मजबूत भारत! ९ वर्षांत संरक्षण क्षेत्रातील निर्यात २३ पटींनी वाढली!

01 Jun 2023 17:42:23
 
India Defense sector
 
 
नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण निर्यातीत प्रचंड वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. गेल्या ९ वर्षात देशाच्या संरक्षण निर्यातीत २३ पटीने वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ६८६ कोटी होती. २०२२-२३ मध्ये ती १६ हजार कोटींपर्यंत वाढली आहे. सांख्यिकी नुसार, जागतिक स्तरावर भारत संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये आपली भूमिका सतत वाढवत आहे. सध्या भारत ८५हून अधिक देशांमध्ये संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहे.
 
यासोबतच देशातील शंभरहून अधिक कंपन्या संरक्षण उत्पादनांची जगभरात निर्यात करत आहेत. यामध्ये प्रगत हलकी हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे, आर्टिलरी गन, पिनाका रॉकेट लाँचर आणि डार्नियर्स सारखी अनेक शस्त्रे यांचा समावेश आहे. भारत लवकरच इजिप्त आणि अर्जेंटिनाला तेजस लढाऊ विमानांची निर्यात करू शकतो. सध्या भारत श्रीलंका, फ्रान्स, रशिया, मालदीव, इस्रायल, नेपाळ, सौदी अरेबिया आणि पोलंड यांसारख्या अनेक देशांना शस्त्रे पुरवित आहे.
 
संरक्षण निर्यातीतील तेजीचे कारण केंद्र सरकारची सध्याची धोरणे आहेत. या अंतर्गत, देशात संरक्षण उत्पादनात स्वदेशी डिझाइन आणि उत्पादनावर भर देण्यात आला आहे. २०२५ च्या अखेरीस वार्षिक ३५हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे लक्ष्य गाठण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याआधी भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आज भारताची गणना जगातील अव्वल २५ शस्त्रास्त्र निर्यात करणार्‍या देशांमध्ये केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0