जयंतराव सहस्रबुद्धे आधुनिक विज्ञानऋषी!

11 Jun 2023 18:03:27
Jayantrao Sahasrabuddhe modern scientist


ज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नुकतेच देहावसान झाले. आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहेच! जयंतराव यांचा सहवास लाभलेले महाराष्ट्रात अनेक संघ स्वयंसेवक तथा ’विज्ञान भारती’चे कार्यकर्ते आहेत, अशा सर्वांची जयंतराव यांच्याशी असलेली आपुलकी, प्रेम व जिव्हाळा नेहमीच संस्मरणीय राहील.

जयंतराव यांच्या संघसमर्पित जीवनाबद्दल वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. परंतु, त्यांच्याबद्दल काही गोष्टी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतात.गिरगाव येथील एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेले जयंतराव लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे वडीलदेखील संघ स्वयंसेवक. त्यामुळे समर्पणाचे धडे अगदी लहानपणापासून त्यांनी गिरवले होतेच! त्यांचे बंधूदेखील प्रचारक म्हणून निघाले होते. एका सामान्य कुटुंबातील दोन उच्चशिक्षित मुले, आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याच्या सर्व संधी नाकारून संघासाठी तथा देशासाठी आपले जीवन समर्पित करतात, हे आजच्या युवापिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

स्व. जयंतरावांनी गिरगावात संघकाम करत असतानाच, उच्चविद्या प्राप्त केली. त्यांना ’भाभा अणुसंशोधन केंद्र’ येथे वैज्ञानिक या पदावर नोकरी देखील मिळाली. लौकिक जीवनात एका उच्च पदावर ते विराजमान होते. काही वर्षं ’भाभा अणुसंशोधन केंद्रा’त त्यांनी सेवादेखील दिली. मात्र, मनात समाजोत्थानाची ज्योत सदैव तेवत असे. अशा वेळी जयंतरावांनी उच्च पदस्थ शास्त्रज्ञाची नोकरी सोडून, समाजाचे संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी कार्य सुरु केले, ते अगदी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत! ’कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती’ हे वचन जयंतरावांच्या जीवनाकडे बघितल्यावर अगदी सार्थ वाटावे. गिरगावातील एका चाळीत राहणार्‍या मध्यमवर्गीय तरुणाला आपल्या कुटुंबाला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या, मध्यमवर्गीय स्तराला उच्च मध्यमवर्गीय करण्याच्या सर्व शक्यता व सुवर्ण संधी असताना, त्यागाचा आणिसमाजासाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेणे, हे खरोखरच एक दिव्यत्वाचे लक्षण आहे.

जयंतरावांनी प्रचारक म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांत काम केले. विशेषतः कोकण प्रांतात अधिक काळ काम करण्याचे त्यांना दायित्व मिळाले. कोकण प्रांत प्रचारक म्हणून देखील ते कार्यरत राहिले. त्यानंतर ’विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली गेली. गेल्या एक दशकाहून अधिक काळ ते ’विज्ञान भारती’चे कार्य सांभाळत होते. ’विज्ञान भारती’ला त्यांनी वेगळ्या उंचीवर पोहोचविले. ’ज्ञान संगम’सारखे अनेक अनोखे उपक्रम ’विज्ञान भारती’ने राबविले, त्यातून नवनवीन कार्यकर्ते संघटनेला लाभले. त्यातूनच भारतीय विज्ञानाला अधिक चालना देण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ पुढे आले, तथा येत आहेत. यातून आगामी काळात भारतीय विज्ञानाचे आधुनिक युगातील योगदान नक्कीच वाढेल, असा मला विश्वास वाटतो.

आपण सर्वजण विज्ञान क्षेत्रातील अनेक ऋषींच्या योगदानाबद्दल नेहमीच ऐकत आलो आहोत, त्यापासून प्रेरणादेखील घेत असतो! जयंतराव सहस्रबुद्धे यांच्यासारख्या भारतीय विज्ञान जगताच्या संघटनेसाठी समर्पित व्यक्तींना देखील ऋषींच्या रूपात समाज बघत असतो व त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. स्व. जयंतराव आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे कार्य व समर्पण येणार्‍या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. एवढेच या लेखाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो!
 
 
 
-मंगलप्रभात लोढा

(लेखक पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य व उद्योजगता मंत्री, महाराष्ट्र राज्य आहेत.)



Powered By Sangraha 9.0