रानमेवा आणि लोकसाहित्य

12 Jun 2023 15:36:05



ranmeva
माझ्या मावळातील अभ्यास सहलीनिमित्ताने पाने, फुले आणि फळांचा रस, रंग आणि गंधाबरोबरच, मला मावळातील माझ्या आजीने रानमेव्याबद्दल सांगितलेले मौखिक साहित्य आणि त्यामधून आलेले अनुभव आणि त्याचे गुणधर्म येथे नमूद करत आहे. खाद्यपदार्थांचा सुळसुळाट आणि जंक फूडचे असंख्य प्रकार मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याआधी रानमेवा हा आवडीचा खाऊ होता. करवंद, जांभूळ, आंबा, तोरण, आमगूळ आणि उंबर हा उन्हाळ्यातील जीवनशैलीचा आणि दैनंदिन गरजांचा एक भाग होता.

मानवाची भूक ही वैश्विक गरज असल्याने, आपल्या जंगलातील मिळेल त्या वस्तू खाऊन ही भूक भागविली जायची. हे नको ते नको असे खाण्याचे नखरे नव्हते. करवंदासारखा रानमेवा मुबलक प्रमाणात मिळाल्यावर झालेला आनंद आणि ’माझ्या गावाला’ या शब्दांमधून निसर्गाशी असलेली जवळीक पुढील मौखिक ओवीमधून व्यक्त झाला आहे.
मला लागली भूक हात घालू कोण्या जाळी
माझ्या गावाला पिकली करवंद झाली काळी



ranmeva


भूक शमविण्यासाठी काही रानमेव्यांनी पोट भरत नसले की तो रानमेवा घरी आणून त्यात इतर काही सामग्री घालून केलेले चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आजकाल दुर्मीळच. त्यामधलाएक पदार्थ म्हणजे भोकराच्या चिकट द्रवात कणिक, सुंठ आणि गूळ घालून केलेले चविष्ट घावण. तो पदार्थ पोटभर खाईपर्यंत भुकेचा होकार येत राहायचा.
मला लागली भूक
किती भुकेला होकरू
माझ्या गावाला पिकली भोकरू
चिक्कू कुळातील आळू एक अपरिचित रानमेवा. पाऊस सुरू झाला की, पिकणारा, आता हे रानमेवा वैभव दुर्मीळ होत चाललंय. रानमेव्याचा वापर हा चाखण्याबरोबरच मनातील भावना व्यक्त करण्यासाठीदेखील केला जात होता, म्हणूनच माहेरी आलेली मुलगी सासरी न जाता, तिला दोन चार दिवस अजून पाहूणचार मिळण्यासाठी, आई रानमेव्याला पाड लागल्याचे कारण सांगते.
रडत वरडत मैना निघायली साळू
रडूनी आई सांग पाड लागलत आळू
मला पावसाळ्याच्या सुरुवातीला अभ्यास सहलीमध्ये आळू कधीच अळी शिवाय मिळाला नाही. मग नंतर कळल की हे आळू पावसाळ्याच्या अगोदर खायचे असतात. पाड लागल्यावर हे आळू राखेमध्ये, भाताच्या तुसामध्येकिंवा इतर पद्धतीने पिकवतात. भावना व्यक्त करण्यासाठी हे रानमेव्याचं मौखिक साहित्य आणि त्याचा आधार घेऊन दिवसेंदिवस डोंगरकुशीत जपलेल्या निसर्गाची आणि रानमेव्याची जपणूक. वरील ओवीमधून आळू हा रानमेवा पाड लागल्यावर पिकत घालावा लागतो, असे समजते.
वैशाख वणव्यात इतर अत्याधुनिक गारवा देणार्‍या वस्तूपेक्षा झाडांची सावली, रानमेवा आणि थंडावा हा महत्त्वाचा असे मग तो मिळवण्यासाठी रणरणत्या उन्हात एखादा अवघड डोंगरदेखील चढण्याची तयारी असते.
माझ्या गावाकड पाड लागला उंबयीरू
येवढ्या उन्हामंधी घेतो मी डोंगयीरू

’डोंगर चढणे’ या शब्दाला ’घेतो’ हा मावळी शब्द माझ्यासाठी नवीन आहे. उंबराला नेहमी नित्य फळ येतात हे सांगण्यासाठी-
भूक लागली पोटाला जाऊ कोण्या
डोंगराला नित फळ उंबराला
खंडाळ्यातील नागफणी डोंगरावचा, इंद्रायणीच्या उगमाजवळचा पानथळ जागेतील उंबर आणि करंज बनातील रानमेवा आणि हिरवीकंच पाने मला विलक्षण गारवा देतात.


ranmeva
उंबर या रानमेव्याच्या गुलाबी रंगामुळे आणि गुच्छातील लोंबकळत्या मांडणीमुळे त्याला गुलाब फुलांच झूंबर म्हटलं आहे. वैशाख वणव्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी उंबर खाण्याचा आरोग्यदायी सल्ला या लोक साहित्यामधून मिळतो.
लाले लाल जसं गुलाबाच झुंबार
वैशाख वनव्यात खा उंबराच उंबार
फळांबरोबरच त्याच्या झाडांच्या सावलीने आणि पानांनी माणूस आनंदी होत होता. पूर्वी लग्न समारंभासाठी विलायती फुलावळ किंवा गुबगुबीत लॉनच्या लाद्या किंवा हॉल नव्हते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करून जांभूळ, आंबा आणि भोकरीच्या पाल्याचा मांडवटहाळा करायचा, आणि त्याखाली लग्नसमारंभ होत असे. थकलेल्या जीवाला थंडगार मांडववारा घेतल्याशिवाय चैन पडत नसे.
मांडवाला मेडी नका घालू हो कुंबळी
बंधूंच्या मळ्यात वेली गेल्यात जांभळी
जांभळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने मांडवासाठी इतर काटेरी कुंबळीसारखी झाड वापरण्यापेक्षा बंधूंच्या मळ्यात वेली म्हणजे उंच गेलेल्या जांभळी वापराव्यात असं आजी सांगायची. आधुनिक सुखसुविधांचा अभाव असणार्‍या पूर्वीच्या काळात, रानमेव्याने लोकसाहित्याच्या माध्यमातून मानवाच्या जगण्याचा आणि मनाचा पाया भक्कम केलाच, पण आपला हरीत वारसादेखील संरक्षित करून घेतला.

आळू, करवंद, आमगूळ, उंबर यासारखी फळे शरीरातील जीवनसत्वांची कमतरता भरून काढत होते. या लोकसाहित्यामधून ‘रानमेवा’ ही परंपरा अजूनही जपली गेली आहे. आता करवंदीचा वापर काही ठिकाणी काटेरी कुंपणासाठी होत आहे. रायवळ आंब्याची जागा हापूसने घेतली आहे. रानमेव्याच्या जीवावर जगणारी रानमाणस आजकाल जमिनी विकून आपल्याच डोंगर रांगांमध्ये उपरी झाली आहेत आणि काही दिवसांनी विकास कामांमुळे हा रानमेवादेखील राहणार नाही. मी आजीला म्हणलो आता डोंगर बोडके झालेत हिरवीगर्द वनराई नष्ट होत आहे. यावर तीने जंगलात होणारे बदल मार्मिकपणे मांडले आणि म्हणाली-


तोडली जूनी झाड उभ्या राहिल्या देवळ्या
खांद्यावर घोंगडी काय पाहतो मावळ्या

- किशोर सस्ते
Powered By Sangraha 9.0