वीरभूमी परिक्रमेतून सावरकर गौरव....

27 May 2023 17:45:59
Veerbhumi Parikrama Savarkar Gaurav Maharashtra Tourism

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील दै. ‘मुंबई तरुण भारत’चा ‘कालजयी सावरकर‘ हा विशेषांक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. यावर्षी सावरकर जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि ‘विवेक व्यासपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’वीरभूमी परिक्रमा’ हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्याप्रमाणे आपण नर्मदा परिक्रमा करतो, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने किंवा चळवळीने पावन झालेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांतील सावरकर संबंधित स्थानांची परिक्रमा म्हणजे ‘वीरभूमी परिक्रमा.’ या सावरकर संबंधित स्थानांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून लवकरच त्याची रुपरेषा घोषित केली जाईल.

यामध्ये सध्या प्रारंभी भगूरमधील सावरकरांचे जन्मस्थान-सावरकर वाडा, नाशिकमधील अभिनव भारत मंदिर, रत्नागिरीतील पतितपावन मंदिर, पुण्यातील विदेशी कापडांची होळी केली ते स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, मुंबईतील सावरकर सदन आणि सांगलीमधील बाबाराव सावरकर स्मारक यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन महामंडळ, महाराष्ट्र आणि ‘विवेक व्यासपीठ’ यांनी स्वा. सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या विचारांचे जागरण व्हावे, या उद्दिष्टाने भगूर, नाशिक, रत्नागिरी, पुणे, मुंबई आणि सांगलीमध्ये ‘स्वा. सावरकर गौरव सप्ताह‘ साजरा करण्याचे योजिले आहे. यामध्ये सावरकर संबंधित गायन, नृत्याचे विविध कार्यक्रम, नाटक, परिसंवाद, व्याखानं यांचे आयोजन केले आहे.

दै. ‘मुंबई तरुण भारत’देखील या उपक्रमामध्ये सहभागी आहे. म्हणून यावेळी सावरकरांचे भगूर, नाशिक, रत्नागिरी, पुणे, मुंबई आणि सांगलीमधील कार्य असा विशेषांकाचा विषय घेतला आहे, जेणेकरून या विविध सावरकर संबंधित स्थळांना भेट देताना वाचकांना त्या त्या शहरातील सावरकरांचे कार्य ज्ञात असेल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन लेखकांना सावरकर विषयावर लिहिण्यासाठी ‘कालजयी सावरकर‘च्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी अशी ही सावरकर विशेषांकाची कल्पना मांडल्यापासून, गेली सलग सहा वर्षे मला ‘अतिथी संपादक‘ म्हणून संधी दिली. त्यासाठी किरण शेलार यांचे खूप खूप आभार. तसेच मुख्य उपसंपादक (फीचर्स) विजय कुलकर्णी यांचे विशेषांक सिद्ध करण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य नेहमीच लाभत असते, त्यासाठी त्यांचेही खूप खूप धन्यवाद!

अक्षय जोग
(अतिथी संपादक)


Powered By Sangraha 9.0