स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक : कुलगुरू प्रा. योगेश सिंह

30 May 2023 19:38:53
Prof. Yogesh Singh Delhi University

नवी दिल्ली
: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या विचारांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह यांनी दिली आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समावेश वैकल्पिक विषय म्हणून करण्यात आला आहे. याअंतर्गत आता दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्राचे विद्यार्थ्यांना सहाव्या सत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास करता येणार आहे. त्याचप्रमाणे चौथ्या सत्रात महात्मा गांधी आणि पाचव्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

त्याविषयी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह म्हणाले, विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समावेश करण्याचा प्रस्ताव विद्वत परिषदेस दिला होता. त्यानंतर ११० सदस्यांचा समावेश असलेल्या परिषदेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये वैचारिक खुलेपणाची परंपरा आहे, त्यामुळे हा वादाचा विषय कोणीही बनवू नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती विद्यार्थ्यांना होण्यात काहीही गैर नाही. त्याचप्रमाणे विद्वत परिषदेतील निवडक चार ते पाच जणांनीच यास विरोध केला असून उर्वरित १०० हून अधिक सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला असल्याचेही योगेश सिंह यांनी यावेळी सांगितले.

७५ वर्षे मोहम्मद इक्बाल शिकविणे हे आश्चर्यच

मोहम्मद इक्बाल यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत जरूर रचले, मात्र त्यांनी भारताला कधीही आपले मानले नाही. पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता, त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. संबंध असलातच तर भारताचे विभाजन करण्याशीच त्यांचा संबंध आहे. खरे तर भारतात ७५ वर्षे मोहम्मद इक्बाल शिकवले जात होते, हेच माझ्यासाठी आश्चर्याचे असल्याचेही प्रा. सिंह यांनी यावेळी सांगितले आहे.


Powered By Sangraha 9.0