कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘बजरंग दल’ या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, अशी जी घोषणा केली, त्याचे तीव्र पडसाद केवळ कर्नाटकमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात उमटले. ‘बजरंग दल’ या संघटनेची तुलना देशद्रोही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी करणार्या काँग्रेस नेत्याची या निमित्ताने कीव आली. आपल्या स्वार्थासाठी एखादा पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो, ते यानिमित्ताने जनतेला दिसून आले. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा. पण, यानिमित्ताने काँग्रेसच्या मनात काय आहे, याचे दर्शन जनतेला झाले.
काँग्रेसची घोषणा लक्षात घेऊन त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी बजरंग दलाने मंगळवार, दि. ९ मे रोजी देशव्यापी ‘हनुमत शक्ती जागरण’ अभियानाचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशभर या अभियानांतर्गत हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले आहे. देशभरात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येणार्या या कार्यक्रमात हनुमान चालीसा पठण करण्याबरोबरच राष्ट्रविरोधी शक्ती आणि त्यांचे काँग्रेससारखे पाठीराखे यांच्यावर परमेश्वराने दया करावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात परमेश्वराने काँग्रेसला काही सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर लगेचच राजस्थान, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातून आणि अन्य काही नेत्यांकडूनही बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. महिला, मुली, लहान बालके आणि गोमाता यांच्यासंदर्भात जे गुन्हे होत आहेत, ते रोखण्यासाठी बजरंग दल जे कार्य करीत आहे, ते काँग्रेसला दिसत नसावे. मंदिरांची सुरक्षा, साधूंची सुरक्षा, गोसेवा, रक्तदान कार्यक्रम आदी अनेक उपक्रम बजरंग दलाकडून हाती घेतले जातात.
हनुमान चालीसा पठण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मविरोधी शक्तींचा पराभव करावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनी केले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच कर्नाटकात विजयनगर येथे गेल्या ४ मे रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हनुमान चालीसा पठण केले होते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची जी मागणी केली आहे, त्याची तीव्र प्रतिक्रिया या निवडणुकीत उमटल्याचे दिसून येईल.
ममता राजवटीत प. बंगाल म्हणजे हिंदूंवरील अत्याचाराची भूमी : आलोक कुमार
ममता बॅनर्जी यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर प. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता, हे सर्वविदित आहे. या हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली, हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले. या काळात प्रशासन आणि गुंड यांची हातमिळवणी झाली होती. गुंडांना शासन करण्याऐवजी अत्याचारास बळी पडलेल्यांचाच छळ केला गेला, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ आलोक कुमार यांनी केला आहे. ‘प. बंगालमधील ढासळलेली कायदा व्यवस्था’ या विषयावरील आयोजित परिसंवादात बोलताना आलोक कुमार यांनी हा आरोप केला.
प. बंगालने शिक्षण, साहित्य, आध्यात्मिकता, विज्ञान आणि क्रांती यामध्ये भरीव योगदान दिले आहे. याच राज्याशी अनेक महान विभूतींचे नाते आहे. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, श्री रामकृष्ण परमहंस, नेताजी सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र चॅटर्जी, महर्षी अरविंद, राजा राममोहन रॉय अशा अनेक महान विभूती या राज्यात निर्माण झाल्या, अशी ही महान विभूतींची भूमी असताना या राज्यात हिंदू समाजावर अत्याचार कसे काय होतात, असा प्रश्न आलोक कुमार यांनी उपस्थित केला. अशा दुर्दैवी घटना या राज्यात घडल्या कशा यावर मंथन करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.बंगालच्या इतिहासाचे दाखले देऊन आलोक कुमार म्हणाले की, “महम्मद अली जिना यांच्या आदेशावरून बंगालमधील मुस्लिमांनी हिंदूंच्यावर हल्ले केले. त्यावेळी एकट्या कोलकात्यामध्ये ५,०१६ हिंदूंची हत्या करण्यात आली. त्यानंतर नौखालीमध्येही हिंदूंच्यावर अत्याचार झाले.”
प. बंगालची इतकी घसरण का झाली, याबाबत बोलताना आलोक कुमार यांनी, ३४ वर्षांची साम्यवादी राजवट आणि आता ममता बॅनर्जी यांची राजवट यामुळे प. बंगालची वाईट अवस्था झाली. आता तर देशातील गरीब राज्यांमध्ये या राज्याचा अंतर्भाव केला जातो, असे सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या काही सदस्यांची गुन्हेगारी पूर्वपीठिका असल्याचे सांगून त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विविध गुन्ह्यांखाली तृणमूल काँग्रेसच्या अनेकांना तुरुंवासात राहावे लागले. याच गुंडांनी साम्यवादी सरकारच्या काळात ममता बॅनर्जी यांना मदत केली. आता तेच ममता सरकारसाठी काम करीत आहेत. रामनवमीच्या दरम्यान हिंदूंच्यावर हल्ल्यांसंदर्भात बोलताना आलोक कुमार म्हणाले की, “रामनवमी आणि हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या वेळी दरवर्षी प. बंगालमध्ये हिंसाचार होतो. यावर्षीही हिंसाचार घडला. निरपराध हिंदूंचा छळ करण्यात आला. यावेळी तर रामनवमीच्या वेळी झालेला हल्ला हा अत्यंत सुनियोजित असा होता. मुस्लीम समाजाच्या घरांमध्ये आणि छतांवर मोठ्या प्रमाणात दगड, काचेच्या बाटल्या, पेट्रोल बॉम्ब, अॅसिडच्या बाटल्या आणि लोखंडी कांबी आढळल्याचे तपासामध्ये दिसून आले.
पोलिसांच्या हे सर्व लक्षात आले नसेल, तर हे ममता सरकारचे मोठे अपयश मानावे लागेल,” असे ते म्हणाले. रामनवमी हिंसाचारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. हिंदू समाजाने मुस्लीम मोहल्ल्यामधून मिरवणूक काढून चूक केली, असे त्यांनी म्हटले होते. हे आलोक कुमार यांनी लक्षात आणून दिले.या परिसंवादात बोलताना दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्या. एस, एन. धिंग्रा यांनी घटनेमध्ये बदल झाल्यानंतरच प. बंगालमधील हिंसाचार थांबेल, असे मत व्यक्त केले. न्याय हा प्रत्येक समाजाचा पाया असतो. पण, प. बंगालमध्ये कधीच त्या विषयास प्राधान्य दिले गेले नाही. प. बंगाल परिस्थितीमागे हे मुख्य कारण आहे.याप्रसंगी बोलताना ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशन’चे संचालक डॉ. अनिर्बान गांगुली यांनी प. बंगालमधील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले. आपण प. बंगालचे असून तेथून निवडणूकही लढविली होती, असे सांगून डॉ. गांगुली म्हणाले की, “तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर तेथील हिंदूंच्यावर अत्याचार करण्यात आले. रामनवमी मिरवणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी हिंदूंना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या हिंदूंना तुरुंगात डांबले.”प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे सरकार हिंदू समाजावर कशाप्रकारे अन्याय करीत आहे आणि मुस्लिमांचे कसे लांगूलचालन करीत आहे, यावर या परिसंवादात प्रकाश टाकण्यात आला. प. बंगाल ही हिंदू समाजावरील अत्याचाराची भूमी असल्याचे या परिसंवादाच्या निमित्ताने लक्षात आणून देण्यात आले.
बस्स झाला डाव्यांनी लिहिलेला इतिहास : हिमंता बिस्व सरमा
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटास पुरोगामी म्हणविणारे पक्ष, मुस्लीम संघटना, केरळ, तामिळनाडूसारखे राज्य सरकार यांच्याकडून विरोध होता असतानाही, हा चित्रपट देशाच्या विविध भागात झळकला आहे. मध्य प्रदेश सरकारने तर हा चित्रपट करमुक्त केला आहे. या चित्रपटाची चर्चा सुरू असताना आणि कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना ‘टिपू’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी, आमच्या चित्रपटातून टिपू सुलतानाची दुसरी बाजू दाखविली जाईल, असे घोषित केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक पवन शर्मा असून ते म्हणतात की, “टिपू सुलतानाबद्दल आम्हाला शाळेमधून अत्यंत चुकीची माहिती दिली गेली. या चित्रपटाच्या माध्यमातून टिपू सुलतानाने अत्याचारी रूप दाखविण्याचे धाडस केले आहे. टिपू सुलतान हा त्याचे वडील हैदरअली याच्यापेक्षाही धर्मांध होता. त्या काळातील हिटलर म्हणून त्याला संबोधावे लागेल. या टिपू चित्रपटाचा टीझर सार्वत्रिक होताच माहितीच्या महाजालात त्यावर चर्चा सुरू झाली.” टिपूबद्दल बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. यासंदर्भात ट्विटरवरील वक्तव्यात ते म्हणतात, “आपले राज्य राखण्यासाठी टिपूने ब्रिटिशांशी लढा दिला हा युक्तिवाद एकवेळ गृहीत धरला तरी, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली मातृभूमी यांच्यासाठी बलिदान केलेल्या ८०हजार कोडवांचे काय? बस्स झाला डाव्यांनी लिहिलेला इतिहास. नव्या भारतास देश आणि धर्मासाठी बलिदान करणार्या वीरांची माहिती देणार्या इतिहासाची आवश्यकता आहे.”
‘टिपू’ हा चित्रपट ‘इरॉस इंटरनॅशनल मीडिया’ सादर करीत असून रश्मी आणि संदीप शर्मा हे त्या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शक पवन शर्मा आहेत. संदीप शर्मा हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट तयार करीत आहेत. तसेच, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर ‘अटल’ नावाचा चित्रपटही ते तयार करीत आहेत. ‘टिपू’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नेटवर एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये टिपूच्या कारकिर्दीत आठ हजार मंदिरे आणि २७ चर्च नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्याच्या काळात ४० लाख हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्यात येऊन त्यांच्यावर गोमांस खाण्याची सक्ती करण्यात आली. एक लाखांहून अधिक हिंदूंना कारावासात डांबण्यात आले आणि कालिकतमधील एक हजार ब्राह्मण कुटुंबे नष्ट करण्यात आली असल्याची माहितीही त्यामध्ये देण्यात आली आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टिपू सुलतानाची काळी बाजू प्रेक्षकांपुढे येणार आहे. त्यांना यानिमित्ताने खरा इतिहास कळणार आहे.