नवी दिल्ली : सोनेतारण कर्जाप्रमाणेच आता चांदीवर सुध्दा कर्ज मिळणार आहे. यासाठी पॉलिसी बनवण्याची मागणी देशभरातील बँकांनी आरबीआयकडे केली आहे. सध्याच्या गोल्ड मेटल लोनच्या धर्तीवर सिल्व्हर मेटल लोनसाठी नवीन धोरण बनवायला हवे, असे बँकांचे म्हणणे आहे.
यामुळे बँकांना आपल्या ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांवरही कर्ज देता येईल. देशात चांदीची निर्यात सुमारे २५,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँका सोन्याच्या दागिन्यांवर सोनेतारण कर्ज देऊ शकतात. पण आता सोनेतारण कर्जाप्रमाणेच चांदी तारण ठेवून कर्ज देण्यासाठी पॉलिसी बनवण्याची मागणी बँकांकडे होत आहे.
जेम ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या नवीन आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात चांदीच्या दागिन्यांची निर्यात १६.०२% ने वाढून २३,४९२.७१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २०,२४८.०९ कोटी रुपये इतकी होती.
भारतीयांना नेहमीच सोने आणि चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण आहे. भारतातील लोकं सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. आता जर आरबीआयने चांदी तारण ठेवून कर्ज देण्याला मंजुरी दिल्यास चांदी खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.