मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात सध्या राम कृष्ण हरीच्या गजरात, विठ्ठलाच्या नामस्मरणात, टाळ मृदुंगांच्या संगतीत पंढपुरी चाललेल्या वारकऱ्यांच्या वारीचं भक्तीमय वातावरण आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पायवारी करत वारकरी विठोबाच्या भक्तीत पंढरपुरला जातात. पण, याच वारीच्या वेळी भरपुर कचरा, प्रदुषण, पाण्याचा अपव्यय आणि वारकऱ्यांच्या अनेक गैरसोयी हे प्रकार सर्रास घडत असतात. वारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा कचरा, त्यातुन होणारे प्रदुषण यावर आळा घालण्यासाठी पुण्याच्या ‘थं क्रियेटिव्ह – पर्यावरण दक्षता कृती मंच’ यांच्या माध्यमातुन ‘नैसर्गिक द्रोणपत्रावळींची लोकचळवळ’राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर, प्लॅस्टिक थर्माकॉल कचरामुक्त दिंडी अभियान ही राबविण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या भक्तीबरोबरच पर्यावरणाचे ही रक्षण होईल या उद्देशातुन राबिवण्यात आलेली ही लोकचळवळ आहे.
महाराष्ट्राला शेकडो वर्षे जुनी वारीची परंपरा आहे. मात्र मागील काही वर्षांत वारीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकॉलपासून बनवलेल्या प्लेट्स, ग्लासेस, कप यांच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वापरलेल्या या प्लेट्सचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होत नाही. दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या प्लेट्स तशाच टाकून दिल्या जातात किंवा जाळल्या जातात त्यामुळे हवा, जमीन आणि पाणी या सगळ्यांमध्ये प्रचंड प्रदूषण होते. डिशेसमध्ये खरकटे अन्न तसेच राहिल्यामुळे शेकडो जनावरे ही मरण पावतात. हे टाळण्यासाठी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर पुन्हा सुरु करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. वारकऱ्यांनी वारीमध्ये पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर करावा यासाठी प्रबोधानासह विविध स्तरांवर 'थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच' कार्य करीत आहे. मागील वर्षापासून हे अभियान राबविण्यात येत असुन वारकरी संप्रदायातील चाळीस ह. भ. प. महाराजांचा, दिंडीप्रमुखांचा अभियानात सक्रीय सहभाग असून वारीमार्गात असलेल्या गावांतील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे प्रदूषण मुक्तीसाठी प्रबोधन करण्यात आले आहे.
निसर्गवारीच्या या चमुमध्ये ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असुन त्यांच्या ३ टिम्स केलेल्या आहेत. यापैकी एक टीम वारी ज्या गावात जाणार आहे तिथे आधी पोहोचुन तेथील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, महानगरपालिका, शाळा यांच्यामध्ये जाऊन जनजागृती आणि प्रबोधनाचे काम करते. दुसरी टीम दिंडीतील वारकऱ्यांसोबत राहुन तिथे सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असते आणि शेवटची टीम वारीने एका गावातुन पुढच्या गावात प्रस्थान केल्यानंतर तेथील पुर्ण स्वच्छतेचे काम करते. प्लॅस्टिक आणि थर्माकॉलपासून बनवलेली ताटे न वापरता त्याऐवजी नैसर्गिक पानांपासुन बनवलेल्या द्रोण, पत्रावळींचा वापर करण्यात येत आहे. वापरुन झालेल्या पत्रावळी, द्रोण यांचे सेंद्रिय खत तयार करुन ते शेतकऱ्यांना वितरीत केले जाते.