मुंबई : उध्दव ठाकरे परिवार कॉर्लई १९ बंगलो घोटाळा प्रकरणी २०१२ ते २०१७ च्या फाईल गायब असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. अलिबाग रायगड जिल्हा परिषदेने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंबंधी FIR दाखल होणार असल्याचे ही सोमय्यांनी म्हटले आहे. यासंबंधी किरीट सोमय्यांनी ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.
प्रकरण काय ?
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील नऊ एकर जागा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर याच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे, असे सांगितले जाते. या जागेवर कथित १९ बंगले असल्याची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लपवून ठेवली असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करीत आहेत.
दिवंगत अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी करण्यात आली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करीत होते. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दबाव आणून अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रात छेडछाड केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.