घरात नाही कौल...

04 May 2023 20:13:11
Uddhav Thackeray politics
 
‘घरात नाही कौल, रिकामा डौल’ अशीच सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था. म्हणजेच गरीब असतानाही श्रीमंतीचा डौल करण्याचा थाट! ठाकरे अर्थो‘अर्थी’ तसे अजूनही श्रीमंत असले तरी माणसांची, कार्यकर्त्यांची श्रीमंती मात्र ते त्यांच्याच कर्तृत्वाने कधीच गमावून बसले आहेत. पक्ष फुटला, सत्ता हातची गेली, खुर्चीही सोडावी लागली. तरी जनता, शिवसैनिक आपल्याच पाठीशी असल्याच्या फुटकळ आशावादावर त्यांचे राजेशाही थाटात गुजराण सुरू दिसते. काल ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही याचेच प्रत्यंतर दिसून आले. खरंतर शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पण, पवारांच्या निवृत्तीवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. उलट “पवारांना मी कसा सल्ला देणार? माझा सल्ला पचनी पडला नाही तर...” म्हणत ठाकरेंनी उपरोधिक टीकाही केली. पवारांवर ठाकरेंचा आणि तोही राजकीय विषयांवर सल्ला घ्यायची वेळ येईल, तो दुर्दैवी दिवस उजाडणे नाही. तसेच, पवारांनी त्यांच्या पुस्तकात ठाकरेंविषयी केलेल्या टिप्पणीवरही ठाकरेंनी प्रतिक्रिया देण्याचे टाळलेच. तेही ठीक. पण, मविआला तडा जाईल, असं राष्ट्रवादीत काही घडेल, असं वाटत नाही, अशी पुष्टी ठाकरेंनी जोडली. परंतु, मुळात शिंदेंच्या हाती शिवसेना गेल्यानंतर मविआचे जे वाटोळे व्हायचे होते, ते मुळात ठाकरेंमुळेच झाले. मविआचे सरकारही पडले आणि ठाकरेंची खुर्चीही सरकली. त्यामुळे आता राष्ट्रवादीत काही मोठे बदल झाले काय अथवा नाही, मविआच्या वज्रमुठीची पकड ही आता ढिल्ली झाली आहे, हे मान्य करावेच लागेल. म्हणूनच उष्णतेच्या लाटेच्या नावाखाली आता मविआच्या वज्रमूठ सभाही स्थगित करण्यात आल्या. तेव्हा, मविआच्या अधोगतीची सुरुवातच ठाकरेंच्या पक्षपतनापासून झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मविआवर परिणाम होवो अथवा न होवो, पण मविआच्या स्थापनेचे शिल्पकार पवार असतील, तर मविआच्या राजकीय अंताला जबाबदार हे उद्धव ठाकरेच होते आणि कायम राहतील. पण, एवढं सगळं होऊनही ‘मविआला माझ्याकडून तडा जाणार नाही’ म्हणत ‘गिरे तोभी टांग उपर’ ही ठाकरेंची वृत्ती मुळातच हास्यास्पद म्हणावी लागेल. अशा या ठाकरेंचे राज्याच्या राजकारणात उरलेसुरलेले स्थान, मानमरातबही धुळीस मिळालेला. पण, गल्लीत अंधार असूनही दिल्लीत मशाली पेटवण्याची त्यांची भाषा हा रिकामा डौलच!


...रिकामा डौल

 
देशातील हुकूमशाहीविरोधात विरोधकांची एकजूट... लोकशाहीला वाचवण्यासाठी विरोधकांनो एकत्र या.... यांसारखे आवाहन करणारे देशभरातील काही सत्ताधारी प्रादेशिक पक्ष. त्यांच्यासमोरही म्हणा भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी अशा एकतेच्या प्रयोगाशिवाय पर्याय तो काय म्हणा. ममतादीदी, नितीशकुमार, स्टॅलिन, केसीआर यांसारख्या मोदीविरोधकांनी याकामी पुढाकार घेतला. पवार साहेबही या फळीत होतेच. पण, आता त्यांचा पक्षही राष्ट्रीय राहिला नाही आणि तेही निवृत्तीच्या वाटेवर, तर मग पवार साहेबांचा दिल्लीतील तो विरोधी एकतेचा महाराष्ट्रातील चेहरा म्हणून आता उद्धव ठाकरेंची केविलवाणी धडपड सुरू दिसते. पण, मुळात प्रश्न हाच की, सैन्याशिवाय जशी राजालाही किंमत नसते, तर मग उरलेल्या शिवसेनेचे पराभूत सेनापती असलेल्या ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात कोणी आणि किती गांभीर्याने घ्यावे, हाच खरा प्रश्न!मोदीविरोधक म्हणून सध्या जमवाजमव करणारे राजकीय पक्ष हे किमान त्या त्या राज्यात सत्ताधारी आहेत. त्यांची पक्ष संघटना शाबूत आहे. आमदार आहेत, खासदारही आहेत. तेव्हा, या राजकीय पक्षांच्या निकषात ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना कुठेच बसत नाही. फक्त बाळासाहेबांचे पुत्र आणि महाराष्ट्रातले मोदीविरोधक म्हणून उद्धव ठाकरेंप्रती इतर राजकीय पक्षांना सहानुभूती वाटत असावी. पण, जसजशी लोकसभा निवडणुकांची वेळ जवळ येईल, तसतसे काँग्रेस आणि इतर विरोधक ठाकरेंची जागावाटपादरम्यान बोळवण केल्याशिवाय राहणार नाही. कारण, उद्धव ठाकरेंना राज्यात वाली नाहीच. पण, पक्षफुटीमुळे राष्ट्रीय स्तरावरही उद्धव ठाकरेंची उरलीसुरली ‘बारगेनिंग पॉवर’ही कधीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्रात सोबत हवे असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या गटाला जास्त जागा देऊन, झुकते माप देऊन किती लाभ पदरात पडेल, याची शाश्वती नाहीच. त्यामुळे मोदींविरोधात, भाजपविरोधात कितीही कंठशोष केला तरी विरोधकांच्या कडबोळ्यात ठाकरे किनार्‍यावरच असतील, हेच खरे! तेव्हा, मोदींचा फोटो, भाजपचीच प्रचारयंत्रणा वापरून शिवसेनेचे आमदार-खासदार २०१४ आणि २०१९ साली निवडून आले, याचा सपशेल विसर ठाकरेंना पडलेला दिसतो आणि हिंदुत्व तर काय, त्यांनी कधीच खुंटीला टांगलेले. तेव्हा, ठाकरेंनी असा कितीही रिकामा कौल केला, तरी जनतेचा कौल त्यांच्या नशिबी नसेल, हे निश्चित!


Powered By Sangraha 9.0