रामनामाची उपेक्षा हानिकारक

03 May 2023 20:42:57
Ram


ज्याला रामाचा आठव नाही व ज्याच्या मुखातून कधीही रामनाम येत नाही, त्याचे मोठे नुकसान होते हे वर सांगितले आहेच. याचा नीट विचार केला, तर पारमार्थिक नुकसानी बरोबर प्रापंचिक बाबतीतही नुकसान संभवते. जे आळसाने रामनामाचा कंटाळा करतात, जे रामनामापासून दूर आहेत किंवा नामस्मरणाला क्षुल्लक समजून नामधारकांची टिंगलटवाळी करतात आणि स्वतःला पुढारलेले समजतात, अशांच्या ठिकाणी देहबुद्धी, गर्व, राग हे दुर्गुण वाढीस लागतात.


मनाच्या श्लोकांतील नामाची, रामनामाची महती सांगणार्‍या श्लोकांचा हा गट सुमारे २० श्लोकांचा आहे. नामस्मरण, रामनाम हे स्वामींच्या आवडीचे विषय आहेत. लोकात, जनात वावरताना तसेच कुटुंबासमवेत भोजन करताना आपण समुदायात असतो. अशा प्रसंगी परमेश्वराचा विसर पडू नये म्हणून भगवंताचे नाम ’अती आदरे गद्यघोषे म्हणावे’ असे स्वामींनी मागील श्लोक क्र. ८९ मध्ये सांगितले आहे. त्यातील ’आदरे’ हा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, एकतर नामाचे महत्त्व जाणणारे थोडे असतात आणि बरेच जण कुणी सांगितले म्हणून नाम घेतात, पण ते खूप वरवरचे असते. स्वामी ’भोजनीं नाम घ्यावे’ असे सांगतात. तथापि, भुकेने व्याकूळ झाल्यावर माणसाचे कशात लक्ष लागत नाही आणि माणसाची वृत्ती पालटते. अशावेळी शांत राहून मनात रामाचे स्मरण करणे अथवा रामनाम घेणे कठीण असते. भोजनप्रसंगाचे हे साधे उदाहरण स्वामींनी वृत्ती कशी झटकन पालटते, हे सांगण्यासाठी प्रस्तुत श्लोकात घेतले आहे.


माणूस रोजच्या व्यवहारात शांत राहाण्याचा प्रयत्न करीत असला तरी वृत्ती पालटण्याचे अनेक प्रसंग दैनंदिन जीवनात नेहमी येत असतात. अशावेळी माणसाची नामाच्या बाबतीत खरी परीक्षा असते. या प्रसंगी भगवंताच्या नामाचा, रामनामाचा विसर पडला, तर माणूस पालटलेल्या वृत्तीबरोबर वाहावत जातो. त्याचे मन क्षणभर आनंदी, निराश तरी होते किंवा चित्त विच्छिन्न होऊन ते कशाचाही उपयोगाचे राहात नाही. काही वेळा चित्र पालटून कामक्रोधादी विकारांच्या पाशात चित्तवृत्ती अडकल्याने माणसाचे भान हरपते. कामक्रोधादी विकारांच्या दुष्परिणामाने माणसाचे सर्वार्थाने नुकसान होते. ज्याच्या ठिकाणी सतत नामाची आठवण आहे, तो भगवंतांच्या गुणांच्या स्मरणाने आपल्या मूळ स्थितीपासून ढळण्याची तसेच वृत्तीत पालट होण्याची शक्यता कमी असते. रामनाम तुम्हाला नुकसानीपासून वाचवते. रामनाम नसेल तेथे माठे नुकसान संभवते. हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-

न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी।
हरीनाम हें वेदशाली पुराणीं।
बहू आगळें बोलिली व्यासवाणी॥९०॥

अनेक जन्म फिरून आल्यावर पूर्वपुण्याईने जीवाला मनुष्यजन्म प्राप्त होतो, असे भारतीय आध्यात्मशास्त्र मानते. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांवर हिंदूधर्मशास्त्राचा अर्थात भारतीय तत्त्वज्ञानाचा विश्वास आहे. त्यामुळे अंतकाळी जीवाची जी स्थिती असेल, ज्या विकारांचा पगडा असेल, त्यानुसार जीवाला पुढील जन्म मिळतो, असे शास्त्रात सांगितले आहे. मागील संचिताचा भोग घेणेे व पुढील जन्मासाठी संचिताच्या साठ्यात नवी भर घालणे व त्यासाठी पुन्हा जन्माला येणे असा जन्ममृत्यूंचा खेळ चालू होतो. माणसाला निसर्गाने अर्थात भगवंताने, इतर प्राण्यांत नाही ती बुद्धी, विवेक, विचार, प्रतिभा यांची देणगी दिली आहे. त्यामुळे मनुष्ययोनीतच जीवाचा उद्धार शक्य आहे. परमेश्वराची प्राप्ती करून घेणे, त्या विश्वनिर्मात्याची प्रत्यक्षानुभूती घेणे हे अध्यात्मातील परमोच्च ध्येय मानले जाते. निसर्गाने दिलेल्या देणगीनुसार, चारित्र्य, नीतिमानता, निःस्वार्थ, अहंकाररहित, वर्तन इत्यादी गुण आत्मसात करून अध्यात्मातील परमोच्च ध्येय गाठायचे, तर त्यासाठी रामनामासारखे सोपे साधन नाही. म्हणून समर्थ म्हणतात की, ज्याच्या वाणीत कधीही रामनाम येत नाही, ज्याला रामाच्या गुणांचे स्मरण नाही, जो आपल्याच अहंकारी धुंदीत मदोन्मत्त आहे, त्याचे आयुष्यात फार मोठे नुकसान होते. अशी माणसे मानवी जीवन मिळूनही करंटीच आहेत. ज्याने नामाकडे दुर्लक्ष केले, त्याला स्वामींनी अतीक्षुद्र व हीन म्हटले आहे. कारण, स्वतःच्या हिताची त्याला काळजी नाही.

ज्याला रामाचा आठव नाही व ज्याच्या मुखातून कधीही रामनाम येत नाही, त्याचे मोठे नुकसान होते हे वर सांगितले आहेच. याचा नीट विचार केला, तर पारमार्थिक नुकसानी बरोबर प्रापंचिक बाबतीतही नुकसान संभवते. जे आळसाने रामनामाचा कंटाळा करतात, जे रामनामापासून दूर आहेत किंवा नामस्मरणाला क्षुल्लक समजून नामधारकांची टिंगलटवाळी करतात आणि स्वतःला पुढारलेले समजतात, अशांच्या ठिकाणी देहबुद्धी, गर्व, राग हे दुर्गुण वाढीस लागतात. त्या आधारावर फुशारक्या मारून दुर्गुणाची प्रमाणाबाहेर वाढ झाली की त्यांचे मानसिक संतुलन बिघडायला वेळ लागत नाही. अशांच्या ठिकाणी गर्व, अतिक्रोध, मत्सर, द्वेष इत्यादी अवगुण आश्रयाला येतात. त्यांचा विवेक मावळतो. आपण काय करतो, कसे वागतो, कसे बोलतो याचे त्यांना भान राहात नाही. अशांचे जीवन सर्वार्थाने फुकट आहे, असेच म्हणावे लागते. स्वामी प्रस्तुत श्लोकात सांगतात की, ’जनी वेर्थ प्राणी तथा नाम काणी’ अशांचे जीवन व्यर्थ आहे. ‘काणी’ या शब्दाचे अर्थ अभ्यासकांनी वेगवेगळे लावले आहेत. काहींच्या मते काणी म्हणजे कष्टदायक, नकोसे, तर काही त्याचा अर्थ दीन, दुःखी, हीन असा लावतात.काणी शब्द नामाशी जोडला, तर त्याचा अर्थ नाम कष्टदायक नकोसे वाटणारेअसा करता येतो आणि काणी शब्द ’प्राणी’शी जोडला तर हीन, दीन असा अर्थ घेता येतो.

 नाम न घेणारा अती हीन, क्षुद्र समजावा’ हा प्रा. के वि. बेलसरे यांनी काढलेला अथर्र् स्वामीच्या विचारांच्या जवळचा वाटतो, असे स्वामी म्हणतात. भगवंतनामाला, रामनामाला जे क्षुद्र समजतात, अशांचे जीवन व्यर्थ आहे. मानवी देह मिळूनही त्याचे सार्थक करून न घेता त्यांनी आपले नुकसान करून घेतले आहे, असे म्हणावे लागते. नामाचे महत्त्व त्यांना समजले नाही, स्वामी पुढे सांगतात की, हरिनामाचे महत्त्व काही आजचे नाही. वेदशास्त्रात, पुराणातही नामाचे महत्त्व सांगितले आहे. महर्षी व्यासमुनींनी नाम हे श्रेष्ठ आहे, असेच सांगितले आहे. व्यासांनी महाभारत, १८ पुराणे यांची रचना केली आहे व्यासमुनींच्या ठिकाणी अपूर्व अशी बुद्धिमता, प्रतिभा आहे. अनेक ग्रंथ लिहूनही काहीतरी कमतरता आहे, असे वाटून ते समाधानी नव्हते. नारद महर्षींनी व्यासांना सल्ला दिला की, तुम्ही आतापर्यंतच्या ग्रंथांतून इतिहास सांगितला. मानवी स्वभावांचे चित्रण केले. पण, तुम्ही भगवंताची स्तुती केली नाही. त्याशिवाय व नाममहात्म्याशिवाय खरे समाधान मिळणार नाही. नंतर तुम्ही भगवंताची व्यासांनी भागवत ग्रंथ लिहून भगवान श्रीकृष्णांची स्तुती गायिली आणि नामाची महती वर्णन केली. तेव्हा त्यांना हवे ते समाधान मिळाले म्हणून स्वामी म्हणतात, ‘बहु आगळे बोलिली व्यासवाणी.’ समर्थांची नामनिष्ठा असाधारण आहे. दासबोधातही समास ४.३ मध्ये नामस्मरणभक्ती विस्ताराने सांगितली आहे. तत्कालीन समाजरचनेला अनुसरून समर्थ सांगतात, चारही वर्णांना नामाचा अधिकार आहे. नाम घेणार्‍यात लहानथोर हा प्रश्न उद्भवत नाही. तुम्ही सामान्य बुद्धीचे असाल तरी रामनामाने रचित स्थिर होऊन प्रपंचव्यापातून मुक्त होऊन पैलतिरीचा भगवंत सहजपणे तुमच्या हाती येईल.

 
चहुं वर्णां नामाधिकार। नामीं नाहीं लहानथोर।
जड मूढ पैलपार। पावती नामें॥

यासाठी मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने न कंटाळता रामनाम घेणे आवश्यक आहे. तथापि स्वभावतः आपला ओढा दृश्यवस्तूंकडे असल्यामुळे नामाचे महत्त्व स्वामींनी मोठ्या कळकळीने पुढील श्लोकात सांगितले आहे, तो भाग पुढील लेखात पाहता येईल. (क्रमश:)




Powered By Sangraha 9.0