दि. २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय ‘जागतिक बौद्ध परिषद’ पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन’ यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली. त्यामुळे एकप्रकारे भारताने चीनला दिलेला हा शह मानला जात आहे.
एखाद्या समस्येपासून ते समाधानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खरा बुद्धाचा वास्तविक प्रवास. “बुद्धाचा मार्ग म्हणजेच भविष्याचा आणि शाश्वततेचा मार्ग असून भारत त्याच मार्गावर वाटचाल करत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिल रोजी केले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी आयोजित फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन करून बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित १९ बौद्ध भिक्खूंना त्यांचा पोशाख भेट दिला.भगवान बुद्धाने दाखवलेला सिद्धांत, सराव आणि अनुभूतीचा मार्ग अनुसरत भारताने गेल्या नऊ वर्षांच्या प्रवासात या तीनही तत्वांचे पालन केले आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी भारताने संपूर्ण समर्पण वृत्तीने आणि समर्पण भावनेने कार्य केले आहे. भारत आणि नेपाळ मधील ‘बुद्धिस्ट सर्किट’चा विकास, सारनाथ आणि कुशीनगर येथील नूतनीकरण कार्य, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि संस्कृती केंद्राची स्थापना, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
भारताने राबविलेल्या शांतता मोहिमेचा आणि तुर्कीमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मदतकार्यात भारताने केलेले प्रयत्न त्या दिशेने टाकलेले पाऊल होते.राजधानीतील अशोका हॉटेलमध्ये (२०-२१ एप्रिल) दोन दिवसीय परिषदेला सुरुवात झाली. यात सुमारे ३० देशांचे प्रतिनिधी आणि परदेशातील सुमारे १८० प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनेचे १५० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तिबेटचे बौद्ध नेते दलाई लामा
जागतिक बुद्ध समिटमध्ये सर्वात महत्त्वाची उपस्थिती होती, तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची. पहिले असे वाटत होते की, चीनच्या भीतीमुळे त्यांना या समितीमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार नाही. याआधी कुठल्याही भारतीय सरकारने उघडपणे दलाई लामा यांना अशा प्रकारच्या समिटमध्ये भाग घेऊ दिला नव्हता.मात्र, चीनच्या मल्टिडोमेन युद्धाला प्रत्युत्तर म्हणून भारताने या वेळेला दलाई लामा यांना या परिषदेत आपले विचार व्यक्त करण्याची परवानगी दिली. दलाई लामा यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले की, तिबेटवर चीन अत्याचार करत आहे. जगातील सगळ्या प्रतिनिधींसमोर हे भाषण झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिबेटचे आणि तिथल्या बौद्ध धर्मीयांवरील चीनची विविध आक्रमणे, आव्हाने जगासमोर मांडण्यामध्ये दलाई लामांना आणि भारताला यश मिळाले. अर्थातच, चीनला हे आवडलेले नाही, हे वेगळे सांगायला नकोच.यावेळी बोलताना दलाई लामा म्हणाले की, “तिबेटमधील संकट करुणा, शहाणपण आणि ध्यानाच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे, जी बौद्ध तत्त्वज्ञानाची केंद्रीय मूल्ये आहेत. ही तीन मूल्ये भगवान बुद्धांच्या शिकवणीचा अविभाज्य भाग आहेत.”
दलाई लामा यांनी सुमारे अर्धा तास चाललेल्या त्यांच्या भाषणात सद्य परिस्थितीच्या संदर्भात बौद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांवर भर दिला. ते म्हणाले की, “तिबेटमधील सध्याची परिस्थिती पाहण्यासाठी व्यापक मन आणि धैर्य लागते.” बुद्धाच्या शिकवणीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, “सर्व काही परस्परावलंबी आहे. निसर्गात वेगळेपणा नाही. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात समस्या असू शकतात, ज्या कदाचित मोठ्या आणि अव्यवस्थापित वाटतील, पण त्यावर ऊपाय शोधता येतात.”
सध्या तिबेटची नेमकी परिस्थिती काय?
चीनने दि. ७ ऑक्टोबर १९४९ रोजी स्वतंत्र तिबेटवर आक्रमण केले. दि. १७ मार्च १९५९ ला दलाई लामा यांनी ल्हासाहून पलायन केले व आपल्या ६० हजार तिबेटी शरणार्थींसोबत भारतात येऊन राजनीतिक शरण घेतली.दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये आपले सरकार स्थापन केले. परंतु, त्याला जगातील कुठल्याही राष्ट्राने मान्यता दिली नाही. चीनने तिबेटवर केलेल्या हल्ल्यांत आजवर दहा लाखांहून तिबेटी मारले गेले आहेत. १९८०, १९९० आणि २००८ या वर्षांमध्येही चीन विरूद्ध उठाव झाला होता. परंतु, त्याला चिरडून टाकण्यात आले. जागतिक स्तरावर त्याची फारशी दखलही घेतली गेली नाही.
तिबेटवर चीनची विविध आक्रमणे
आज तिबेटवर चीन विविध प्रकारे आक्रमण करतो. एक आक्रमण म्हणजे सांस्कृतिक आक्रमण, मूळ तिबेटन संस्कृतीला बरबाद करून चिनी संस्कृती रूजवायची. दुसरे आर्थिक आक्रमण, त्याप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. तिबेटची अर्थव्यवस्था ही शेती, मेंढ्या पाळणे आणि पर्यटन यावर अवलंबून आहे. त्यामुळे इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तिसरे तिबेटचे पाणी पळवण्याचे कारस्थान. तिबेटमधील पाणी चीन आपल्या दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहे.
तिबेटचे चिनीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. चिनी नागरिक तिबेटमध्ये राहायला जात आहेत. तिबेटची राजधानी ल्हासामध्ये आता दोन लाख हन-चिनी आहेत आणि मूळ तिबेटियन रहिवासी केवळ एक लाखच उरले आहेत.
५०० तिबेटियन लोकांमागे एक पोलीस कर्मचारी
आज चीन तिबेटमधील रहिवाशांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना चीन विरुद्ध आंदोलने करण्याची परवानगी नाही. जे चीन विरुद्ध बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पकडून शिक्षा केली जाते. शाळेतील शिक्षक, धर्मगुरू किंवा लेखक, आंदोलक किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ते, तिबेटविषयी चांगले लिहिणारे कवी, गायक या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे. तिबेटमध्ये चिनी सैनिकांची संख्याही लक्षणीय आहे.त्याशिवाय प्रत्येक ५०० तिबेटियन लोकांमागे एक पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहे. तरीही तिबेटी लोकांची आंदोलने सातत्याने सुरू असतात. त्यापैकी एक मोठा दुर्दैवी प्रकार म्हणजे स्वतःला जाळून घेणे. आतापर्यंत १८० तरूणांनी तिबेट स्वतंत्र व्हावा म्हणून स्वतःला जाळून आत्मदहन केले आहे.
तिबेटी भाषा पुढे वाढू नये, यासाठी त्यावर बंदी आहे. तिबेटी गाणी, कविता, कथा यांच्यावर लक्ष ठेवले जाते. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा फोटो लावण्याची परवानगी नाही. सहा हजारांहून जास्त तिबेटियन मॉन्सेन्ट्रीज नष्ट करण्यात आल्या आहेत.तिबेटी लोकांची संख्या वाढू नये म्हणून तिबेटियन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लादली जाते. हजारो तिबेटियन मुलींना परवानगीशिवाय या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. जे तिबेटी कार्यकर्ते विरोधातील चळवळीत भाग घेतात, त्यांना राजकीय कैदी म्हणून अटक केली जाते आणि त्यांना विकास कामांमध्ये जबरदस्तीने मजुरी कामास ठेवले जाते किंवा चिनी सैन्याकरिता काम करण्यास भाग पाडले जाते. थोडक्यात, चीन तिबेटवर अनेक प्रकारे आक्रमण करत आहे.
तिबेटी सॉफ्टपॉवर, अध्यात्मिक शक्ती चिनी हुकूमशाहीपेक्षा अधिक परिणामकारक
दलाई लामा यांच्या निवृत्तीनंतर पुढच्या दलाई लामावर चीनचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. मात्र, दलाई लामा यांनी एका मंगोलियन आठ वर्षांच्या मुलाला पुढचा दलाई लामा करण्याचे नियोजन केल्यामुळे, चीनच्या या कारस्थानावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.मात्र, काही तज्ज्ञांच्या मते शांततेच्या मार्गाने तिबेटी देत असलेला लढा, त्यांची सॉफ्टपॉवर, अध्यात्मिक शक्ती ही चीनमधील हुकूमशाहीपेक्षा अधिक परिणामकारक ठरु शकेल. जेव्हा सोव्हिएत रशिया फुटला, त्यावेळेला अशा प्रकारे देश वेगळे होतील, अशी कल्पना कोणाच्याही मनात आली नसेल. त्यामुळे तिबेटी लोकांना असे वाटते की, कधीतरी चीनच तुटेल आणि तिबेटला आपले स्वातंत्र्य मिळण्यास मदत मिळेल.भारतामध्ये झालेल्या दुसर्या बुद्धिस्ट समिटमुळे तिबेटी जनतेच्या समस्या सगळ्या जगाच्या समोर मांडण्यात आल्या आणि त्यामुळे चीनला थोडाफार शह देण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळालेले आहे. मात्र, तिबेटी स्वातंत्र्यलढ्याची वाट आज तरी बिकट दिसते. त्यांना सगळ्या जगाने आणि भारतीयांनी मदत करण्याची गरज आहे.