इस्रायल सरकारच्या ‘इमिग्रेशन’ विभागाकडून बांधकाम क्षेत्र आणि नर्सिंग क्षेत्रातील आवश्यक असणार्या लोकांच्या भरतीसाठी कार्यपद्धती ठरविण्यात येत आहे. इस्रायलमधील नियोजित दहा हजार नोकर्यांचा ‘पैस‘ पुढे विस्तारालाही जाऊ शकेल आणि तो ४० हजार नोकर्यांच्या संधीपर्यंतही जाऊ शकेल.
इस्रायल आणि भारताच्या आर्थिक, संरक्षण साहित्य उत्पादन, राजनैतिक संबंधांमध्ये नवनवीन क्षेत्रे आणि त्यामधील संधी समोर येत आहेत. भारतामधील सुमारे दहा हजार लोकांना इस्रायलमधील बांधकाम आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देण्याचे इस्रायलच्या सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. इतकी वर्षे या क्षेत्रामध्ये इस्रायलमध्ये राहणार्या पॅलेस्टिनी किंवा पॅलेस्टाईनमधील अरबी लोकांना नोकरीची संधी देण्यात येत होती. पण, या लोकांना त्यांना मिळालेले काम आणि इस्रायलची राष्ट्रीय सुरक्षा दुय्यम वाटत आलेली आहे आणि वेळोवेळी ते सिद्धही झालेले आहे. नोकरी मिळाल्याबद्दल इस्रायल सरकारप्रती कृतज्ञता, स्वतःचा विश्वास निर्माण करणे हे पॅलेस्टिनी कामगारांचे कर्तव्य ठरते. पण, ’इस्लाम खतरे में हैं’ अशी कोणी आरोळी ठोकल्यानंतर वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींवर पाणी टाकून अतिरेकी संघटनेच्या मागे जाऊन उभे राहणे, या पॅलेस्टिनी कामगारांच्या भूमिकेमुळे इस्रायलच्या सरकारने हा मध्यम मार्ग शोधला असावा.
इस्रायल आणि भारत हे दोन्ही देश इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या समस्येला गेल्या अनेक वर्षांपासून तोंड देत आहेत. अर्थात, इस्रायल हा देश कायम अस्थिरतेच्या काठावरच उभा असलेला दिसतो. पण, आता भारतामध्येही इस्लामी मूलतत्ववाद्यांनी धुमाकूळ घालावयास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रप्रेमी नागरिकही या गोष्टींमुळे त्रस्त आहेत. भारतीय लोकांची विश्वासार्हता इस्रायलला खुणावत असावी. किंबहुना, आखाती देशांमध्ये काम करणार्या बहुसंख्य भारतीयांना तेथील अरबी कंपन्यांमध्ये ‘विश्वासू लोक’ म्हणूनच ओळखले जाते. भारतीय लोक इमानेइतबारे प्रामाणिकपणे काम करून, स्थानिक कायदा आणि नियमांचे पालन करतात, हा आखाती देशांमधील तेथील सरकारांचा अनुभव आहे.
हिब्रू भाषेतील अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध होणार्या संधींबाबत लिहिलेले आढळून येते. सामान्य इस्रायली नागरिकांनाही भारताबद्दल आणि भारतातील लोकांबद्दल ममत्व वाटते ही वस्तुस्थिती आहे. इस्रायलमधील स्थानिक ज्यू रहिवासी कोणत्याही पॅलेस्टिनी अरबी रहिवाशांच्या बरोबर राहू इच्छित नाहीत. गेल्या अनेक दशकांमध्ये जगाच्या पाठीवर सर्वात जास्त सुरक्षित आणि स्थानिकांमध्ये मिळून मिसळून गेलेले ज्यू लोक असतील, तर ते फक्त भारतामध्येच! भारताने सर्व पंथ, धर्म, समुदायाच्या लोकांना भारतामध्ये आसरा दिलेला आहे आणि हा आपला इतिहास आहे. ’जगा आणि जगू द्या’ हाच या विश्वासार्हतेमागील संदेश आहे.
गेल्या काही वर्षांपासून ’वेस्ट बँक’ परिसरात इस्रायलचे बांधकाम क्षेत्र विस्तारते आहे. बांधकाम क्षेत्र आणि हॉस्पिटल्समधील नर्सिंग क्षेत्रात काम करू इच्छिणार्या भारतीय लोकांना संरक्षित वातावरण निर्माण करून देणे, ही इस्रायल सरकारची मोठी प्राथमिक जबाबदारी असेल. अर्थात, भारतीयांच्या इस्रायलमधील आगमनामुळे स्थानिक पॅलेस्टिनी लोक बिथरण्याची शक्यताही अधिक आहे. तसेच या गोष्टींमुळे भारतातील पॅलेस्टिनीप्रेमी लोकांना पॅलेस्टाईनबद्दल उमाळा जागृत होण्याची शक्यता आहेच. म्हणजे इथल्या भारतीयांना इस्रायलमध्ये नोकर्या मिळाल्या नाही तरी चालेल, पण पॅलेस्टिनी लोकांचे इस्रायलमध्ये भले झाले पाहिजे, असे करंटे विचार करणार्या लोकांची भारतामध्ये कमतरता नाही. भारत सरकारलाही या ’नॅरेटिव्ह’ला (कथन संहिता) कसे हाताळावयाचे याचा विचार करावा लागेल. काही कतार, ओमान, इराणसारखे अरबी देशही पॅलेस्टिनी लोकांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहेच. त्यामुळे या सर्व सारासार गोष्टींचा विचार करणे भारत सरकारला भाग आहे.
इस्रायल सरकारच्या ’इमिग्रेशन’ विभागाकडून या बांधकाम क्षेत्र आणि नर्सिंग क्षेत्रातील आवश्यक असणार्या लोकांच्या भरतीसाठी कार्यपद्धती ठरविण्यात येत आहे. इस्रायलमधील नियोजित दहा हजार नोकर्यांचा ‘पैस‘ पुढे विस्तारालाही जाऊ शकेल आणि तो ४० हजार नोकर्यांच्या संधीपर्यंतही जाऊ शकेल. वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठीही ’केअर टेकर’ म्हणून त्या क्षेत्रातील शिक्षित लोकांना संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सर्व नोकर्यांमध्ये वेतनही उत्तम असेलच, अशी अपेक्षा करता येईल. हे वेतन आखातातील, युरोपियन या समकक्ष नोकर्यांच्या वेतनाशी ताडून बघितले जाईलच!
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी मे महिन्यात भारताला भेट दिली होती. तेव्हा या गोष्टींवर प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या भेटीदरम्यान एली कोहेन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येते. इस्रायलच्या अधिकार्यांनी भारतातील या क्षेत्रात शिक्षण देणार्या संस्थांना भेटी दिल्या. या भेटीनंतर त्या अधिकार्यांचा या संस्थांबद्दलचा अभिप्राय चांगला आणि लक्षणीय होता. भारतीय संस्थांमधील हे प्रशिक्षित लोक मेहनती, अनुभवी आणि उत्तम इंग्रजी बोलता येणारे होते, असे त्यांनी त्यांचे मत नोंदवले आहे.
इस्रायलला पहिल्यांदा भेट देणारे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. त्यांच्या इस्रायलला दिल्या गेलेल्या भेटीनंतर भारत आणि इस्रायलमधील संबंधांमध्ये उत्तरोत्तर वाढच होत गेलेली दिसते. नुकतीच इस्रायलमधील हैफा बंदराचा कारभार भारताच्या उद्योगपतींकडे आला आहे, हे आपण बघतोच आहोत. यामुळे भारताला सामरिक बळही मिळाले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. भारत आणि युएईमध्ये समुद्राखालून रेल्वे बांधण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येते. तसेच, युएई, सौदी अरेबिया ते इस्रायलपर्यंत (व्हाया जॉर्डन) रेल्वे मार्ग बांधण्याचे नियोजनही असल्याचे सांगण्यात येते. भारत, ओमान, युएई अशा समुद्री वाहतुकीच्या संख्येमध्ये वाढ करण्याचेही नियोजन आहेच. या सर्वांचा विचार करता, भारतीय कामगारांनी इस्रायलमधील बांधकाम क्षेत्र आणि नर्सिंग क्षेत्रामधील नोकर्यांमधील संधींकडे बघावयास हवे. इस्रायलमधील ज्यू लोकांची थोडी अपरिचित अशी ‘हिब्रू‘ भाषा शिकवणार्या लोकांचीही आता यापुढे गरज भासू शकेल.
‘वेस्ट बँक’ आणि गाझा पट्टीतील सुमारे एक लाख लोक इस्रायलमध्ये काम करतात. पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलमध्ये काम करता येण्यासाठी पॅलेस्टिनी एजंटांना महिना ८०० डॉलर्स द्यावे लागतात, असे सांगितले जाते. अनेक अरबी देश पॅलेस्टाईनमधील परिस्थितीची पूर्वीच्या काश्मीरमधील परिस्थितीशी तुलना करतात. पण, भारताने ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर आणि नुकतीच ‘जी २०’च्या परिषदेचा एक कार्यक्रम काश्मीरमध्ये यशस्वीरित्या पार पडल्यानंतर काश्मीरची कोणत्याच प्रकारे पॅलेस्टाईनशी तुलना होऊ शकत नाही, हे आता सिद्ध झालेले आहे. इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांमधील वाढते सहकार्य यापुढील काळात दोन्ही देशांसाठी उपयोगी ठरणार आहे, हे निश्चित. इस्रायलमधील हिरे व्यापार, आधुनिक संरक्षण साहित्य उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान, सायबर क्षेत्रातील इस्रायलने घेतलेली भरारी, कमी पाण्यात उत्तम शेती करण्याचे तंत्रज्ञान, समुद्राच्या खार्या पाण्याचे गोडे पाणी करण्याचे तंत्रज्ञान या सर्वांमध्ये हे दोन्ही देशांमधील सहकार्य या पुढील काळात विस्तारतच जाणार आहे.
सनत्कुमार कोल्हटकर