कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान भाग २४

03 May 2023 20:51:21
Kundalini Shakti

 
शरीर स्वास्थ्यासाठी रोज काही प्राणायाम करणे आवश्यक आहेत.


भ्रामरी : पद्मासनावर बसून प्रथम नाकाने खूप श्वास आत घ्यावा. नंतर नाकाद्वारेच भ्रमरासारखा आंदोलनात्मक दीर्घ आवाज करून त्यात मन एकाग्र होऊ द्यावे. वरीलप्रमाणे मन एकाग्र झाल्यावर शरीरातील सर्व रोग नष्ट होऊन साधकाची कुंडलिनी आपोआप जागृत होत असते. हृदयविकाराकरिता हा प्राणायाम श्रेष्ठ आहे.
 
षण्मुखी : आपल्या मुखात सहा द्वारे आहेत. एक तोंड, दुसरे नाक, तिसरे चौथे दोन्ही डोळे आणि पाचवे-सहावे म्हणजे दोन्ही कान होत. दोन्ही शेवटची बोटे तोंडावर ठेवून मुख बंद करावे, मध्यमा नाकाच्या पुड्यांवर, तर्जनी डोळ्यांवर आणि अंगठे कानात घालून सहा मुखे बंद करावीत. तत्पूर्वी नाकाने खूप श्वास घेऊन तो आत कोंडावा. नंतर डोळ्यांवरील तर्जनी डोळ्यांवर थोड्या दाबून डोळ्यात अनेक दिव्य प्रकाश व आकृत्या पाहाव्यात. त्यात मन गुंग होऊन जाते. श्वास आत कोंडताना त्रास होत असल्यास श्वास हळूहळू नाकपुड्यांनी बाहेर सोडावा. पुन्हा श्वास आत कोंडून कानावरील अंगठे ताठ दाबावे. कानात अनेक नाद येतात. त्यापैकी एक नाद ऐकावा. चित्त एकाग्र होते. अशाच तर्‍हेने श्वास घेऊन आत कोंडून नाकावर, जिव्हाग्रावर, जिव्हामूलावर व कंठावर चित्त एकाग्र करावे. पंचतत्वांचा अनुभव येऊन चित्त एकाग्र होऊन जाते व कुंडलिनी आपोआप जागृत होईल.

हा प्राणायाम सिद्ध झाल्यास पंचगुणात्मक दिव्य अनुभूती येऊ लागतात. उदबत्ती अत्तर नसताना दिव्य सुंगध आपोआपच येऊ लागतात. नंतर साधकाच्या शरीरातून तसाच दिव्य सुगंध येऊ लागतो. दिव्य अनाहत नाद ऐकू येऊ लागतात. त्या दिव्य नादात साधक रंगून जातो. अनाहतनाद ऐकल्यावर परमेश्वरदर्शन किंवा आत्मज्ञान दूर नसते. दिव्य रसांचा अनुभव येऊन साधक सदा तृप्त असतो. आहार नगण्य होतो. शरीर प्रमाणबद्ध होते. पंचमहाभूतांची मूल अवस्था ज्ञात होऊन साधक परमयोगी होतो. महाराष्ट्रातील सर्व संतांनी षण्मुखी प्राणायामाचा अभ्यास सतत केला असल्यामुळे ते भक्तिमार्गासह योगीही बनले आहेत. भक्तिमार्ग आणि योगमार्ग एकमेकांस पूरक आहेत. निरक्षर अशा जनाबाईंनी आपल्या सहज सुलभ पण साहित्यिक भाषेत षण्मुखी प्राणायामाचे सुंदर वर्णन केले आहे.
 
धरिला पंढरीचा चोर। पायी बांधोनिया दोर। सोहं शब्दे मारा केला। आत विठ्ठल कोंडिला॥
विठ्ठल काकुळती आला। जनी म्हणे गा विठ्ठला।आता जीवे न सोडी तुजला॥

‘नामयाची जनी, कोण तिचा भाव’ ‘जेवी पंढरीराव तिचे सवे.’ जनाबाईंना शिक्षण नाही, काही नाही. दुसर्‍यांच्या घरातील भांडी घासायची ती. ती जेवत असताना पांडुरंगाने यावे व तिच्यासोबत जेवावे. काय विलक्षण अधिकार हा! महान योगिनी. त्यांचे हे पद आहे. यात त्यांनी कुंभक प्राणायामाचे वर्णन केले आहे. कुठून शिकल्या असतील त्या? भक्तीमार्ग व योगमार्ग एकत्रच अनुभवला. या एका अभंगावर शोध प्रबंध लिहिला तर ‘पीएच.डी’ची डिग्री नक्की मिळेल. पायाला दोर बांधल्यावर धावता येत नाही, वेग कमी होतो. म्हणजे गती कुंठीत केली, श्वास निरुद्ध केला. ती योगशास्त्रातील महान योगिनी होती हा त्याचा अर्थ आहे. कित्येकांना त्याचा अर्थच कळत नाही. ‘सोहम् शब्दे मारा केला’ म्हणजे मीच ते परमतत्व आहे. काय महान काव्य आहे! उच्च अनुभव आहेत. त्यांना अशिक्षित, अडाणी म्हटले जाते. पुढे त्या लिहितात, ‘विठ्ठल काकुळतीला आला, विठ्ठला जीवे न सोडी तुजला.’ अर्थात, विठ्ठला तुला आता मी असंच सोडणार नाही. मी स्वतःच तुझ्यात सामावेन, स्वतः परमेश्वर होईन, हा अधिकार होता जनाबाईंचा!

षण्मुखी प्राणायामाचा नित्य अभ्यास भक्ताला परमयोगी बनवितो. असल्या अवस्थेत कुंडलिनी आपोआप जागृत झाल्यास नवल ते काय?लोम अनुलोम अथवा कुंभक प्राणायाम : सर्व प्राणायामात हा प्राणायाम श्रेष्ठ आहे. परंतु, तो अतिशय तांत्रिक असल्यामुळे योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मुळीच करू नये. ‘कुंभक प्राणायाम’ म्हटला की, अनेकांच्या मनात धास्ती उत्पन्न होते. केवळ वाचून वा ऐकून स्वतःच गुरूशिवाय प्राणायाम सुरू केल्यास साधकाच्या शरीरात विकृती उत्पन्न होऊन साधकाला अतिशय क्लेश व पीडा उत्पन्न होते, हे मात्र खरे आहे. कित्येक साधकांच्या शरीरात ते जीवंत असेपर्यंत पीडा राहिली आहे, असा अनुभव आहे. त्यामुळे कुंभक प्राणायाम साधना सुयोग्य गुरुंच्या सान्निध्यात वा त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहूनच करावी हे योग्य आहे. पुरक, कुंभक, रेचक प्रकारचा प्राणायाम शवासन साधनेकरिता देखील उपयुक्त आहे. पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास कोंडून ठेवणे, तर रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे होय. कुंभकातही दोन प्रकार आहेत. एकात श्वास आत कोंडायचा असतो, तर दुसर्‍यात श्वास सोडल्यावर तितका वेळ श्वास न घेता राहायचे असते. पहिल्या प्रकारात श्वास आत कोंडण्याच्या प्रक्रियेला ‘अंतःकुंभक’ असे म्हणतात, तर श्वास सोडून तितका वेळ श्वासाशिवाय राहणे याला ‘बहिःकुंभक’ असे म्हणतात.

दोन्ही प्रकाराद्वारे प्राणावर संयम येतो. बहिःकुंभकात फुफ्फुसात वायू नसल्यामुळे शरीरात पीडा होण्याचा संभव कमी असतो. ज्याला जो प्रकार साधेल, त्याने तो करावा. साधकाने एका वेळी एकच म्हणजे ‘अंतःकुंभक’ किंवा ‘बहिःकुंभक’ प्राणायाम करावा. दोन्ही प्राणायाम एकत्र केल्यास ‘तंतू’ संस्था विघटित होऊन वेडसुद्धा लागू शकते. अमुक श्रेष्ठ आणि तमुक कनिष्ठ असे मानण्याचे कारण नाही. सिद्धीप्राप्ती व संयमाकरिता अंतःकुंभकामुळे अधिक लाभ होऊ शकतो. पण, हा जटिल अनुभवाचा विषय असल्याने त्यावर अधिक चर्चा करुन साधारणांना लाभ होणार नाही.अंतःकुंभक प्राणायामात सुरुवातीला पूरक, कुंभक, रेचक यातील प्रमाण १:४:२ असे असावे. म्हणजे समजा एका सेकंदात नाकपुडीने हवा ओढून पूरक केल्यास अंतःकुंभक चार सेकंद करावा. नंतर दुसरी नाकपुडी मोकळी करून त्याद्वारे दोन सेकंद कालावधीत रेचक करावा. नंतर थोडे थांबून रेचक केलेल्या नाकपुडीने पुन्हा एक सेकंद पूरक करून कुंभक चार सेकंद करावा आणि पहिल्यांदा पूरक केलेल्या नाकपुडीने रेचक दोन सेकंदांत करावा. हा झाला अंतःकुंभक.बहिःकुंभकात पूरक एक सेकंद तर रेचक लगेच दोन सेकंद करावा. रेचकानंतर श्वास न घेता बहिःकुंभक चार सेकंद करावा. अंत: कुंभकात श्वास कोंडून राहायचे असते, तर बहिःकुंभकात कुंभक श्वास सोडून करायचा असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अतिकठीण योग साधना करीत असत.


-योगिराज हरकरे
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)

 
 
Powered By Sangraha 9.0