नामाचा महिमा

    31-May-2023   
Total Views |
Article On Ramnam Dasbodh

शांत चित्ताने विचार करून जगाकडे पाहिले, तर लक्षात येते की, सर्व जीवांचा अन्नदाता, पालनपोषणकर्ता परमेश्वर आहे. याबाबतचे सविस्तर विवरण आपण मागील लेखात पाहिले. या परमेश्वराला कोठे पाहावे हे स्वामींनी दासबोधात सांगितले आहे.

देव वर्ततो जगदान्तरी। तो चि आपुले अंतरीं।
त्रैलोकीचे प्राणीमात्रीं। बरे पाहा॥ (१४.८.८)
परमेश्वर चराचर सृष्टीच्या अंतर्यामी वावरत असल्याने त्याला जो जाणतो, त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही आणि तो सुखी होतो, असा संतांचा अभिप्राय आहे. या विश्वाची, तसेच मानवाच्या उद्धाराची सर्व काळजी भगवंताला लागली आहे, असे स्वामींनी मागील श्लोक क्र. ९३ मध्ये सांगितले आहे. (तया लागली तत्त्वता सार चिंता). या भगवंताचे नाम मुखाने घेण्याची फुकटची सोय आहे. तेव्हा आपण ते नाम आदरपूर्वक घेण्यात आपले हित आहे, असे स्वामी सांगतात. नामाने, रामनामाने आत्मसत्तेची जाणीव सतत आपल्या ठिकाणी राहाते, असे असले तरी सामान्य माणसाला वाटत असते की रामनामाने जीवाचा उद्धार झाल्याची काही उदाहरणे आहेत का? समर्थांचा काळ ३५० वर्षांपूर्वीचा असला तरी त्याकाळीही सोदाहरण उपदेश करण्याची पद्धत होती. समर्थ तर लोकशिक्षक असल्याने, उदाहरणे देऊन लोकांना रामनामाचे महत्त्व पटवून द्यावे, असे स्वामींना वाटले असावे. म्हणून स्वामींनी या पुढील तीन श्लोकांतून रामनामासंबंधी पुराणातील काही दाखले दिलेले आहेत. सर्वप्रथम ते भगवान शंकर आणि पार्वतीमातेचा उल्लेख करतात.

तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां।
निवाला हरु तो मुखें नाम घेतां।
जपे आदरें पार्वती विश्वमाता।
म्हणोनी म्हणा ते चि हें नाम आता॥९४॥
सर्वसामर्थ्यवान भगवान शंकरसुद्धा रामनाम घेतात. त्यांना रामनामाचे जणू वेड लागले आहे, असे स्वामींनी श्लोक क्र. ९२ मध्ये म्हटले आहे-कैलासपती भगवान शंकर आणि माता पार्वती रामनामाचा जप करीत असतात, म्हणून स्वामींना त्यांचे फार कौतुक आहे, त्यांचा दाखला स्वामी मधूनमधून देतात. आतापर्यंतच्या श्लोकांचा आढावा घेतला, तर यापूर्वी काही लोकांतून महादेवांचे उदाहरण देताना स्वामी दिसतात. श्लोक क्र. ३१ मध्ये स्वामींनीं ‘जयाते स्मरे शैलजा शूलपाणी’ असे सांगून शंकर-पार्वती दोघेही रामनामाचे स्मरण करीत असतात, हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर श्लोक क्र. ७३ मध्ये ‘सदाशीव चिंतीतसे देवदेवा’ असे म्हटले आहे. पुढे ज्ञानी, वैराग्य, संपन्न व सामथ्यर्र्वान शंकरांचा रामनामावर पूर्ण विश्वास आहे, असे श्लोकक्र. ८३ मध्ये स्वामी सांगतात. (बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे। परी अंतरीं नामविश्वास तेथें) एकदंरीत काय तर रामनामाच्या संदर्भात, सुचेल तेव्हा स्वामी भगवान शंकरांचा आणि पार्वतीमातेचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीत. शंकर ही सर्वसाधारणपणे सर्वत्र पूजली जाणारी सर्वमान्य देवता असल्याने स्वामींनी दिलेले महादेवाचे व मातापार्वतीचे उदाहरण लोकांना जवळचे वाटते.

या श्लोकात स्वामींनी प्रथम महादेवांचे सामर्थ्य सांगितले आहे. राग आला तर महादेव तिन्ही लोक भस्मसात करू शकतात, अशी शक्ती त्यांच्याठिकाणी विद्यमान आहे. जगात सर्वत्र उत्पत्ती, स्थिती, लय हा सृष्टीनियम पाहायला मिळतो. सृष्टीत या क्रिया अखंड चालू असतात. त्यापैकी लय किंवा संहार या क्रियेचे अधिपती शंकर आहेत. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल हे महाभयंकर विष विश्वकल्याणार्थ प्राशन केल्याने त्यांच्या शरीराचा दाह झाला होता. हा शंकर मुखाने रामनाम घेतल्याने शांत झाला, असा पुराणकथेतील दाखला स्वामी देतात. महादेव आणि विश्वजननी पार्वती माता मोठ्या आदराने रामनाम जपत असतात. हे सांगून स्वामी म्हणतात, “अरे म्हणून मी तुम्हाला रामनाम घ्यायला सांगत आहे, ते तुम्ही घ्या.” असं असलं तरी सामान्य माणसांच्या शंका संपत नाहीत. त्यांना वाटते की, भगवान शंकर व माता पार्वती हे महान आहेत. तेव्हा काही सामान्य माणसे रामनामाने उद्धरून गेल्याची उदाहरणे आहेत का? म्हणून स्वामी पुढील श्लोकांत सांगतात-

अजोमळ पापी वदे पुत्रकामे।
तथा मुक्ति नारायणाचेनि नामें।
शुकाकारणे कुंटणी राम वाणीं।
मुखे बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥९५॥
समर्थांच्या काळी पुराण, भागवत यातील कथा लोकांना माहीत असत. म्हणून समर्थ त्या कथांचा उल्लेख सहज जाता जाता करतात. या श्लोकांत उल्लेखलेल्या अजामेळ ब्राह्मणाची कथा श्रीमद्भागवतात आलेली आहे. अजामेळ ब्राह्मण सुरुवातीच्या काळात सदाचारसंपन्न होता. परंतु, एकदा एका सुंदर गणिकेच्या संपर्कात आला. तिच्याशिवाय त्याला चैन पडेना. त्याचे वर्तन बिघडले, तो चारित्र्यहिन झाला. खोटेनाटे व्यवहार करू लागला. त्याच्या ठिकाणी विघातक दुर्गुण आले, तो स्वच्छंदी झाला.

चारित्र्यहिनतेमुळे गावातील लोक त्याला कंटाळले. त्यांनी त्याला गावाबाहेर काढले. त्याच्या स्वैर वर्तनातून त्याला मुलेबाळे झाली. एकदा अचानक एक सत्पुरुष त्याच्या घरी राहिले. गावाने वाळीत टाकल्याचे अजामेळाने त्यांना सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून अजामेळाने आपल्या लहान मुलाचे नाव नारायण ठेवले. हा मुलगा त्याचा अत्यंत लाडका होता तो सारखे ‘नारायण हे केलेस का? नारायण इकडे ये’ वगैरे म्हणत असे. त्याच्या मुखातून सारखे ‘नारायण...नारायण’ नाव येऊ लागले. अजामेळाच्या अंतकाळी तो सारखे नारायणाला हाका मारू लागला. यमदूत त्याचा प्राण नेऊ लागले. पण, विष्णूदुतांंनी त्याला विरोध करून अजामेळाचे प्राण वाचवले. पुढे पश्चात्तापदग्ध होऊन तो उद्धरून गेला.

तसेच, पुराणातील पिंगला वेश्येचा उल्लेख वरील श्लोकात आला आहे. तिचा व्यवसाय वेश्येचा असल्याने ती समाजबहिष्कृत होती. तिने एक पोपट पाळला होता. त्याला ती ‘राम...राम’ व ‘विठ्ठल... विठ्ठल’ बोलायला शिकवत असे. त्यातून आपोआप तिच्या मुखी भगवंताचे नाम सतत येऊ लागले. गणिका असूनही नामाच्या सामर्थ्याने ती उद्धरून गेली, अशी कथा पुराणात आहे. या कथांकडे तार्किकदृष्ट्या पाहता येत नाही. नामाचे सामर्थ्य दाखविण्यासाठी समर्थ या पुराणकथांचा उल्लेख करतात, त्यांचा शब्दश: अर्थ घेऊ नये. तथापि, ‘मरा...मरा’ म्हणताना वाल्मिकींच्या तोंडी रामनाम आले व त्यांनी अपूर्व कार्य केले, असे समर्थ म्हणतात,

उफराट्या नामासाठीं।
वाल्मिक तरला उठाउठी।
भविष्य बदला शतकोटी। चरित्र रघुनाथाचें॥ (दा.३.३.१६)
थोडक्यात, समर्थांना सांगायचे आहे की, रामनामात असे अपूर्व सामर्थ्य आहे की, ते नाम घेणारा पापी आहे, की समाजबहिष्कृत आहे याचा विचार करीत नाही. रामनाम भेदाभेद न करता पुरुष, स्त्री, पापी, बहिष्कृत, सार्‍यांचा उद्धार करते. तथापि, डोळस भक्तीला, ज्ञानी भक्तीला समर्थांनी महत्त्वाचे मानले आहे, हे विसरून चालणार नाही.नकळत घेतलेले नाम एवढे काम करते, तर समजून उमजून घेतलेले रामनाम प्रचंड परिवर्तन घडवून आणील म्हणून रामनाम घ्या, या विचारावर समर्थ ठाम आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..