सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन-आयुर्वेदासंगे

29 May 2023 21:06:04
Article on beauty care

अभ्यंगाचे विविध फायदे आधीच्या लेखामधून विस्तृत मांडलेले आहेत. तेव्हा, आजच्या लेखात सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने अभ्यंगाचा विशेष विचार आजच्या लेखातून करुयात.

त्वचा बाह्य वातावरणापासून शरीराचे संरक्षण करते. म्हणजे तीव्र ऊन-वारा, पाऊस, धूळ, धूर, कीटक इ.चा शरीरात प्रवेश रोखते. तसेच, शरीरातील आतील अवयवांतील स्राव, लस इत्यादीचा बाह्य वातावरणाशी संपर्क होऊ देत नाही. याचबरोबर स्पर्शज्ञानदेखील त्वचेमार्फतच होते. हळूवार घातलेली फुंकर, पाण्याचा स्पर्श, थंड हवेचा स्पर्श ते कीटक दंश, चटका बसणे इ. सर्व संवेदना त्वचेमुळेच कळतात.

त्वचा उत्तम असणे, सुस्थितीत असणे हे केवळ सौंदर्यदृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर त्याची विविध कार्ये व्यवस्थित सुरळीत नियमित होण्यासाठीदेखील महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. त्वचेची झीज सतत होत असते आणि दर २८ दिवसांची नवीन त्वचा तयार होते. आतील स्तर वर-वर सरकतो आणि सर्वांत बाह्य स्तर झडून जातो. हे चक्र प्रत्येक व्यक्तीत सतत क्रियाशील असते. प्रकृतीनुरुप त्वचेचा पोत, रंग नितळपणा हे कमी जास्त होते. पण, सतत नवीन पेशींची निर्मिती प्रत्येक व्यक्तीत होतच राहते.

त्वचेचा स्वभाव हा स्नेहप्रिय (lipophillc in nature)असा आहे. म्हणजेच नैसर्गिक पोत, रंग, इ. टिकविण्यासाठी त्वचेला जलीयांश व स्निग्धांश दोन्हीची गरज असते. त्वचेतील स्वेद ग्रंथी व अन्य ग्रंथीमुळे हे पुरविले जाते. पण, काही विशिष्ट ऋतूमध्ये (जसे थंडीत) व वयामध्ये (जसे प्रौढावस्थेत) त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी पडते. म्हणजे ग्रंथीमधल्या स्रावांमधून त्वचेत निर्माण होणारे तैलीय तत्व कमी पडते आणि नवनिर्मिती सतत सुरू असल्याने ही स्निग्धतेची गरज भासते.

ही गरज अभ्यंगाने पूर्ण होते, म्हणून आयुर्वेदशास्त्रात नित्य अभ्यंग करण्यास सांगितले आहे. (अभ्यंग आचरत् नित्यम्) दिनचर्या (रोजच्या दैनंदिन आचरणाच्या विधिमध्ये) अभ्यंगाचा समावेश केलेला आहे. नवजात बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकास अभ्यंगाचा उपयोग होतो. अभ्यंग म्हणजे सर्वांगाला तेल लावणे, हलके चोळणे. यासाठी खूप वेळही लागत नाही आणि कष्टही करावे लागत नाहीत. अभ्यंगाचे विविध फायदे आधीच्या लेखामधून विस्तृत मांडलेले आहेत. तेव्हा, आजच्या लेखात सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने अभ्यंगाचा विशेष विचार आजच्या लेखातून करुयात.

कोरडी त्वचा, शुष्क त्वचा, खरखरीत त्वचा हे सगळे वाताच्या विकृतीमुळे होते. वाताला शमविण्यासाठी तेलाचा/तूपाचा व अन्य स्निग्ध पदार्थांचा आभ्यंतर अंतर्गत व बाह्य वापर उपयोगी ठरतो. पायांवर भेगा पडणे, त्वचेची सालपटं निघणे, तळहातावर फाटणे इ.ला हा अभ्यंग उपयोगाचा आहे. पोटातून दूध व तूप याचे रोज सेवन करावे. गाईचे कोमट दूध एक कप व त्यात गाईचे तूप दोन चमचे घालून सकाळ- संध्याकाळ प्यावे. अंगाला खोबरेल तेल, गाईचे तूप, लोणी, औषधसिद्ध तेल, बदामाचे तेल, कोकम तेल इ. चा वापर करावा. कोणत्या त्वचेवर कोणत्या त्रासासाठी व ऋतूचा विचार करून विविध औषधांनी सिद्ध तेलांचा व तुपाचा वापर करावा, यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन नक्की घ्यावे. खोबरेल तेल इतर तेलांच्या तुलनेत प्रत्येक त्वचेला सात्म्य होते व म्हणून ते वापरल्यास हरकत नाही. पण, उत्तम गुण हवा असल्यास ‘त्या’ विशिष्ट औषधी तेलाचा/तुपाचा वापर होणे गरजेचे आहे.

अभ्यंगाने त्वचेखालील रक्ताचे अभिसरण चांगले होते. रक्ताभिसरण सुधारते, त्वचेतील टाकाऊ घटकांचे निस्सरण उत्तमरित्या घडते. सांध्यांमध्ये वंगणाचे कामदेखील नित्य अभ्यंगाने होते. मांसपेशींची ताकद वाढविणे, त्यांना बळकट करणे, मजबूत करणे अभ्यंगामुळे होते. रोज अभ्यंग केल्याने त्वचा मऊ, मुलायम होते. त्वचेचा पोत सुधारतो. असमान त्वचा टोन कमी होऊन एकसंगता येते. (त्वचा टोनदेखील) औषधीसिद्ध तेलाने अभंग केलेल्या त्वचेचा वर्ण, कांती, पोत, लवचिकता तर सुधारतेच, पण त्याचबरोबर वार्धक्याची लक्षणे (Ogo crows feet, Laugh lines-fine lines d wrinkles), सुरकुत्या कोरडी त्वचा थुलथुलीत (वृद्धत्व प्रक्रिया) ही लक्षणे आटोक्यात आणण्यास मदत होते. पुन्हा प्रक्रियेचा वेग कमी करता येतो. त्वचेला स्थिरता (फिटनेस) मिळतो. पण, यासाठी सातत्याची गरज आहे. एक-दोन दिवस आठवडे करून भागत नाही. अभ्यंगाचे फायदे मिळण्यासाठी त्याचा प्रयोग नित्य सातत्याने करणे गरजेचे आहे.

संपूर्ण त्वचेला अभ्यंग करणे उत्तमच, पण त्याचबरोबर पादाभ्यंग (तळव्यांना तेल लावणे) कर्णपूरण (कानात थेंब घालणे) नस्य (नासारंध्रात तेल सोडणे) नाभिपूरण (बेंबीत थेंब घालणे) इ.चा ही समावेश दिनचर्येत करावा. आयुर्वेदानुसार जी ज्ञानेंद्रिये बाह्य त्वचेवर उघडतात (नाक-कान इ.) त्यांचाही सतत संपर्क बाह्य वातावरणाशी, वार्‍याशी होत असतो. तसेच ज्ञानेंद्रियांशी कार्यक्षमता टिकविणे व सुधरविण्यासाठीदेखील नस्य कर्णपूरण करावे. जसे संपूर्ण शरीराला तेलाने हलका मसाज करावा, तसाच तो शिरप्रदेशीदेखील करावा. स्नानापूर्वी केस धुवून घेण्यापूर्वी व केशधावुनानंतर (केस धुणे) ही शिरप्रदेशी तेल लावावे. याने केसांचे गळणे, पिकणे, तुटणे, कोरडे होणे, निस्तेज होणे इ. तक्रारी कमी होतात याला ‘शिरोअभ्यंग’ म्हणतात.

शिरोअभ्यंगाप्रमाणेच शिरोपिचूचा ही उत्तम परिणाम होतो. डोक्यावर टाळूच्या ठिकाणी तेलात बुडविलेला कापसाचा बोळा ठेवावा, याने डोक्यातील उष्णता व त्यामुळे होणारे विविध त्रास कमी होण्यास मदत होते. झोपेची तक्रार असलेल्यांनी रात्रीच्या वेळेस पादाभ्यंग शिरोपिचू व कानाच्या पाळीला तेल लावावे. तसेच,नाभिपूरण करावे. चांगली, शांत झोप लागण्यास मदत होते. अकाली केस गळणे, पिकणे यासाठी शिरोअभ्यांगाबरोबर नस्याचा उत्तम फायदा होतो. अभ्यंग करताना खूप घासणे, रगडणे अपेक्षित नाही. थोडे तेल कोमट करून शरीरावर पसरवावे व हलके जिरवावे. जे रोज, नित्य नियमाने अभ्यंग करतात, त्यांना तेलाची/तुपाची इ.ची थोडीच मात्रा/प्रमाण पुरेसे होते. ज्यांची कोरडी-शुष्क व दुर्लक्षित त्वचा आहे, त्यांची त्वचा स्पंजप्रमाणे तेल शोषून घेते, असा अनुभव आहे. असे असताना केवळ बाह्याभ्यंतर प्रयोग पुरेसा होत नाही.

अशा वेळेस, पंचकर्मातील बस्ती, विशेषतः मात्रा बस्ती हा प्रकार उत्तम लागू होतो. पण, औषध योजना स्वतःहून ठरवून करू नये, याची मात्र नक्की काळजी घ्यावी. अभ्यंगाचा सौंदर्यदृष्ट्या अजून एक फायदा म्हणजे जळश्र लरीशव लेीाशींळली काढण्यासाठी. हे स्थानिक अभ्यंगानेे शक्य आहे. चेहर्‍यावर मेकअप केल्यानंतर, तो काढण्यासाठी विविध रासायनिक घटकांचा उपयोग होतो - Ogo cleansing milk, alchohol based make up removers इ. याऐवजी कापसावर खोबरेल तेल घेऊन जर मेकअप काढला, तर तो अलगद निघतो. चेहरा घासावा लागत नाही व त्यामुळे त्वचा लालबुंद, जळजळ इ. काही होत नाही.त्वचा खरखरीत न होता मऊ-मुलायम होते. याच पद्धतीने सन ब्लॉक्स व सनस्क्रिन पण काढावे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. त्वचेवरील सर्व रासायनिक खिचडी निघून जाते व त्वचा टवटवीत दिसते. (क्रमश:)


(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
vaidyakirti.deo@gmail.com
Powered By Sangraha 9.0