जयंतराव एक प्रसन्न व्यक्तिमत्व

    11-Jun-2023
Total Views |
Article by Prabhakar Ingale on jayantrao

जयंतराव म्हटले की, डोळ्यासमोर येते ते प्रसन्न आणि स्मित हास्यधारी व्यक्तिमत्व. जयंतरावांसोबत पहिल्यांदा भेट झाली ती फेब्रुवारी २०१० मध्ये, पुण्याहून नाशिकला जात असताना. फर्ग्युसन महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी नाशिक येथे दोन दिवसांची विज्ञान लेखनावर कार्यशाळा आयोजित केली होती. पुण्याहून नाशिकला निघताना कारमध्ये मी, जयंतराव आणि ‘पब्लिकेशन अ‍ॅण्ड इन्फार्मेशन डायरेक्टोरेट’, दिल्ली (पीआयडी)मधील माझे माजी सहकारी आणि तेव्हा ‘एनसीएसटीसी’मध्ये कार्यरत असलेले डॉ. मनोज पटैरिया होते. त्या पहिल्या प्रवासातच जयंतरावांचे अभ्यासू व्यक्तिमत्व अनुभवायला मिळाले.

नंतरही आम्ही खूप एकत्र प्रवास केला, बैठका घेतल्या, कार्यशाळा आयोजित केल्या. त्यामध्ये ‘जीस्ट‘ (२०१०), ‘टेक फॉर सेवा‘ (२०१३), ‘जीएम क्रॉप्स‘ (२०१५), ‘भारतीय विज्ञान संमेलन‘ (२०१७), ‘विश्व-वेद-विज्ञान संमेलन‘ (२०१८), ‘विभा‘च्या वार्षिक सर्वसाधारण सभा (भोपाळ २०१६, बंगळुरु २०१८) आदींचा विशेष उल्लेख करावा लागेल. मी कॉन्फरन्स समितीचा प्रकाशन प्रमुख या नात्याने वारंवार भेटी व्हायच्या. ‘जीएम क्रॉप्स‘ची कॉन्फरन्स (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) ‘एनसीएल’मध्येच आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे कॉन्फरन्सचा आढावा घेण्यासाठी जयंतराव वारंवार ‘एनसीएल’ला येत असत. अशाच एका बैठकीनंतर मी सर्वांना कॅन्टीनमध्ये चहापाणी घेण्यासाठी निघणार तोच जयंतरावांनी सूचविले की, कॅन्टीनमध्ये कशाला, आपण तुमच्या घरीच चहापाणी घेऊ. तेव्हा संध्याकाळचे ६.३० वाजले होते. मी त्यांना सांगितले की, माझी सहचारिणी बँकेत नोकरी करत असल्याने रात्री ८ वाजल्यानंतर घरी येते. तुमची गैरसोय होईल. तेव्हा जयंतराव म्हणाले की, “आपण स्वतः चहा करू, तुम्ही काळजी करू नका.“

मे २०१४ नंतर माझे पाठीचे दुखणे वाढले होते. जुलै २०१५ मध्ये अशाच एका आढावा बैठकीनंतर जयंतराव मला म्हणाले की, “तुम्ही एक महिना वहिनीसोबत बंगळुरुला जाऊन नैसर्गिक उपचार करून घ्या.“ काही आठवड्यांनंतर त्यांनी मला त्याची पुन्हा आठवण करून दिली. मी काही गेलो नाही, शेवटी जून २०१६ मध्ये ‘ऑपरेशन‘ करावे लागले. विश्व-वेद-विज्ञान संमेलनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात एरंडवणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जयंतरावाव्यतिरिक्त श्रीकांत कुलकर्णी आणि डॉ. मानसी माळगांवकर हजर होते. रस्त्याचे काम चालू असल्याने मी तेथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. जयंतराव म्हणाले, “टॅक्सी सोडून द्या आणि तुम्ही कुठे आहे ते सांगा.“ दोन मिनिटात जयंतराव स्वतः स्कुटर घेऊन आले होते.

‘जीएम क्रॉप्स‘च्या अशाच एका बैठकीदरम्यान जयंतरावांनी ‘आयआयएसएफ’बद्दल सांगितले. तेव्हा, ‘आयआयटी’ दिल्लीत भरणार्‍या पहिल्या ‘आयआयएसएफ’बद्दल नियोजन सुरू होते. काही बैठकांना मी हजर राहिलो. पण, पहिल्या ‘आयआयएसएफ’ला मी उपस्थित राहू शकलो नाही. २०१६ मध्ये दिल्लीत राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा येथे आयोजित दुसर्‍या ‘आयआयएसएफ’ला मी तीन दिवस उपस्थित होतो. तेव्हा जयंतराव म्हणाले की, “तुम्ही सर्व दिवस आहात ना?“ मी सांगितले की, “नाही, मी तीन दिवस आहे, नंतर परत जाणार.“ तेव्हा त्यांचे उत्तर होते की, “तुम्ही सर्व दिवस हजर राहायला हवे.“ त्यातून बोध घेऊन नंतर चेन्नई (२०१७), लखनऊ (२०१८), कोलकाता (२०१९) ‘आयआयएसएफ’ला मी सर्वच दिवस हजर राहिलो. चेन्नईच्या वेळी मी अण्णा विद्यापीठाच्या परिसरात एका हॉलकडून दुसरीकडे जात होतो. माझ्याजवळ एक कार येऊन थांबली, गाडीत डॉ. शंकरराव तत्ववादी आणि जयंतराव होते. मला म्हणाले, “चला आपण विज्ञान चित्रपट महोत्सवाकडे जाऊया.“ म्हणजे रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला ओळखून गाडी थांबून सोबत घेऊन जाणारे जयंतराव.

मार्च २०१९मध्ये पुण्यात ‘विभा‘ कार्यकर्त्यांच्या बैठकीत मला जयंतरावांनी तेव्हापर्यंतच्या ‘आयआयएसएफ’बद्दल सादरीकरण करायला सांगितले होते. ‘सीएसआयआर-८००’प्रकल्पांतर्गत कोकणात काय काम करता येईल, हे बघण्यासाठी आम्ही ऑगस्ट २०१८ मध्ये कोकणात एकत्र गेलो होतो, सोबत डॉ. मानसी माळगांवकर होत्या.  जयंतराव उपचारासाठी पनवेलला असताना मानसी आणि अभिषेकसोबत जयंतरावांना बघण्याची चर्चा झाली होती. पण, योग जुळून आला नाही. १५ दिवसांपूर्वी मुकुंद देशपांडे यांच्यासोबत बैठकीत आम्ही दोघांनी त्यांना चिंचवडला जाऊन बघायला जाण्याचे ठरवले होते, पण त्याआधीच त्यांच्या जाण्याची वाईट बातमी कानावर पडली.

‘एनसीएल’मध्ये कॉन्फरन्समुळे खूप बॅग जमा व्हायच्या, बर्‍याचदा मी बॅग घेत नव्हतो आणि घेतली, तर एअरपोर्टला सोडणार्‍या चालकाला देऊन टाकायचो. कधीतरी एखादी चांगली बॅग घरी आणून ठेवायचो. असेच एकदा सोबत बसलो असताना, मी आयोजकांना बॅग नको म्हणून सांगितले. म्हंटलं, आधीच खूप बॅग्स घरी पडल्या आहेत, आणखी किती गोळा करायच्या. जयंतराव म्हणाले, “त्यातील एखादी बॅग मला द्या.“ मी म्हंटलं, “पुण्याला आलात की घरून जी आवडेल ती बॅग घ्या.“ पण, त्यानंतर त्यांचा घरी येण्याचा योग आला नाही आणि कधी काहीही न मागणार्‍या जयंतरावांना मी बॅग देऊ शकलो नाही. ती खंत माझ्या मनात राहील.

प्रभाकर इंगळे

(लेखक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून मुख्य वैज्ञानिक पदावरून निवृत्त झाले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या पब्लिकेशन आणि सायन्स कम्युनिकेशन विभागाचे ते १७ वर्षे विभागप्रमुख होते. त्याआधी ते दिल्लीत ‘सीएसआयआर’च्या पीआयडी/निस्कॉम/निस्केअरमध्ये वैज्ञानिक/संपादक होते.)