इस्लामाबाद : कंगाल झालेल्या पाकिस्तानला महागडे कर्ज दिल्यानंतर चीनने आता आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली. चीनकडून दोन लाख 22 हजार कोटी रुपये कर्जाच्या बदल्यात सुमारे पाच वर्षे 2 लाख 5 हजार कोटी रुपये एवढा वार्षिक हप्ता देण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. साडेचार पटीच्या दराने कर्जफेड सुरू आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गाँग यांनी पाकिस्तान दौर्यात लष्करप्रमुख आसिम मुनीर व परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांना राजकीय परिस्थितीत लवकर सुधारणा करावी, असा इशारा दिला आहे.
चीनच्या मदतीने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये 32 हजार कोटी रुपये खर्चून डासू धरण होत आहे. त्यावरूनही चीनने पाकिस्तानला इशारा दिला. मजूर नमाजसाठी जास्त वेळ घालवतात, असे साइट इंजिनिअरचे म्हणणे होते. त्यावरून अभियंत्यांवरच ईशनिंदेच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला. खैबरमध्ये 2021 मध्ये बस हल्ल्यात चीनच्या 9 अभियंत्यांची हत्या झाली होती. या प्रकरणांमुळे चीनच्या नाराजीत भर पडली आहे.
दरम्यान, चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तानसाठी अमेरिकेची नाराजी मोठा झटका आहे. 2021 मध्ये अफगाण बाहेर पडल्यावर अमेरिकेने पाकसोबतच्या संबंधाला थंड बस्त्यात टाकले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ व बिलावल यांनी अमेरिकेचा दौरा केला. परंतु बायडेन प्रशासनाचा मोठा पदाधिकारी गेल्या दोन वर्षांत पाक भेटीवर गेला नाही. विल्सन सेंटरचे फेलो बकीर सज्जाद म्हणाले, पाकिस्तान चीनची साथ सोडणार नाही, असे अमेरिकेला वाटते. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याची सुतराम शक्यता नाही.
“पाकिस्तानात राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासाचा वेग दिसला नाही तर चीन येथील गुंतवणुकीबाबत फेरविचार करू शकतो.” अशी टिप्पणी चीनचे परराष्ट्रमंत्री गाँग यांनी केली आहे. चीनचा पवित्रा पाहून घाबरलेल्या पाक सरकारने जनतेमध्ये नामुष्की होऊ नये म्हणून बिलावल आणि गाँग यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपणही केले नाही. पाकचे अवलंबित्व एवढे वाढले की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआऊट पॅकेजच्या 53 हजार कोटी रुपयांपैकी 24 हजार कोटींच्या गॅरंटी मनीमध्येही चीनचा मोठा भाग आहे.
इस्लामाबाद येथील सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी रिसर्चचे संचालक इम्तियाज गुल म्हणाले, “निवडणुकीपूर्वी राजकीय सुधारणेचा चीनचा इशारा हा पाकिस्तानसाठी मोठा इशारा म्हणावा लागेल. पाकिस्तानला काही उपाय करावे लागतील. राजकीय विश्लेषक मारियाना बाबर म्हणाल्या, एप्रिल महिन्यात चीन दौर्यावर गेलेल्या लष्करप्रमुख मुनीर यांना चीनने सल्ला दिला होता. त्याची अंमलबजावणी झालीच नाही.
32 हजार कोटी खैबर पख्तुनख्वामध्ये धरण
15 वर्षांत चिनी जाळे कर्जाचे वाढले
98 हजार कोटींचा वर्षभरात व्यापार
2013 पासून ग्वाडेर बंदरावर चीनचे वर्चस्व.
5 लाख 33 हजार कोटी वर्षभरात चीनची गुंतवणूक