सीरियाची घरवापसी...

28 May 2023 20:58:46
Saudi Arabia ३०th Arab League page

अरब देशांचा लाडका मानला जाणारा देश सीरिया आता पुन्हा अरब लीगमध्ये सामील झाला आहे. २०११ साली लोकशाही समर्थकांवर दडपशाही केल्याने सीरियाला अरब लीगमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. परंतु, एक दशकानंतर सीरियाची पुन्हा घरवापसी झाली आहे. शुक्रवार, दि. १९ मे रोजी सौदी अरेबियात अरब लीगची ३२वी बैठक पार पडली. त्यात सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी बैठकीत सहभाग घेत पश्चिमी राष्ट्रांवर प्रहार केले. अरब जगतातील या बदलांचे भविष्यात मात्र, अनेक दूरगामी परिणाम होतील. मध्य पूर्वेतील राजकारण वेगाने बदलत असताना अरब लीगचे सदस्य देश त्यातही प्रामुख्याने सौदी अरेबियाची नरमाईची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. या बदलाचे नेमके काय परिणाम होतील, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी सर्वप्रथम अरब लीग समजून घेणे आवश्यक आहे.

अरब लीग ज्याला ‘लीग ऑफ अरब स्टेट्स’ म्हणूनही ओळखले जाते. मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील सर्व अरब देशांची ही एक आंतरसरकारी समग्र अरब संघटना आहे. १९४४ साली अलेक्झेंड्रिया प्रोटोकॉल स्विकारल्यानंतर दि. २२ मार्च, १९४५ साली मिस्त्रची राजधानी काहिरा येथे ही संघटना गठीत झाली. सुरुवातीला अरब लीगमध्ये मिस्त्र, सौदी अरेबिया, इराक, जॉर्डन, लेबनान आणि सीरिया हे देश सहभागी झाले. आता ही संख्या २२ वर पोहोचली आहे. मिस्रमधील काहिरात संघटनेचे मुख्यालय आहे. सदस्य देशांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य करून बळकट करणे आणि वाद उद्भवल्यास त्यात मध्यस्थाची भूमिका निभावणे हा या संघटनेचा उद्देश आहे. २०१०च्या अखेरीस अनेक अरब देशांमध्ये लोकांनी उठाव केला. ट्युनीशियातून भडकलेली आग सर्वच अरब देशांत पसरली.

अनेक देशांतील राजेशाही सत्तेला लोकशाही समर्थकांकडून आव्हान देण्यात आले. काही देशांत अनेक वर्ष हिंसक घटना घडत राहिल्या. त्यात सीरियाचाही समावेश होता. मार्च, २०११ सीरियाचे दक्षिणी शहर डेरामध्ये लोकशाही समर्थकांनी आंदोलन केले. त्यावर लोकशाही समर्थकांचा आवाज दाबण्यासाठी सीरिया सरकारने दडपशाही सुरू केल्यानंतर हिंसा भडकली, ज्याचे लोण नंतर संपूर्ण सीरियात पसरले. आंदोलने वाढत गेली तशी दडपशाही वाढली. सीरिया सरकारवर शांती कराराचे पालन न करण्याचा ठपका ठेवण्यात आला. शांतीवार्ता आणि युद्धविराम कराराच्या प्रयत्नानंतरही हिंसा थांबली नाही. परिणामी, यात हजारो लोकांचा जीव गेला.त्यामुळे नोव्हेंबर २०११ साली अरब लीगमधून सीरियाला निलंबित करण्यात आले. परंतु, आता १२ वर्षांनंतर अरब लीगमध्ये सीरियाची घरवापसी झाली आहे. काहिरात १३ सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अरब लीगमध्ये सीरियाच्या समावेशाच्या बाजूने मतदान केले. यात सौदीचाही समावेश होता. कतारसहीत काही देशांनी मात्र याचा विरोधही केला.

दरम्यान, सीरियाला अरब लीगमधून हटवल्यानंतर सौदीसहित अनेक देशांनी असद यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, त्यात यश आले नाही. राष्ट्रपती असद सीरियात अनेक वर्ष सत्तेत कायम राहतील, याची जाणीव १२ वर्षांनंतर अरब देशांनी झाली अन् आता त्यांनी सीरियासाठी अरब लीगमध्ये पायघड्या टाकल्या आहेत. असद यांनी आपले स्थान मजबूत केल्याने अरब देश हतबल झाले. परिणामी, पुन्हा एकदा सीरियाला अरब लीगचे दरवाडे उघडण्यात आले आहे. सध्या सीरिया इस्राईलला सर्वात मोठा शत्रू समजतो. सीरिया या क्षेत्रातील एकमेव देश आहे, जो एकटा इस्राईलसहित अमेरिकेला टक्कर देत आहे. अशात इस्राईलविरोधातील लढाईत फिलीपिन्सला सहाय्य करणे अरब देशांना आणखी सोपे होणार आहे.

मध्य पूर्वेतील अनेक देश सध्या आपसांतील कटुता बाजूला सारत जवळ येत आहे. उदाहरण बघता सीरियाचे मिस्र, सौदीसहित अन्य देशांसोबत संबंध दृढ होतायत. इराण आणि सौदीनेही मैत्रीचा मार्ग पत्करला. सीरिया रशियाचा मित्र असल्याने खाडी क्षेत्रात रशिया आणखी मजबूत होईल. परंतु, अमेरिका आणि इस्राईल कमजोर पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, इराण-सौदीला जवळ आणण्यात चीनचा मोठा हातभार होता. एकूणच काय तर सीरियाची अरब लीगमध्ये घरवापसी होण्यामुळे अमेरिकाविरोधी मोर्चा आता आणखी मजबूत होईल. सीरिया अरब लीगमध्ये सामील झाल्याने अरब जगतात. मात्र, येत्या काळात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


Powered By Sangraha 9.0