भक्त प्रल्हादासारखे भक्त दुर्मीळ असतात. कुठल्याही संकटांनी डगमगून न जाता, आपल्या ध्येयापासून यत्किंचितही दूर न होणे, हा प्रल्हादाचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून आदराने रामनाम घेत राहिल्यास आपण उद्धरून जाऊ. समर्थांना बालक भक्त प्रल्हादाचे मोठे कौतुक आहे.
समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांतून निरनिराळ्या प्रकारांनी नामाचा महिमा सांगितला आहे. तत्कालीन समाजाला पुराण भागवत इत्यादी, धार्मिक ग्रंथातील कथा माहीत होत्या. त्यामुळे आपल्या विधानांच्या पुष्ठ्यर्थ स्वामींनी प्रचलित पुराणकथांचे दाखले दिलेले आहेत. रामानामाने उद्धरून जाणार्यात पुरुष, स्त्री, पापी समाजबहिष्कृत असे सर्व प्रकारांचे लोक असतात. परमेश्वर रामनाम घेणार्या व्यक्तीत कसलाही भेदभाव करीत नाही. तथापि, घेतलेले नाम आदरपूर्वक श्रद्धापूर्वक व मनापासून घेतलेले असावे, एवढीच अपेक्षा उद्धारासाठी पुरेशी असते. नामाचे सामर्थ्य वर्णन करताना, अजाणता घेतलेले रामनामही कसे काम करते, हे स्वामींनी मागील श्लोक क्र. ९५ मध्ये सांगितले आहे. त्यासाठी भागवतातील अजामेळ ब्राह्मणाचे व पुराणातील पोपट पाळणार्या व त्याला राम, विठ्ठल म्हणायला शिकवणार्या पिंगला नावाच्या गणिकेचे उदाहरण स्वामींनी त्या श्लोकातून दिले आहे. हे सांगण्यामागे स्वामींचा उद्देश असा की, अजाणता घेतलेल्या भगवंताच्या नामाचे जर पापी गणिका यांचा उद्धार होतो, तर समजून-उमजून जाणीवपूर्वक घेतलेल्या नामाने जीवाचा उद्धार निश्चित होईल.
सर्वसामान्यपणे लोकांचा कुळावर म्हणजेच घराण्यावर विश्वास असतो. त्यांना वाटत असते की,अमुक कुळात जन्मलेला म्हणजे तो सुलक्षणी असला पाहिजे आणि तमूक घराण्यात जन्मलेला म्हणजे तो कुलक्षणी असणार. समर्थकाळीसुद्धा असा समज होता. तथापि, मान घेणारा भक्त कोणत्या खुळात जन्माला आहे, हे भगवंत पाहत नाही. रामनामाने उद्धरून गेलेल्यांचा त्यांच्या कुळाशी, घराण्याशी संबंध दाखवला जात नाही. ते नामधारकाचे स्वतःचे कर्तृत्व साधना असते. पापीकुळात जन्म होऊनही रामनामाने उद्धरून जाताना साधकाचे कुळ त्याच्या उद्धाराच्या आड येत नाही. यासाठी स्वामी आता दैत्य कुळात जन्मलेल्या प्रल्हादाचे उदाहरण पुढील श्लोकात देत आहेत-
महां भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळीं।
जपे रामनामावलीं नित्यकाळीं।
पिता पापरूपी तया देखवेना।
जनीं दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥
भक्त प्रल्हादाचा जन्म राक्षसकुळात झाला होता. त्यामुळे दैत्यकुळातील दुर्गुण व नारायणाचा रामनामाचा द्वेष हे त्याच्या ठिकाणी अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. प्रल्हादाच्या ठिकाणी क्षमाशील वृत्ती व समंजसपणा हे गुण जन्मजात होते. सहनशीलतेबरोबर अखंड नारायणाचे नाममुखी घेऊन तो जन्माला आला होता. तो भगवंताचा निस्सीम भक्त होता. पण, प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू याला ते सहन होत नसे. तो रामनामाचा आणि भगवंताचा द्वेष करीत असे. त्याने प्रल्हादाला सांगून पहिले धमकावून पाहिले. पण, भक्त प्रल्हाद काही नाम व परमेश्वराची भक्ती सोडायला तयार होईना.
हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण, सर्व प्राणघातक संकटांतून प्रल्हाद निभावून गेला. उलट प्रल्हादानेच हिरण्यकश्यपूला रामनाम घ्यायला व भगवंताला शरण जायला सांगितले. मदाहंकारी हिरण्यकश्यपूला ते सहन झाले नाही. तो प्रल्हादाला म्हणाला, “सांग कुठे आहे तुझा तो नारायण! मला दाखव, मी त्याच्याशी युद्ध करायला तयार आहे. तो माझे काहीही करू शकणार नाही. कारण, मला वर प्राप्त आहे की, मला दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर, तलवारीने अथक शस्त्राने, माणसाकडून किंवा हिंस्र प्राण्याकडून जमिनीवर अथवा आकाशात मृत्यू मला स्पर्शही करू शकणार नाही.” प्रल्हाद विनम्र भावाने म्हणाला, “माझा नारायण सर्वत्र आहे.” ते ऐकल्यावर हिरण्यकश्यपू म्हणाला, “मला तो खांबातही असेल,” असे म्हणून त्याने अत्यंत गर्विष्टपणे खांबाला जोरात लाथ मारली. त्यातून भगवंत नृसिंह या अवतारात प्रगट झाले. उंबर्यावर बसून त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर ठेवला आणि तीक्ष्ण नखांनी फाडून त्याला यमसदनाला पाठवले. पुढे नारदांनी विष्णूंना विचारले की, “भगवंत, हिरण्यकश्यपूला वरदान मिळाले असूनही तुम्ही त्याला कसे काय मारले?” त्यावर भगवान म्हणाले,
“वरदानाच्या सर्व अटी सांभाळून मी त्याला ठार केले. वर मिळाल्याने तो मदांध झाला होता. तो अनेकांचा छळ करीत असे. सतत माझे नाव घेणार्या बालक प्रल्हादाला त्याने अनेकदा मारून टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या पापरुपी हिरण्यकश्यपूचा मी संहार केला. मी अर्धे शरीर मानवाचे व अर्धे हिंस्र श्वापदाचे धारण केले. तेव्हा त्याला मारणारा मानव नव्हता किंवा हिंस्र श्वापद नव्हते. मी त्याला उंबर्यावर बसून मांडीवर आडवा घेऊन मारला म्हणजे त्याचा मृत्यू घरात झाला नाही किंवा बाहेर झाला नाही, जमिनीवर झाला नाही अथवा आकाशात झाला नाही. मी त्याला सायंकाळी मारले म्हणजे तो दिवस नव्हता व रात्रही नव्हती. तलवार किंवा शस्त्र नको म्हणून मी त्याला नखांनी फाडून मारला.” अशारितीने वरदानाच्या सर्व अटी सांभाळून बुद्धीकौशल्याने भगवंतांनी नामधारक प्रल्हादाला त्रास देणार्या हिरण्यकश्यपूला ठार मारून आपल्या भक्ताला वाचवले.
मानवी मनात अनेक संस्कार दडलेले असतात. मनोभूमी अथांग असल्याने बाहेरील पाठपुराव्याने कोणता संस्कार जागृत होऊन मानवी जीवन सदाचारी अथवा दुराचारी होण्याकडे झुकेल, ते सांगता येत नाही. नामाने सुसंस्कार जागे होण्यास मदत होते. भगवंताच्या सतत नामस्मरणाने पूर्वायुष्यातील आध्यात्मिक संस्कार प्रकट होऊ लागतात. माणूस सदाचरणाने वागू लागतो. आयुष्यात घडलेल्या पापाचरणाचा पश्चाताप होऊन अंत:करण शुद्ध होऊ लागते, अशा निर्मळ अंत:करणात भगवंताचा प्रकाश पडून जीव उद्धरून जातो. परंतु, प्रल्हादासारखे भगवदक्त दैत्य कुळात जन्माला येऊनही मूळचेच मुक्त असल्याने नामाने ते सतत भगवंताच्या सान्निध्यात असतात. आपल्या जीवनादर्शाने ते विश्वाला प्रेरक ठरतात. आपल्यासारख्या सामान्य माणसांना सतत रामनामाचा जप करून आध्यात्मिक संस्कार जागे करून घ्यावे लागतात. त्यानुसार सदाचरण, सच्चरित्र नीतिद्वारा अहंकाराचा त्याग करून मोक्षाची वाटचाल स्वप्रयत्नाने करावी लागते. भक्त प्रल्हादासारखे भक्त दुर्मीळ असतात. कुठल्याही संकटांनी डगमगून न जाता, आपल्या ध्येयापासून यत्किंचितही दूर न होणे, हा प्रल्हादाचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून आदराने रामनाम घेत राहिल्यास आपण उद्धरून जाऊ. समर्थांना बालक भक्त प्रल्हादाचे मोठे कौतुक आहे. कारण, पुढे श्लोक क्रमांक १२१ मध्ये-
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।
म्हणोनी तयाकारणें सिंह्य जाला।
असा भक्त प्रल्हादाचा पुन्हा संदर्भ दिला आहे. त्यामुळे भक्त प्रल्हादाप्रमाणे मुखात सतत रामनाम असल्याशिवाय माणसाला मुक्ती कशी मिळेल? रामानामाशिवाय मानवाच्या ठिकाणचा अहंकार कमी होणार नाही. हा विषय स्वामींनी पुढील श्लोकात घेतला असल्याने पुढील लेखात तो सविस्तरपणे पाहता येईल. (क्रमश:)