'स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स’ पुरस्कार सोहळा

28 May 2023 20:49:47



Award winners


मुंबई (प्रतिनिधी): दै. ’मुंबई तरुण भारत’ आणि ’महाएमटीबी’तर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला ‘स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - 2023’चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात राज्यामध्ये तळागाळात वन्यजीव संवर्धनाचे काम करणार्‍या संवर्धकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच ‘स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स’ची विभागणी नऊ श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. या नऊ श्रेणींमध्ये एकूण 13 पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये ‘बडिंग नॅचरलिस्ट अवॉर्ड’ आणि ‘कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटर अवॉर्ड’ या दोन महत्वाच्या श्रेण्या आहेत. 


‘बडिंग नॅचरलिस्ट अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी प्रवीण सातोसकर आणि चिन्मय सावंत या दोघांची निवड करण्यात आली आहे. तर ‘कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटर अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी हेमंत ओगले आणि संदीप नगरे या दोघांची निवड करण्यात आली आहे.
रविवार, दि. 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजता भायखळा (पू.) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ आहेत. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व ‘मिशन लाईफ’ हे सह-प्रायोजक आहेत, तर ‘झी24 तास’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘रेडिओ सिटी 91.1 एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत. तर, ‘पॉलिसी एडव्होकसी रिसर्च सेंटर’(झ-ठउ) हे रिसर्च पार्टनर आहेत. ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’, ‘अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम’, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘कांदळवन प्रतिष्ठान’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’, ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’, ‘वाईल्डलाईफ इमेजेस अँन्ड रिफ्लेकश्न्स’, ‘इंडियन युथ बायोडायव्हर्सिटी नेटवर्क’ आणि ‘नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ या सहयोगी संस्थांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


Pravin Satoskar


प्रवीण सातोसकर (बांधा - सिंधुदुर्ग )

लहानपणापासुन पक्षी निरीक्षणाची आवड जोपासणारे प्रवीण मुळचे सिंधुदुर्ग येथील बांद्याचे. जीवशास्त्राच्या अनुषंगाने कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना पक्ष्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. अनेक दुर्मीळ पक्ष्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांच्या नोंदी घेत गेल्या दोन वर्षांपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात ’नेच्युरिलिस्ट’ म्हणून पुर्णवेळ कार्यरत आहेत. घुबडांच्या वेगवेगळ्या प्रजाती सहजपणे दाखवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ग्रामीण भागात राहून वन्यजीव क्षेत्रात करिअरची वाट शोधणारे प्रवीण हे कोकणातील तरुणांसाठी आदर्श उदाहरण आहेत.


Chinmay sawant


चिन्मय सावंत (किरकसाल - सातारा)

मूळचे मुंबईतील रहिवासी असूनही लहानपणीच पक्षीनिरिक्षणाचे बीज रोवले गेलेल्या चिन्मय यांना निसर्गाविषयी तेव्हाच ओढ निर्माण झाली. त्यांनी सातारा जिल्ह्यातील किरकसाल गावात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपक्रम सुरू केले आहेत. किरकसाल या छोट्याशा गावात निसर्गाविषयी जनजागृती करणार्‍या चिन्मयने पक्ष्यांच्या 193 प्रजाती, फुलपाखरांच्या 63 प्रजाती, प्राण्यांच्या 16, उभयचर-सरीसृपांच्या 30 आणि झाडांच्या 200 हून अधिक प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. सध्या ते किरकसाल येथे लांडग्यावर संशोधनाचे काम करत असून या परिसराला संवर्धन राखीव घोषित करण्यात प्रयत्न करत आहेत.


Hemant Ogale

हेमंत ओगले ( आंबोली - सिंधुदुर्ग )

पर्यटन व्यवसायाच्या उद्देशाने इंजिनिअरिंगची स्थिर नोकरी सोडुन हेमंत ओगले यांनी आंबोली हे आपले मुळ गाव गाठले. निसर्गवाचनातुन गोडी निर्माण झालेल्या हेमंत यांना उभयसृप, फुलपाखरे आणि चतुरांच्या दुनियेने आंबोलीच्या रानवाटांचे वेड लावले. तब्बल बारा वर्ष फुलपाखरांचे निरिक्षण करणार्‍या ओगले यांनी ’बटरफ्लाईज् ऑफ वेस्टर्न घाट’ हे पुस्तक ही लिहिले आहे. शिवाय त्यांनी आंबोलीतून सापाची आणि चतुराची प्रत्येक एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. तर आंबोलीतच सापडणार्‍या कोळ्याच्या एका नव्या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आंबोली आणि आसपासच्या परिसरातील चतुरांची नोंद करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ’आंबोली संवर्धन राखीव’ आणि ’शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ’ घोषित करण्यामध्ये ओगले यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.


Sandip Nagare

संदीप नगरे (भिगवण - पुणे)

निळकंठ पक्षी पाहुन लहान वयातच पक्षी निरिक्षणाचे वेड लागलेले संदीप 2006 पासुन खर्‍या अर्थाने पक्षी निरिक्षण करु लागले. उज्जनीच्या पाणलोट क्षेत्राच्या किनार्‍याजवळ असलेल्या आपल्या गावाचा पुरेपुरे फायदा घेत त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वर्तणूक आणि एकूणच अधिवास यांचे निरिक्षण करुन त्यांच्या नोंदी केल्या. शिक्षणानंतर गावात परतलेल्या संदीप यांना गावच्या जैवविविधेतेवर स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल हे लक्षात येताच ’अग्निपंख बर्ड वॉचर ग्रुप’ तयार केला. गावातील तरुणांना पक्षी निरिक्षणाचे गाईड म्हणून प्रशिक्षित केले. गेली 10 वर्षे गावातील तरुणांना सोबत घेऊन, त्यांना रोजगाराचे साधन देऊन ते निसर्गरक्षणाचे आणि संवर्धनाचे काम ते सातत्याने करत आहेत.



Powered By Sangraha 9.0