समाजप्रबोधन आणि लोकशिक्षण या दोन सारख्या वाटणाऱ्या शब्दांमधील गर्भितार्थ समजावून दोन्हीचे अर्थ किती टोकाचे आहेत हे समजावताना समाजप्रबोधन कसे धोक्याचे आणि लोकशिक्षणाची निकड हे समजावून सांगणारे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची आज पुण्यतिथी.
आगरकर आणि टिळकांचे वाद आपल्याला माहितीयेत, त्या वादांच्या आडून असलेला एकमेकांप्रतीचा जिव्हाळा सुद्धा आपल्याला माहितीये, पण यामागचे कारण आपल्याला माहितीये का? आगरकर समाजसुधारक, शिक्षक किंवा लेखक म्हणून नव्हे माणूस म्हणून आपल्याला माहितीयेत का? आगरकर अल्पायुषी ठरले हे तत्कालीन समाजाचे दुर्दैव. एखादं व्यक्तिमत्व आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतं ते त्याच्या विचारातील वैविध्यामुळे. त्यांचे विचार अतिशय पुरोगामी आणि हिंदुनिष्ठ होते. त्या काळात सुखी असलेल्या आणि प्रगतीचे, नव्या विचारांचे, वावडे असणाऱ्या हिंदू समाजाला गतिमान समाजाचा भाग बनवण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली. त्या विचारांत नवकल्पनांची क्रांतीशी आणि सद्सद्विवेकबुद्धीशी घातलेली सांगड इतकी स्पष्ट आणि उजवी होती की त्यानंतर कित्येक पिढ्या, कित्येक स्थरांवर तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रभावित केले.
समाजसुधारणेबाबत त्यांचं एक तत्व होतं. समाज सुधारल्याशिवाय केलेली राजकीय चळवळ कुचकामी आहे असे त्यांचे ठाम मत होते. आजच्या समाजाकडे पाहिल्यावर सुद्धा त्यांच्या विचारातील सत्यतेची प्रचिती येते. यातुन पुढे त्यांनी समाज प्रबोधन आणि लोकशिक्षण असे दोन वेगवेगळे धागे त्यांनी समजावून दिले. समाज प्रबोधन करताना कोण्या एकाच विचारसरणीचा प्रभाव जनतेवर पडत असतो. तो लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशिक्षण व्हायला हवे. विचार करता येण्याइतके शिक्षण जनतेला मिळायला हवे यातून त्यांनी पुढे शैक्षणिक चळवळ सुरु केली. केवळ विध्यार्थी घडवून उद्याची पिढी तयार होईल, मात्र आजच्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय लेखन सुरु केले. केसरीव्यतिरिक्त इतर अनेक माध्यमातून त्यांनी लेखन केले. ज्यांना ध्येय असतात आणि ध्येयांमागे तत्व असतात त्यांची मते बदलणे कठीण मग अशा सुखलोलुप व्यक्तींच्या तत्वांचीच पुनर्बांधणी करण्याचा त्यांनी चंग बांधलेला त्यांच्या लिखाणातून दिसतो. आगरकर केवळ बुद्धिवादी नव्हते, बुद्धीने जगातील सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होत नाही परंतु, नवे ज्ञान मिळवताना ते पचवायचे झाल्यास बुद्धीची नितांत आवश्यकता आहे, असे त्यांचे म्हणणे होते. 'सत्यशोधनाची सतत धडपड हेच मानवी जीवनातील शाश्वत मूल्य आहे, हे त्यांच्या बुद्धिवादी भूमिकेचे अधिष्ठान होते.' असे गणेश प्रधान त्यांनी संपादित केलेल्या आगरकरांच्या लेखसंग्रहाबाबतीत म्हणतात.
आपल्या भोवताली असणाऱ्या व्यक्तींना आपल्याकडे असलेले वैचारिक दान देऊन जगाकडे डोळसपणे पाहायची दृष्टी त्यांच्या लेखणीने दिली. आज शेकडो वर्षांनंतरही ही दृष्टी देण्यामागची कारणे जाणून घेणे गरजेचे वाटते. आगरकरांनी केवळ स्वातंत्र्य आणि समाजसुधारणेचा ध्यास घेतला नव्हता तर त्यांना सामाजिक सुख अभिप्रेत होते. माणूस समाजप्रिय प्राणी आहे असे आपण म्हणतो. तो स्वतःच्या स्वार्थासाठी व प्रगतीसाठी सामाजिक नात्यांमध्ये स्वतःला जखडून घेतो. या नात्यांचा त्यांच्यावर जसा योग्य परिणाम होतो तास अयोग्यही होऊ शकतो. आणि म्हणूनच स्थितिप्रिय किंवा रुढीप्रिय राहण्यापेक्षा गतिमान जीवनाचा ध्यास घ्यावा हे त्यांच्या लेखनातील सार आहे, असे मला वाटते. एखाद्या व्यक्तीचे सुख समाजसापेक्षच असते, त्यावर समाजाचे हितही अवलंबून असते, त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ यात समतोल असायला हवा. तो कसा साधावा या क्लिष्ट प्रश्नाचे उत्तर अंधुकपणे का होईना आगरकर वाचताना ध्यानी येत राहते. स्त्रियांवर होणाया अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, त्यामुळे त्यांची तत्कालीन समाजाकडून निर्भत्सना झाली, अगदी स्त्रियांकडूनही झाली. परंतु ही गरज आहे, केवळ क्रांती नाही, हे पुढील सामाजिक स्थरांवर संवेदनशील समाजाला पटू लागले. आगरकरांना मृत्यूपश्चात काळ स्वीकारत गेला तो असा!
आपल्या बुद्धीस पटणारा प्रत्येक निर्णय आपण घ्यावा, जूनं ते सोनं पण म्हणून तेच कुरवाळत बसू नये, त्यातून जे घेण्यासारखे आहे तेवढे स्वीकारून आजच्या समाजाचा अभ्यासपूर्ण विचार करून आपली तत्वे पुन्हा पुन्हा तपासून पाहावीत, हे त्यांचे विचार आजही अमलात आणावे असे आहेत. त्यांचे विचार केवळ स्वानुभवांवर आधारलेले नव्हते तर ते प्रयोगनिष्ठ होते. त्यांनी सामाजिक व्यवस्थेवर टीकात्मक लिखाण केले, परंतु त्यातून स्पष्ट होणाऱ्या त्यांच्या नाराजीला उपहासाची किनार केव्हाच नव्हती. त्यांची टीका सात्विक होती आणि म्हणून ती मला श्रेष्ठ वाटते. त्यांच्या टीकेपेक्षा टीका करण्याच्या पद्धतीची भुरळ मला जास्त पडते. त्यांचे लिखाण वेगळे होते, मोकळे होते, त्यात टिळकांच्या लेखणीतला भारदस्तपणा नव्हता की सावरकरांच्या शब्दासारखे लालित्य नव्हते, परंतु त्यात स्पष्टता होती. अंधारात प्रकाश निर्माण करण्याची शक्ती होती.
त्यांचा ऐहिक वाद आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास केव्हातरी कारणीभूत होतो, परंतु त्यांचा ऐहिक दृष्टिकोन केव्हाच भोगवादी नव्हता हेही आपण लक्षात घ्यायला हवे. आपल्या इच्छा, कामना, वासना यांची माणसाला केव्हाच लाज वाटू नये. उलट, त्यांचा विचार करूनच समाजातील स्वास्थ्याचा विचार आपण करायला हवा. तरच समाजाला स्थैर्य येईल. माणसाला मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा असा अव्हेर करून माणूस केव्हाच सुखी होऊ शकणार नाही, तो नेहमीच असंतुष्ट राहील. जगातील सर्वच सुंदर गोष्टींचा रसिकतेने आस्वाद माणसाला घेता यायला हवा. त्यातूनच त्यांची निखळता जपली जाते. ही निखळ वृत्ती समाजासाठी अत्यंत मौल्यवान आहे. सर्व शारीरिक भौतिक आणि ऐहिक सुक्खांपेक्षा मानसी सुख श्रेष्ठ असे ते म्हणतात तेव्हा त्यांच्या मऊ मनाची आपल्याला कल्पना करता येते.
त्यांचे पूर्वायुष्य अगदी हलाखीत गेले परंतु आपल्या बुद्धीवर सामर्थ्य मिळवत असतानाही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यापेक्षा समाजाचा विचारच त्यांनी केला. ही विरक्ती की समाजप्रतीची आपुलकी? त्यांच्या अशा अनेक न उलगडलेल्या व्यक्तिमत्वाच्या अजूनही शोधात राहावं अशा अनेक खाचा खोचा त्यांच्या अभिव्यक्त होण्यात आहेत.