नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे उद्घाटन सोमवार ८ मे रोजी नागपूर येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात असलेल्या महर्षी व्यास सभागृहात झाले. अभ्यास वर्ग उद्घाटनप्रसंगी रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह आणि वर्गाचे पालक अधिकारी रामदत्त, सह सरकार्यवाह के. सी. मुकूंद आणि अवध प्रांत संघचालक कृष्ण मोहन उपस्थित होते.
ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात बी पेरतो, त्याचप्रमाणे संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांमध्ये संस्कृतीचे बीज रोवले जाते. म्हणूनच संघकार्यात प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. रेशीमबागची ही पावन भूमी डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींचे वास्तव्य आहे. येथे येणार्या प्रत्येक स्वयंसेवकाला प्रथम देशाची भावना, अभिमान, सत्यता, देशभक्ती, शिस्त आणि 'स्व'बद्दल आपुलकी विकसित करण्याची संधी मिळते. स्वयंसेवकांनी समाजाच्या समस्यांवर केवळ चर्चा करू नये, तर त्यावर उपाय शोधणारेही बनले पाहिजे.
संघ शिक्षण वर्गात राहताना संघाचे स्वरूपही समजून घ्यावे लागते. आणि आपल्याला वैयक्तिक मत हे संघाच्या मतात विलीन करायला शिकले पाहिजे. हा संघटनेचा दर्जा आहे. यासोबतच समाजात वावरताना स्वयंसेवकांना प्रगतीशील राहून काम करावे लागेल, असे सह सरकार्यवाह रामदत्त यांनी यावेळी सांगितले.तृतीय वर्ष अभ्यास वर्गासाठी देशभरातून ६८२ प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांची उपस्थिती आहे. वर्गाचे पथसंचलन २१ मे रोजी तर समारोप १ जून २०२३ रोजी होणार आहे.