एकीकडे उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, दुसरीकडे दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी आझमगढ येथील स्वार विधानसभेसाठी होत असलेली पोटनिवडणूक सध्या चर्चेत आहे. याठिकाणी विजय मिळवण्यासाठी आझम खान स्वतः प्रचार करत आहेत. याठिकाणी भाजपचा मित्रपक्ष अपना दलाने शरीफ अन्सारी यांना मैदानात उतरवले आहे, तर सपाकडून अनुराधा चौहान उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, सपाने प्रथमच या मतदारसंघात हिंदू उमेदवार दिला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. यानंतर स्वार विधानसभा रिक्त घोषित करण्यात आली आणि आता याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघात सपाला पराभवाची इतकी धास्ती बसली आहे की, प्रथमच याठिकाणी हिंदू उमेदवार देण्यात आला आहे. ही जागा निवडून आणण्यासाठी बाप-बेटे मतदारसंघात फिरत आहेत. त्यातच आता आझम खानला योगीराजमध्ये भगवान श्रीरामाची आठवण येत आहे. प्रचारादरम्यान आझम भगवान श्रीरामाचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागताना दिसले. आझम यांनी एका सभेमध्ये महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर गांधींनी शेवटी ‘हे राम’ हे शब्द उच्चारल्याचे उदाहरण दिले. त्यानंतर टिपू सुलतानच्या हत्येनंतर इंग्रज जी अंगठी घेऊन गेले, त्या अंगठीवर ‘भगवान राम’ लिहिले असल्याचेही आझम म्हणाले. जेव्हापासून आझम खान यांच्यामागे आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी कायद्याचा ससेमिरा मागे लागला आहे, तेव्हापासून आझम खान भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत.एकेकाळी आझम खान यांचा पक्षात मोठा तोरा होता. सपा सरकारमध्ये तर त्यांचा मोठा बोलबाला होता. मुलायम आणि अखिलेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आझम खान क्रमांक दोनचे नेते मानले जात होते. परंतु, आता बापलेकाची आमदारकी रद्द झाली असून तरीही दोघांचा स्वभाव मात्र तसाच आहे. दोघांकडूनही भाजप आणि योगींना लक्ष्य केले जात आहे. आता भगवान श्रीरामाचा आधार घेऊन आझम आपले राजकारण करू पाहत आहे. परंतु, हे सगळं काही मतांच्या गोळाबेरजेसाठी सुरू आहे, हे कोणीही सांगेल.
राजस्थानातील जोधपूरमध्ये ‘द केरला स्टोरी’चे स्टेटस ठेवल्यामुळे एका दलित युवकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लीम धर्माला बदनाम केल्याचा आरोप करत या युवकाला मारहाण करण्यात आली. या युवकाने केवळ व्हॉट्सअॅपवर या चित्रपटाचे स्टेटस ठेवले होते. तीन जणांनी या युवकास मारहाण करत गळा कापण्याची धमकी दिली. हवेली परिसरात राहणार्या या युवकाने ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला. जो त्याला आवडलाही. त्यानंतर त्याने या चित्रपटाचे पोस्टर व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले. त्यामुळे काही युवक संतप्त झाले आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, या युवकाने काहीही आक्षेपार्ह लिहिले नव्हते. जे लिहिले ते इंग्रजीत होते, परंतु ते समजून न घेताच युवकाला मारहाण झाली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून एकाला ताब्यातही घेण्यात आले आहे, तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेत या घटनेचा निषेध केला आहे. राजस्थानातील गहलोत सरकारच्या काळात हिंदू मंदिरेही सुरक्षित नव्हती आणि जनतेला तर वार्यावरच सोडले आहे. सचिन पायलट यांच्यासारख्या उमद्या नेत्याला पक्षांतर्गत कुरघोड्या करत बाजूला केले. त्यामुळे ‘द केरला स्टोरी’चे स्टेटस ठेवले म्हणून मारहाण होणे, हा गहलोत यांच्यासाठी फार महत्त्वाचा विषय नाही. त्यातच इकडे तामिळनाडूत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हिंदुत्वाला विरोध करण्याची परिसीमा गाठली आहे. ‘व्होट बँके’साठी आणि विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी आणली आहे. दोन्ही राज्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली असून शांतता भंग होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्टॅलिन आणि ममता यांनी म्हटले आहे.चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंदी घालून उलटपक्षी चित्रपटाला आणखी फायदा होणार हे नक्की. परंतु, या राज्यांतील हिंदू जनतेला व तरुणी-महिलांना हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहता येणार नाही, ही एक खंत आहेच!