मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या औचित्यावर राज्य सरकारच्या वतीने आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून ही घोषणा करण्यात येत असल्याचे या वेळी महाजन यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा बारामती आणि धनगर समाजाला केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बारामती येथे सन २०१९ मध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्याला संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात आले होते.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या ३० वर्षीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून प्रचंड शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या अश्या राजमातेच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याचे आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.