पुणे : पुण्यातील गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव देण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्र लिहिले आहे. हे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे आहे. शरद पवार हे बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष आहेत. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले आहे.
भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवारांच्या कारकिर्दीत होऊ शकले, याचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.