जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, या उक्तीनुसार अनंत दुःखांना सामोरे जात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोकराज्ञीने, लोकमातेने लोकात्तर कार्य केले. बुधवार, दि. ३१ मे रोजी या धर्मनिष्ठ लोकमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती. त्यानिमित्ताने प्रखर जाज्वल्य हिंदूधर्मसंस्कृती निष्ठ कार्याचा इथे घेतलेला सारांश रूपातला मागोवा.
समस्त भारतवर्षाने आदराने सन्मानितपणे ‘पुण्यश्लोक’ उपाधी दिलेल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर. धर्मनिष्ठा आणि धर्मजागर घेऊन अखंड त्यागमय सतीत्व स्वीकारलेल्या देवी आहिल्या. त्या लौकिक अर्थाने माळवा प्रांताच्या राणी नव्हत्या. पण, त्या देशाच्या लोकमाता होत्या आणि राजमाता होत्या. अहमदनगरच्या मानकोजी शिंद्याची अहिल्याबाई लेक. धनगर समाजाच्या मानकोजींचा देव खंडोबा. ज्याला शिवशंकर म्हणूनही पुजतात. पुढे अहिल्यादेवींचा विवाह माळव्याच्या होळकर घराण्यात झाला. होळकर घराण्याचे आराध्य दैवतही शीवच. भगवान शंकराने हलाहल पचवले आणि विश्वाला जीवनअमृत प्रदान केले. त्या शिवशंकराशी अहिल्यादेवीचे मोठे भक्तीचे नाते. ही भक्ती केवळ अध्यात्मिक नव्हती, कर्मकांडांची नव्हती, तर त्या भक्तीला धर्माची शक्ती साक्ष होती. ती धर्मशक्ती जी जिहादी मानसिकतेच्या विरोधात उभी ठाकून न्यायसत्याचे प्रत्यारोपण करते. ती धर्मशक्ती अहिल्या देवीच्या हृद्यात दीप्तिमान होती. शिवशंकराच्या देवत्वापुढे नतमस्तक होतानाच त्या शिवशंकराच्या मंदिरांचा जिथे म्हणून विध्वंस झाला, तिथे अहिल्याराणीने धर्मजागर केला आणि त्या मंदिरांचे पुर्नस्थापन केले.
हे सोपे नव्हते. काशिविश्वेराचे मंदिर असू देत की सोरटी सोमनाथचे मंदिर असू देत की बिहारचे विष्णूपद मंदिर असू दे या मंदिराचा धर्मांध मुस्लीम आक्रत्यांनी विध्वंस केला. तुमचा धर्म,तुमचा देव यांना उद्ध्वस्त करण्याचे बळ आमच्याकडे आहे हे सांगण्याचा त्यांचा तो क्रूर प्रयत्न असे. उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांना पुन्हा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न हिंदू शक्ती करत असे. पण त्यानंतर पुन्हा ती मंदिर पाडण्याचे फतवे मुस्लीम धर्मांध जुलमी सत्तेकडून निघत असत. हिंदूंच्या धार्मिक सांस्कृतिक अस्मितेला ठेचण्यात त्यांना असूरी आनंद मिळे. ते त्यांचे फर्मान होते. तो त्यांचा ‘जिहाद’ होता. या सगळ्या विरोधात कोणत्याही राज्यावर पूर्ण सत्ताकाळात अजिबात आक्रमण न करणार्या राणी अहिल्याबाई होळकर अध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्तीने उभ्या ठाकल्या. त्यांनी सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशिविश्वेश्वर, विष्णूपाद, महाकाळेश्वर सोबतच अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली.
याशिवाय अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हा जीर्णोद्धार त्या धार्मिक होत्या म्हणून केला, असा ढोबळमानाने अर्थ काढला तरीसुद्धा या सगळ्याच्या अंतरंगात एकच अर्थ ध्वनीत होत होता तो म्हणजे त्या प्रखर धर्माभिमानी राजमाता होत्या. मुघलांनी आणि त्यापूर्वी आलेल्या त्यांच्याच बिरादारीतल्या आक्रमणकर्त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने तोडली, त्याबरोबर हिंदूमनातला आशावाद आणि श्रद्धाशीलताही तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र,एका हिंदू स्त्रीने अहिल्यादेवी होळकर यांनी या सगळ्या जिहादी धर्मांध आक्रमणकर्त्यांना मंदिर जीर्णोद्धारातून संदेश दिला की, ”धर्म श्रद्धा कधीही मरणार नाही, आमच्या धर्माचे तेज कधीही विलुप्त होणार नाही. उलट तुमच्या क्रूरतेने विध्वंस पावलेली आमची मंदिरे आम्ही पुन्हा त्यापेक्षाही वैभवशाली आणि तितक्याच श्रद्धाशीलतेने उभारू शकतो. आम्ही हरलो नाहीत, आम्ही जीवंत आहोत आणि भगवान शिवशंकराच्या प्रलयानंतर जशी पुन्हा उत्पत्ती होते तशीच आमची श्रद्धा पुन्हा पुन्हा तुमच्या अधर्मावर विजय प्राप्त करेल.”
असो, नुसता मंदिरांचा जीर्णोद्धार करूनच या सन्यस्त स्वामीनी थांबल्या नाहीत तर वाराणसी,प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामे या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, बारबवा, विहिरी, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ मंदिर बांधले. कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली. हे सगळे का? तरा श्रद्धास्थानांची लौकिकरित्या पुर्नबांधणी केली. पण, तिथपर्यंत देशाच्या कानाकोपर्यातील समाज गेला, तर तिथे त्याला कोणतीच अडचण पडू नये म्हणून. तीर्थस्थानी आल्यावर भाविकांची किमान अन्न, पाणी आणि निवार्याची सुरक्षित सोय व्हावी यासाठी. या ठिकाणी धर्मपरायण अहिल्यादेवींनी नामाकिंत वैदूनाही वसवले.
जेणेकरून या ठिकाणी येऊन कुणी आजारी झालेच, तर त्यांना उपचार मिळावेत. इतकेच काय या देवस्थानांनाजोडणारे रस्ते, पायवाटाही या जाणत्या राणीने बांधले. प्रवास करताना लोकांना उन्हातान्हात वृक्षांची छाया मिळावी यासाठी डेरेदार वृक्षांची लागवडही केली. हे सगळे का? तर कोणत्याही हिंदूंना भाविकांना या देवस्थानी यायचे असेल, तर त्याला कसलीच तोशीस पडू नये, त्याला कोणताच किंतू-परंतु पडू नये म्हणून. श्रीमंताबरोबरच गोरगरिबांनाही देवस्थानाचे दर्शन घेता यावे म्हणून. त्याकाळी अनेक ठिकाणी जंगल वाटेवर चोर लुटारू असत. ते येणार्या वाटसरूला लुटत. त्यामुळे आपल्या देवाचे दर्शन घ्यायला गेलो, तिथे सगळी सुविधा असली तरीसुद्धा वाटेत चोर, दरोडेखोर लुटणार आणि जीवही घेतील या भीतीपाई लोक यात्रा करत नसत. यावर उपाय म्हणून आणि प्रजेमध्ये सुरक्षा प्रस्थापित व्हावी म्हणून अहिल्याबाई या लोकोत्तर राणीने एक नवीन योजना निर्माण केली.
त्यांनी ज्या मार्गावर दरोडेखोर असत तिथली माहिती घेतली. त्यांनी या दरोडेखोरांच्या उत्पन्नासाठी एक नवा मार्ग काढला. त्यामार्गाहून जाणाारे प्रवासी या दरोडेखेारांना, लुटारूंना जुजबी शुल्क देतील. त्याबदल्यात या दरोडेखोरांनी या प्रवाशांच्या यात्रेकरूंच्या जीविताची आणि सपंत्तीची काळजी घ्यावी. त्याची जर क्षुल्लक जरी हानी झाली तरी त्याची जबाबदारी आणि त्याबद्दल शासन हे तिथल्या दरोडेखोरांना होणार असा आदेशच अहिल्याराणीने काढला. तसेच या लोकांनी गुन्हेगारी सेाडून द्यावी म्हणून पुण्यवती अहिल्यादेवींनी त्यांना शेती करण्यासाठी जमिनी दिल्या. शेतीचे उत्पन्न आणि मार्गस्थ होणार्या प्रवासी यात्रेकरूंकडून मिळणार्या शुल्कातून या लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले. त्यामुळे नर्मदेच्या तिरावरील दाट जंगलभागातून प्रवास करत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम प्रवास करणार्या यात्रेकरूंना सुरक्षा मिळाली. हे सगळे करताना स्थानिक जनतेच्या हिताचाही विचार या प्रजाहितकारणी राणीने केला. त्यासाठी जिथे जिथे मंदिरांचा जीर्णोद्धारकेला. तिथे तिथे स्थानिक समाजातील कलाकुसर आणि व्यापारउदिमाला प्रोत्साहनपरउपक्रम सुरू केले.
असो, भगवान शिवाबद्दल त्यांची भक्ती अनन्यसाधारण होतीच. पण त्यामध्ये भुतदया सामावलेली होती. महेश्वर येथे १०८ ब्राह्मणवृद्ध दररोज सव्वालाख शिवलिंगांची पूजा करत आणि ते नर्मदेच्या पात्रात विसर्जित करत असे म्हंटले जाते. अर्थात यात अध्यात्मिकरित्या मनशांती मिळवत चित्त एकाग्र होत असणारच. दुसरे असे की, या मातीच्या शिवलींगामध्ये धान्यही असे. धनधान्ययुक्त हे शिवलींग नदीच्या पाण्यात विरघळत मात्र त्यातील धनधान्य नदीच्या भुगर्भात असलेल्या जलचर सृष्टीला नित्यनियमाने अन्न म्हणून मिळत असे. हिंदू विचारशैलीमध्ये भूतदयेचा विचार केला आहे. गंगाजळनिर्मळ अहिल्या देवी धर्माचे अधिष्ठान असलेली भूतदया तंतोतंत जगत होत्या.
त्यामुळेच पशुपक्षांच्या अन्न निवार्यासकट उपचारासाठीही त्यांनी केंद्रे सुरू केली. इतकेच काय? पशूंना चरण्यासाठी वेगळी शेती असावी, असा दंडकही सुरू केला. गरीब भूमिहीनांना शेतीसाठी जमीन दिली आणि त्यात नियम आणला की, २१ फळझाड लावली, तर त्यातली नऊ फळझाडांची उत्पन्न त्या शेतकर्यांने स्वतःकरिता राखायचे आणि ११ फळझाडांचे उत्पन्न सरकारी खजिन्यात द्यायचे. याचबरोबर नर्मदामाईवर अतीव श्रद्धा असलेल्या प्रात:स्मरणीय अहिल्याबाईंनी नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून दैनंदिन कामासाठी नदीच्या प्रवाहाचे विभाजन करून दुसरा प्रवाह काढला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे १६ व्या शतकामध्ये संत तुकारामांनी सांगितले तो हिंदू समाजाचा तत्वगाभा मातोश्री अहिल्याराणीच्या जीवनाचा सारांश होता.
मंदिर जीर्णोद्धारातून आणि लोकहितात्मक कार्यातून असेतू हिमाचल ठसा उमटवणार्या या युंगधरा राणीने सगळ्या भारतवर्षाला धार्मिकतेने जोडले. धर्मपरायण अहिल्यादेवी यांनी उत्तरेचे काशिविश्वनाथ मंदिर आणि दक्षिणेचे रामेश्वर मंदिर पश्चिमेचे सोरटी सोमनाथ मंदिर आणि पूर्वेचे विष्णूपद मंदिर या सगळ्या मंदिरांचे पुर्नबांधणी केली. हे ’एक भारत श्रेष्ठ भारत एक हिंदू श्रेष्ठ हिंदू’ या जाणिवेची बीज होती हे नक्कीच. १७५७ इंग्रजांविरोधातला लढाई अपयश आले. पण त्यानंतर दोन शतकांनी भारतालास्वातंत्र्य मिळाले त्याची पायाभरणी ही राष्ट्रमाता अहिल्यादेवींच्या कार्यातूनच झाली. कारण, दक्षिणेतला हिंदू उत्तरेकडे आणि पूर्वेचा हिंदू पश्चिमेकडे भक्तीभावाने तिर्थाटन करू लागला आणि त्यामुळचे धर्म म्हणून, संस्कृती म्हणून आम्ही एक आहोत, अशी भावना सगळ्या भारतीयांच्या मनात दृढ व्हायला मदत झाली. मुघलांचे राज्य आले आणि धर्म वाचवण्यासाठी जीवांचा आकांत करावा लागला. पण, आमच्यातली एक राणी धर्माची प्रतीक पुन्हा श्रद्धाशीलतेने उभारते हा एक सुखद आत्मविश्वास पुण्यात्मक रणरागिणी अहिल्यादेवीमुळेच समाजात निर्माण झाला यात शंका नाही.
असो, अवघे राज्य अहिल्यादेवींनी शिवसमर्पण केले होते. त्यांच्या राजाज्ञेवरच नाही, तर प्रत्येक आज्ञेवर ‘श्री शंकर आज्ञा’ लिहिलेले असे. त्यांचे प्रत्येक कार्य, विचार श्री शंकराच्या आज्ञेनुसार आहे. हे साम्राज्य केवळ श्री शंकराचे म्हणजे देवाचे असून आपण केवळ त्याचे उपभोग्य शून्य स्वामी. नव्हे, नव्हे सेवक आहोत असे राजयोगिनी अहिल्यादेवींचे मत होते. त्यामुळेच त्यांच्या कर्तव्यपरायणेतेवर, न्यायनिष्ठूरतेवर आणि धर्मसंस्कृती वर्तनावर आप्तांनी तर सोडाच शत्रूनीही शंका घेतली नाही. त्यांच्या काळात मुसलमान, पठाण, इंग्रंज, फ्रेंच आणि हिंदू साम्राज्यही आपसात युद्धाच्या भूमिकेेत होते. मात्र, माळव्याच्या या राणीने पार काश्मीर ते कन्याकुमारी आणि सौराष्ट्र ते पूर्वेत्तर भागात लोकोत्तर कार्य केले. पण, कोणत्याही संस्थानिकाने, राजाने अगदी अयोध्येचा नबाब असू दे की निजाम कुणीही त्यांना विरोध केला नाही. कारण, हिंदू संस्कृतीनिष्ठतेने येणाारी सद्सद्विवेकबुद्धीचे शौर्य, तेज त्यांच्यात होते. एक हिंदू साम्राज्ञी कशी असावी? एक राष्ट्रमाता कशी असावीयाचे अतिशय तेजस्वी स्वरूप म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर होय! प्रखर धर्माभिमानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम!
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रणाम करतो. त्यांनी विश्वनाथ ते सोमनाथपर्यंत कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. प्राचीनताआणि आधुनिकतेचा संगम त्यांच्या जीवनामध्ये होता. आज देश त्यांच्या त्या जिवनकार्याला आदर्श मानून पुढे जात आहे. (नरेंद्र मोदी, पंतप्रधान)