नवी दिल्ली : उत्तर कोरियामध्ये ख्रिश्चनांचा छळ होत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अहवालातून समोर आले आहे. उत्तर कोरियात एका २ वर्षाच्या मुलाला त्यांच्या घरात बायबल सापडल्यांने जन्मठेपेची शिक्षा सूनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 'इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम रिपोर्ट'मध्ये ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांना इथे मृत्यूला समोरे जावे लागते.
यासोबतच ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांना विशेष प्रकारचे ‘Pigeon Torture’ करण्यात येते. त्याखाली त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधून त्यांना अनेक दिवस उभे ठेवले जाते. एका पीडितेने सांगितले की, हे सगळे इतके वेदनादायक होते की अशी शिक्षा मिळणाऱ्यांना मृत्यूला कवटाळणे भाग पडते. २०२० मध्ये, एका महिलेला तुरुंगात झोपू दिले जात नव्हते. अखेर त्या महिलेने आत्महत्या केली.
उत्तर कोरियामध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या ४ लाख आहे, त्यापैकी ७० हजार लोकांना आतापर्यंत तुरुंगात टाकण्यात आले आहे. ख्रिश्चनांना त्यांचा धर्म त्यांच्या मुलांपासूनही लपवावा लागतो. 'ओपन डोअर यूएसए (ODUSA)' नावाच्या एनजीओने म्हटले आहे की ,देशात ख्रिश्चन सुरक्षित नाहीत. 'कोरिया फ्युचर' या संस्थेने सांगितले की, मुलांना शाळांमध्ये बलात्कार, रक्त पिणे, मानवी अवयवांची तस्करी, खून आणि हेरगिरी यांसारख्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कृत्यांबद्दल शिकवले जाते.
चर्चच्या एका भागात नेऊन धर्मगुरू मुलांचे रक्त कसे घेतात, हे मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. किम जोंग उन यांच्या सत्तेसाठी ख्रिश्चनांची संख्या धोकादायक मानली जाते. चर्चजवळून जाणाऱ्यांना किंवा चर्चमधील संगीत ऐकणाऱ्यांना ही अटक केली जाते. या सर्वावर ख्रिश्चन संघटनांचे म्हणणे आहे की उत्तर कोरियामध्ये या धर्माच्या लोकांना धोका आहे आणि त्यांचा अंत होऊ शकतो.