माझ्यावरील हल्ल्यामागील मास्टरमाइंड जितेंद्र आव्हाडच!

31 May 2023 10:58:11
Anant Karmuse on Jitendra Awhad


मुंबई
: ”तीन वर्षांपूर्वी मला स्वतःच्या बंगल्यावर घेऊन जाऊन मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड त्या घटनेनंतर सुधरतील अशी अपेक्षा होती. मात्र, आव्हाडांच्या वर्तवणुकीत काहीही फरक पडलेला नाही. त्यांची ठाण्यातील दहशत आणि गुंडगिरी करण्याचे उद्योग अजूनही सुरूच आहेत. माझ्यावर झालेला हल्ला आणि त्यामागचा कट रचणारे मास्टरमाइंड हे जितेंद्र आव्हाडच असून त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे,” अशी भावना अनंत करमुसे यांनी व्यक्त केली आहे. आव्हाडांवर आरोप करताना त्यांनी या प्रकरणी दाखल झालेल्या ‘चार्जशीट’वर आपली भूमिका स्पष्ट केली असून न्यायाची अपेक्षा केली आहे. याबाबत त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला.

नव्याने दाखल झालेली ‘चार्जशीट’नक्की काय सांगते? या ‘चार्जशीट’मध्ये नमूद केलेले ठळक मुद्दे कोणते?

ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या 493 पानांच्या ‘चार्जशीट’मध्ये दि. 5 एप्रिल,2020 च्या रात्री माझ्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण कहाणी मांडण्यात आलेली आहे. पोलिसांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून सत्यस्थिती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ‘चार्जशीट’च्या माध्यमातून केला असून अनेक महत्त्वाचे खुलासे यात करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर होणारा तपास संशयास्पद असल्याचे मी म्हटले होते. मात्र त्याकडे तत्कालीन पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले होते. उलटपक्षी मी सांगितलेल्या बाबी नमूद न करता पुरेसा तपास न करता तपास थांबविण्याचे पत्र मला पाठवले होते. नव्याने दाखल केलेल्या ‘चार्जशीट’मध्ये मी घेतलेले आक्षेप, तपासातील त्रुटी, हल्ल्याचा प्रकार होत असताना संबंधितांचे मोबाईल नेटवर्क ट्रेकिंग, मला घेऊन जाण्यासाठी आलेल्या गाड्यांची माहिती या सर्व बाबींचा नव्या ‘चार्जशीट’मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारचा खरा तपास या ‘चार्जशीट’मधून दिसून येत आहे. माझ्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचे या तपासातून समोर आले आहे. ‘चार्जशीट’मध्ये दाखल झालेल्या ‘कलम 364 (अ)’ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना दहा वर्ष किंवा जन्मठेप होऊ शकते.

‘चार्जशीट’ दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर आरोप केले असून सरकारवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप केला आहे. यावर काय सांगाल ?

पोलीस आणि सत्तेचा गैरवापर काय असतो हे जितेंद्र आव्हाडांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सांगूच शकत नाही. या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांवर जरी त्यांनी आरोप केले असले पोलीस कशाप्रकारे दबावाखाली काम करतात हे आव्हाडांच्या काळात घडलेल्या प्रकारातून समोर येते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तपासावर आणि तपास अधिकार्‍यांवर आरोप करण्याचा कुठलाही अधिकार आव्हाड यांना राहिलेला नाही. याच जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरून तत्कालीन परिस्थितीत तीन पोलिसांनी माझ्या घरी येऊन मला उचलून घेऊन जाऊन आव्हाडांच्या आदेशानुसार मला जीवघेणी मारहाण केली होती. तपास अधिकार्‍यांनी जर आता चांगले काम केले असेल तर ते राजकीय दबावाखाली आहेत हे म्हणणे चुकीचे ठरेल. जेव्हा ते तुमच्या आदेशानुसार एखाद्याचे अपहरण करतात तेव्हा ते चांगले असतात आणि जेव्हा ते तुमच्या विरोधात तपास करून ‘चार्जशीट’ दाखल करतात तेव्हा ते वाईट असतात ही आव्हाडांची भूमिका दुटप्पी आहे.

आव्हाडांकडून सातत्याने होणार्‍या प्रकारांकडे पाहून मनात नक्की काय भावना येते ?

मला झालेली मारहाण, विविआना मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडून प्रेक्षकांना केलेली दमदाटी आणि मारहाण, महापालिकेच्या सहा. आयुक्तांसोबत झालेले वाद आणि या सगळ्या घटना लक्षात घेता आव्हाडांच्या राजकीय वरदहस्ताने ठाण्यात एक टोळी चालवली जात आहे हे स्पष्ट आहे. आव्हाड अशाप्रकारच्या गुन्हेगारांना पाळत असून त्यांच्या माध्यमातून असे गुन्हे ठाण्यात केले जात आहेत. इतकेच नाही, तर या टोळीला कुणाचीही भीती वाटत नसून दिवसेंदिवस हे प्रकार सातत्यानं घडत आहेत. अशाप्रकारचे गुन्हे करूनही आव्हाड ताठ मानेने फिरत असून केवळ माध्यमांच्या समोर येऊन संविधानाच्या गप्पा करणार्‍या आव्हाडांना संविधानाशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यामुळे आव्हाडांसारख्या घटकांना जेरबंद घालणे गरजेचे आहे.



Powered By Sangraha 9.0