शरदराव पवार यांनी राजीनाम्याची खेळी खेळून आपल्या हातातील शेवटचा हुकमी एक्का वापरला आहे. राजकारणाची गंमत अशी असते की, एकच डाव पुन्हा खेळता येत नाही. त्या डावातील हवा निघून गेलेली असते. उद्या पक्षांतर्गत नेतृत्त्व व संघर्ष तीव्र झाल्यास शरदराव पवारांच्या हाती राजकीय डाव खेळण्याचा हुकमी एक्का आता राहिलेला नाही.
"मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी मिळाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. पण, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे.” दि. २ मे रोजी शरद पवारांनी ही घोषणा मुंबईतील एका कार्यक्रमात केली. अपेक्षेप्रमाणे या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या. कार्यकर्त्यांनी आणि मान्यवर नेत्यांनी राजीनाम्याला विरोध केला. राष्ट्रीय राजकारणात ज्यांच्या नावांची चर्चा चालते, अशा ममता बॅनर्जी, नितीश कुमार, मायावती, यांनीदेखील शरदराव पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशा सूचना केल्या. अपेक्षेप्रमाणे शरदराव पवार यांनी राजीनामा मागे घेतलाही. पण, म्हणून राजीनामा नाट्य संपले त्यावर आता पडदा पडला, असे काही होण्याची शक्यता नाही.
राजीनामा नाट्याविषयी पहिला प्रश्न असा निर्माण होतो की, मुळात शरदराव पवार यांनी राजीनामा का दिला? एखादा नेता राजीनामा का देतो? निवडणुकीत पक्षाचा सणकून पराभव झाला की, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षनेता राजीनामा देतो. जसा राहुल गांधी यांनी दिला. पक्षनेत्याला दुसर्या कारणासाठी राजीनामा द्यावा लागतो, ते कारण म्हणजे त्याच्या नेतृत्वावर निकटच्या सहकार्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होणे, हे आहे. तिसरे कारण - पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता संपून जाणे हे असते. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामागे यापैकी एकही कारण नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या पक्षाकडे उबाठा सेनेपेक्षा अधिक आमदार आहेत. काँग्रेसपेक्षादेखील अधिक आमदार आहेत. आमदारांना निवडून आणण्याची त्यांची क्षमता अजिबात कमी झालेली नाही. आमदार निवडून आणण्यासाठी तीन प्रकारच्या शक्ती लागतात. १) धनशक्ती २) जातीय समीकरण शक्ती ३) प्रभाव शक्ती/आकर्षण शक्ती. या तिन्ही शक्तींच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची बरोबरी करेल किंवा जागा घेईल, असा दुसरा कोणी नाही. शरदराव पवार यांच्या धनशक्तीबद्दल सर्वच लोक जाणतात, त्यामुळे त्याच्यावर नवीन लिहिण्यासारखे काही नाही. जातीय समीकरणे जुळविण्याची त्यांची शक्ती खूप मोठी आहे आणि या शक्तीचे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील जन्मदाते आहेत. महाराष्ट्रातील काही क्षेत्रात ते वलयांकित नेतृत्व देणारे नेते आहेत. ही गोष्ट पक्षातील सर्वांना माहीत आहे.
यामुळे त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेकांच्या पोटात भितीचा गोळा उठणे स्वाभाविक आहे. आपला तारणहार आपल्याकडे पाठ फिरवून बसला, तर आपले राजकीय भवितव्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांना शरदराव पवार पक्षाच्या अध्यक्षपदी असणे अनिवार्य झाले. अखेर शेवटी राजकारण म्हणजे तरी काय असतं? राजकारण म्हणजे स्वतःचं अस्तित्त्व अबाधित राखून राजकारणात कायम टिकून राहणे. वेगवेगळी पदे प्राप्त करणे आणि आपल्या नेतृत्वाची स्वनामध्यनता मानून जगत राहणे. यासाठी पक्षाला यश देणारा, यशाची त्रिसूत्री राबविणारा कुशल नेता पक्षाला आवश्यक असतो.
शरदराव पवार यांनी वरील सर्व कारणांसाठी राजीनामा देण्याचे काही कारण नव्हते. पक्षातील त्यांचे हे स्थान सर्वपक्षमान्य आहे. तरीही त्यांनी राजकारणाचा एक डाव खेळला. राजकारणी माणूस जेव्हा एखादा डाव खेळतो, तेव्हा त्यात एक मोठा धोका असतो. डाव उलटण्याची शक्यता असते. परंतु, शरदराव पवारांना हे पूर्णपणे माहीत असावे की, जो डाव आपण खेळत आहोत, तो आपल्यावर उलटणार नाही. उलट या डावामुळे पक्षातील आपले स्थान पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. पक्षांतर्गत विरोध करणारे काही काळासाठी का होईना, शांत होतील.
गेले दोन महिने एक बातमी उलटसुलट रितीने चालू असते. ती बातमी म्हणजे अजितराव पवार भाजपमध्ये प्रवेश करणार. बातमीचे दुसरे शीर्षक असते, अजितराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. बातमीचे तिसरे शीर्षक असते, अजितराव पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडणार. अशा राजकीय बातम्या आपल्या हस्तक पत्रकारांच्या माध्यमातून सोडल्या जातात. त्यांचा उगम कॉफी हाऊसमधून होत नाहीत, त्याचा उगम ज्याच्या संबंधी बातमी असते तिथूनच होत असतो. अशा बातम्यांचा स्पष्ट इन्कार अजित पवार यांनीही कधी केलेला नाही आणि शरद पवारदेखील अशा बातम्यांच्या संदर्भात शांत असतात. राजकीय जाणकार याचा अर्थ असा काढतात की, राष्ट्रवादी पक्षात शरद पवारांनंतर कोण, हा वादाचा विषय झालेला दिसतो. सुप्रिया सुळे की अजित पवार, या नावांच्या चर्चा चालू असतात.
शरदराव पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष असला तरी हा पक्ष घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस जशी घराणेशाहीवर चालते, कालपरवापर्यंत उबाठा सेनेची शिवसेना घराणेशाहीवर चालत होती, त्याच मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस चाललेली आहे. घराणेशाहीचा एक फायदा असतो. तो म्हणजे क्रमांक एकचा नेता कोण, हे घराणे ठरविते. अन्य सर्वजण त्याला मान्यता देतात. घराणेशाहीचा तोटा असा असतो की, जर घराण्याचा वारस अकार्यक्षम राजकीय डावपेचात बालक निघाला, तर तो पक्ष झपाट्याने लयाला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक पवार गेले की दुसरे कोण पवार येणार आणि त्या पवारांची ‘पॉवर’ किती असणार, हे आताच सांगणे अवघड आहे, अशा प्रश्नांचे निर्णय निवडणुकींच्या रणांगणात होत असतात.
शरदराव पवार यांनी राजीनाम्याची खेळी खेळून आपल्या हातातील शेवटचा हुकमी एक्का वापरला आहे. राजकारणाची गंमत अशी असते की, एकच डाव पुन्हा खेळता येत नाही. त्या डावातील हवा निघून गेलेली असते. उद्या पक्षांतर्गत नेतृत्तवसंघर्ष तीव्र झाल्यास शरदराव पवारांच्या हाती राजकीय डाव खेळण्याचा हुकमी एक्का आता राहिलेला नाही.त्यांच्या राजीनामा नाट्यामुळे महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडाविषयी पुस्तकात जी वक्तव्ये आली आहेत, ती उबाठा सेनेला सोयीची नाहीत. शरदराव पवार यांच्या राजीनामा नाट्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया फारशा गंभीरपणे घेण्यासारख्या नाहीत. या तिन्ही पक्षांना एकत्र राहून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. ही गोष्ट खरी आहे की, शरदराव पवार यांच्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्त्वात आली आणि आता शरदराव पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी टिकेल की नाही, अशी परिस्थिती होऊ घातली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे निवडणूक सामर्थ्य किती राहिले आहे, याचा अंदाज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच घेतील. २०१९ साली उद्धव ठाकरे यांची जबरदस्त गरज होती. २०२४ साली ही गरज राहील का? शेवटी राजकारण हे पक्षीय हितासाठीच करावे लागते आणि पक्षाचे हित कशात आहे, हे शरदराव पवार आणि पवार परिवाराला आपल्यापेक्षादेखील उत्तम समजते. म्हणून ते कोणता निर्णय घेतील? शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याच्या काळात संजय राऊत अस्वस्थ झाले, ते स्वाभाविक आहे. कारण, शरदरावजी होते म्हणून महाविकास आघाडी झाली, ते अध्यक्षपदी राहिले, तर महाविकास आघाडी राहील असे त्यांना वाटते, असे हे एका राजीनामा नाट्याचे विविध पदर आहेत. शरद पवार यांच्या चाहत्यांनी आरोळी ठोकून दिली आहे की, शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे देशाचे राजकारण ढवळून निघाले, हे मात्र अति झाले आणि हसू आले, असे विधान आहे!