लहु काळेंची ‘सकारात्मक व्यंगचित्रे’

    16-Jun-2023
Total Views |
World famous cartoonist Lahu Kale

पंढरीची वारी जयाचिये कुळी।
त्याची पाय धुळी लागो मज॥
ही ओवी आहे, जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार लहु काळे यांच्या ‘चकाट्या’ नामक चौकट कार्टुनची...!! ‘अ‍ॅग्रोवन’ आणि ‘बळीराजा’ या नियतकालिकांमध्ये लहु काळे ‘कार्टुन’ चित्रे देतात. एक साधारण अहवाल द्यायचा ठरविलं, तर २००७ ते २०१८ या काळामध्ये ‘अ‍ॅग्रोवन’मध्ये ‘चकाट्या’नामक चौकटी लहु काळेंनी ३ हजार, ९२५ एवढी व्यंगचित्रे रेखाटली आहेत. या आकडेवारीवरून आपल्या ध्यानात येईल की, लहु काळे यांचं ‘व्यंगचित्रण कलेतील’ योगदान किती मोठं आहे! त्यांच्या या प्रकाराला ‘पॉकेट कार्टुन’ अशी ओळख प्राप्त झालेली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ने घेतली, त्यांनी खास प्रमाणपत्र आणि पदक देऊन लहु काळे यांचा सन्मान केला आहे.

आपल्याला बर्‍याचदा ’कार्टुन’ म्हणजे ’व्यंगचित्रे’ याबद्दल एक समज झालेला असतो. ‘व्यंगचित्र’ म्हणजे कुणाचा तरी ’वीक पॉईंट’ अर्थात ’वैगुण्य’ शोधून भन्नाट रेखांकनात आकारबद्ध केलेले विनोद निर्माण करणार चित्र! व्यंगचित्रांमुळे, राजकीय असंतोषापासून तर अगदी दंगली-पुतळे जाळणे इथंपर्यंतच नाही, तर राजद्रोह-राष्ट्रदोहापर्यंत प्रकरणे घडली आहेत. काही व्यंगचित्रांनी तर जागतिक स्तरावरील राजकारणावर तसेच समाजकारणाला ढवळून काढलेले असल्याचा इतिहास सांगतो. त्यामुळे ’व्यंगचित्र’ ही ’हास्य चित्रे’च असतात, असा समज सर्वत्र रूढ झाला असतानाच, लहु काळे यांनी व्यंगचित्रांना आणखीही एक पैलू असतो, असे दाखवून दिले. त्यांनी ग्रामीण आणि शेतकरी जीवनाला समोर ठेवून अधिकाधिक व्यंगचित्रे चितारली. त्यांच्या व्यंगचित्रात कुणाबद्दलचं ‘व्यंग’ वा ‘वैगुण्य’ दाखविण्याचा भाग नसतो. त्यांच्या व्यंगचित्रात वर्तमान सामाजिक तसेच ग्रामीण वातावरणातील निरीक्षणांना स्थान दिलेले असते. त्यामुळे त्यांची ’व्यंगचित्रे’ ही ’सकारात्मक व्यंगचित्रे’ म्हणून अधिक परिणामकारक ठरलेली दिसतात.

व्यंगचित्रकार आणि सर्वसामान्य माणूस या दोहोंमधील मुख्य फरक म्हणजे, सभोवतालच्या वातावरणात जे काही निरीक्षणात दिसते ते रेखांकनाच्या रुपाने मात्र मार्मिकपणे मांडणे ज्यात शब्दांकन गरजेपुरतं आणि रेखांकन अचूकपणे केलेलं असतं. ही रेखांकन करण्याची क्षमता अनन्यसाधारण असते. सर्वसामान्य व्यक्ती, अशाप्रकारच्या क्षमतांमध्ये बसत नाही. एखादाच ‘ल़हु काळे’ असतो. तो सतत ग्रामीण आणि शेतकरी जीवनाशी समरस झालेला असतो, त्या वातावरणाशी एकरूप झालेला असतो. संभाजीनगरच्या, शासकीय कला महाविद्यालयात कला शिक्षणाची पदवी घेतलेले लहु काळे, यांनी घेतलेल्या कला शिक्षणाशी, त्यांनी अनुभवलेल्या ग्रामीण शेतकरी जीवनाशी संबंध जोडला. रंगांना आणि रेषांना ग्रामीण जीवनाचे संस्कार दिले. शेतीजीवनातील निरीक्षणांना रेषाबद्ध केले.

एका रेषेत हजार शब्दांचं सामर्थ्य असते. लहु काळेंनी हे सूत्र अवलंबिलं. रेषांना शब्दविरहित कटुसत्य कथन करण्याची ताकद मिळवून दिली. शेतकरी आणि ग्रामीण जीवन हे मुख्य सूत्र डोळ्यासमोर ठेवून लहु काळे सातत्याने व्यंगचित्र रेखाटत आहेत. सामाजिक प्रबोधन आणि जागृती या मुख्य हेतूनेच यांच्या कलेचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. त्यांनी सुमारे ५ हजार, ५०० ते सहा हजारांहून अधिक व्यंगचित्र चितारली आहेत, जी नियमित प्रकाशित झालेली आहेत. बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी दि. २९ ऑक्टोबर, १९७० ला जन्मलेले लहु भिवराज काळे यांचा लहानपणाचा काळ गावीच गेला. प्राथमिक शिक्षण पिंपळनेर येथे, तर माध्यमिक शिक्षण हे नेकनूर या जन्मगावी झाले. संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालयातून कलेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टला त्यांनी ‘डिप.ए.एड’ ही पदविका पूर्ण केली. १९९२ला एक घटना घडली. ‘पद्मविभूषण’ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे पाहण्याचा योग आला आणि लहु काळे हे व्यंगचित्रणाकडे आकर्षिले गेले.

संभाजीनगरातील दै. ‘मराठवाडा’मध्ये, ‘असं म्हणता‘ मुंबईतील ‘दोपहर का सामना’मध्ये ‘जरा संभलके‘ - तर ‘सकाळ’मधील, ‘बालमित्र’ पुरवणीतील ‘गंमत-जंमत‘अशा व्यंगचित्र मालिका, ‘पॅकेट कार्टुन‘, ‘प्रासंगिक व्यंगचित्रे’ खूपच वाचकप्रिय झाली. ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या चित्रांमध्ये कृषी क्षेत्रातील समस्या आणि शहरीकरणामुळे होणारी ससेहोलपट सातत्याने दिसते. कृषिक्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानतात. अशा परिस्थितीत या क्षेत्राला जितके महत्त्व द्यायला हवे तितके ते दिले जात नसल्याची खंत त्यांच्या चित्रांतून दिसते. नोकरी सांभाळून सातत्याने एका विषयावर व्यंगचित्रे रेखाटण्याचे काम करणे, ही बाब असामान्य आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या व्यंगचित्रात त्यांची ओळख सांगण्यासाठी ’एखादा कॉमनमॅन’सारखा किंवा ’एखाद्या कुत्र्या’सारखा वा एखादे सर्वसमावेशक असे कॅरेक्टर नसते. एखादा ‘मॅस्कॉट’देखील नसतो. अत्यंत गरजेपुरत्या रेषा, ओळखीपुरते मानवी आकार यांची मांडणी त्या दिवसाच्या मानवी आस्थाजनक विषयांशी जोडलेली आणि जी ‘चौकट’ वाचकांनी पाहिली की, ते समजून जातात. आपण पाहत असलेलं कार्टुन हे ही लहु काळे यांच्याच प्रतिभाशक्तीतून साकारलेलं आहे. इतकी पकड, इतके वैशिष्ट्य आणि इतका कर्मठपणा जोपासत लहु काळेंनी त्यांच्या ’पॉकेट कार्टुन्स’ना वैश्विक व्यासपीठावर विराजमान केलेे आहे.

अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संघटना अर्थात ’कार्टुनिस्ट कंबाईन’च्या प्रत्येक संमेलनात त्यांच्या कार्टुन्सचा सहभाग असतोच. ऑगस्ट २०१५ मधील ‘सलाम सलाम’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘जलजागृती’ या विषयावरील मार्च २०१६ च्या चित्रप्रदर्शनातही त्यांची व्यंगचित्रे, रसिकांना आकर्षून घेत होती. व्यंगचित्रकारांची संख्या महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात आता रोडावत चाललेली दिसते आहे, अशा परिस्थितीत लहु काळेंच्या व्यंगचित्राची दखल ‘लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’सारख्या जागतिक स्तरावर घेतली जाणे, ही व्यंगचित्रकलेला एक प्रकारे प्रोत्साहन देणारी बाब आहे . त्यांच्या व्यंगचित्रांची दखल विविध वाहिन्यांनीदेखील घेतलेली आहे. आज खूप दैनिकांत नियमित व्यंगचित्रे देणार्‍या व्यंगचित्रकारांची गरज आहे. परंतु, व्यंगचित्र जितक्या गतीने, जनमनावर अधिराज्य गाजवतात तितक्या लवकर त्यांची शैली आत्मसात करता येत नाही. कारण, व्यंगचित्र साकारताना, त्या व्यंगचित्रकाराचं चौफेर वाचन असायला हवं. महत्त्वाचं काय, हे त्याला आकलन व्हायला हवं आणि चित्रबद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या विषयाची निवड करण्याचं कौशल्य त्याच्यात हवं असतं. या गुणांना आत्मसात करण्यासाठी सातत्य हवं असतं.

लहु काळे म्हणतात, “समाजात व्यंगचित्रांची आवड निर्माण करण्याची प्रमुख जबाबदारी व्यंगचित्रकार आणि प्रसारमाध्यमे यांची आहे. व्यंगचित्रकारांना अधिक सजग राहून दैनंदिन जीवनातील विसंगता, विनोद यांच्या माध्यमातून आशयपूर्ण व्यंगचित्रे निर्माण करावीत आणि प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी द्यावी,” अशी त्यांची साधीसुधी अपेक्षा आहे. त्यांच्या व्यंगचित्रांचे अनेक नेते, अभिनेते, चाहते आहेत. अनेक शेतकर्‍यांना, काळेंच्या व्यंगचित्रांमुळे बळ मिळते. त्यातूनच काळेंना, त्यांच्या व्यंगचित्रांमुळे, आत्महत्या थांबविण्यासाठी यश मिळाले आहे.

पुण्यातील केंद्रीय विद्यालय, आर्मी परिसर येथे ’कलाशिक्षक’ म्हणून कार्यरत असणार्‍या लहु काळे यांना त्यांच्या सामाजिक व्यंगचित्राबद्दल भविष्यातही बळ मिळो, हीच त्यांना सदिच्छा!!

प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३