्या चपळाईने लढत होत्या. पण, क्रांतिकारकांचा आवेश कमी पडला आणि ‘काल्पी’ इंग्रजांनी ताब्यात घेतली.
काल्पी तर गेले, पण आता पुन्हा उभे राहायचे असेल, तर तितक्याच सामर्थ्याचे स्थळ हाती हवे, हा विचार आला आणि ग्वाल्हेर हस्तगत करायचे ठरले. योजना ठरली आणि राणी लक्ष्मीबाईंनी पुढाकार घेत ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या ताब्यात दिले. ग्वाल्हेरचा विजय सर ह्यूरोजच्या जिव्हारी लागला, त्याने आपल्या सैन्याचा मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला. १६ जूनला ग्वाल्हेर जवळच्या मुरारच्या छावणीवर हल्ला केला.ज्येष्ठ कृष्ण सप्तमी, दि. १८ जून १८५८ ला राणी साहेब डोक्यावर भरजरी चंदेरी फेटा, अंगात चिलखत, कमरेला बिचवा, हातात ढाल, तलवार घेऊन युद्धास सज्ज झाल्या. सोबत त्यांच्या दासी मुंदर व काशी ही पुरूषवेष धारण करून निघाल्या. राणीसाहेब आपल्या सैन्याला प्रोत्साहन देत होत्या. झुंजार युद्ध झाले. चहूकडून इंग्रजांचा गराडा पडला. सर ह्यूरोजच्या सैन्याने राणीच्या सैन्याची दाणादाण उडवली. आशेचा तंतू तुटला होता. राणीसाहेब मुंदर व काशीसह निवडक माणसे घेऊन वेढा फोडून बाहेर निघाल्या. फुलबागेचा एक ओढा आडवा आला. राणीसाहेबांचा नेहमीचा ’राजरत्न’ घोडा आज सोबत नव्हता. दुसरा घोडा ओढ्यापाशीच गरगर फिरू लागला. गोरे सैन्य पाठलाग करत होतेच. पुरुषी वेशात असलेल्या राणीला इंग्रज स्वार ओळखू शकले नाही. ते लढत होते आणि राणीची झुंज सुरू होती.
सर्व बाजूंनी प्रहार होत होते.एकाने मस्तकावर, एकाने छातीवर वार केलेत. ही वीरांगना घायाळ परिस्थितीतही रणचंडिकेसारखी लढत होती. आपला अंतकाळ जवळ आल्याचे लक्षात येताच, राणीने आपली दासी काशीला जवळ बोलाविले. जखमांनी पिंजलेला, रक्ताने माखलेला देह खाली पडला. सोबत असलेल्या एकनिष्ठ सेवकांनी राणीला जवळच्या पर्णकुटीत नेले. त्यांच्या मुखात गंगोदक घातले. लहानग्या दामोदरास डोळे भरून पाहात राणी लक्ष्मीबाईने आपल्या पवित्र देहास म्लेंच्छांचा हात लागू देऊ नये, अशी इच्छा प्रदर्शित करून डोळे मिटले. पर्णकुटी जवळच असलेल्या गवताच्या पेंडीवर या वीरांगनेचा मृतदेह ठेवत अंत्यसंस्कार केले गेले. आता कोणतीही शृंखला त्यांना जखडू शकणार नव्हती. उदंड कीर्ती मागे ठेवत, अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत झाशीची राणी लक्ष्मीबाई अवघ्या २३व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात अजरामर झाली.सर ह्यूरोजनेही ''She was the bravest and the best general on the rebel side, असे उद्गार काढत राणीचा गौरव केला.अनेक लेखक, कवी यांनीही राणी लक्ष्मीबाईच्या असामान्य कर्तृत्वाचे वर्णन केले आहे. कवी भा. रा. तांबे राणी लक्ष्मीबाईच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत म्हणतात-
रे हिंद बांधवा। थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी॥
ती पराक्रमाची। ज्योत मावळे। इथे झाशीवाली॥