भगूर हे नाशिकपासून २०-२२ किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंस खेडेगाव. भारतातील इतर कोणत्याही खेडेगावासारखंच. दारणा नदीच्या कुशीत विसावलेलं, चहूबाजूंनी हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेलं, निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं, शेतीवाडीने संपन्न, सुखी, समाधानी गाव! या गावातील माणसंदेखील दारणेच्या पाण्यासारखीच; गोड आणि निर्मळ. इतर कोणत्याही गावातील माणसांप्रमाणेच. पण, तरीही हे गाव फार फार विशेष. नियतीने या गावाला विशेष कामासाठी निवडलेलं...
संथ, शांत गतीने चालणार्या, सुस्तावलेल्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला ’क्रांतीचं’ अक्राळविक्राळ वळण देणारा, प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची अमीट ज्योत पेटवणारा तेजस्वी सूर्य...अंध रुढी, परंपरांमध्ये गुरफटून गेलेल्या समाजाच्या डोळ्यात, विज्ञानाचं झणझणीत अंजन घालणारा विज्ञानयोगी...एक ध्येय - ’राष्ट्र हित’, एक निष्ठा -’अखंड भारत’, या सूत्राच्या योगे भारतीय समाजाला एकसंध करू पाहणारा महानायक...प्रियेच्या गालावरील कुसुमांत आणि सुकुमार कुसुमांच्या गालावरही स्वातंत्र्यदेवतेला पाहणारा हळवा, सहृदय कवी याच गावात जन्म घेणार होता. त्याच्या लालन-पालनाची, पोषणाची जबाबदारी या गावाची होती. याच गावाला त्याला उद्याच्या आव्हानांसाठी तयार करायचं होतं आणि या गावाने ते अचूक केलं.
जसं कृष्णाचं गोकुळ तसं सावरकरांचं भगूर. १४व्या वर्षी कृष्णाचं गोकुळ सुटलं, सुटलं ते कायमचं! परंतु, १४ वर्षांचा हा काळ कृष्णाच्या जीवनातील सर्वात रम्य काळ. या १४ वर्षांत गोकुळातील सर्वांनीच, प्रेमळ माता-पित्याने, गोपगोपिकांनी, सवंगड्यांनी, कृष्णमय झालेल्या राधेने, यमुनेच्या डोहाने, झाडाझुडपांनी, फुला-पानांनी कृष्णाला भरभरून दिलं. कृष्णाकडे मागितलं मात्र काही नाही. परंतु, पुढचं संपूर्ण आयुष्य कृष्णाला कधीच स्वतःसाठी जगता आलं नाही. सावरकरांचंही तसंच. १३-१४व्या वर्षी भगूर सुटलं ते कायमचंच आणि त्या भगूरबरोबर निरागस माया-ममताही संपली. अंतरली. दोन करांनी घेत राहाणं संपलं आणि दोन करांनी देत राहणं तेवढं उरलं.
सावरकरांनी जेवढं भगूर गावाला दिलं, त्यापेक्षा कित्येक पटीने या भगूर गावाने सावरकरांना दिलं. सावरकरांचा जन्म का सोपा? सावरकरांचा जन्म म्हणजे वंचना, उपेक्षा, ताटातूट, आरोप-आपल्याच सग्या सोयरांचे! जन्मभरच काय, पण मरणानंतरही सावरकर हेच भोगत आहेत. पण, जन्मभराची आणि मरणोत्तरीचीसुद्धा उपेक्षा सहज करता येईल, इतकी माया, प्रेम, आपलेपणा या भगूर गावाने सावरकरांना दिला. नऊ वर्षांचा का होईना, पण आईचा सहवास दिला. आई ती कशी? वात्सल्याने ओतप्रोत भरलेली. आईच्या मागून तिची उणीवही भासू नये, असा ’वात्सल्यमूर्ती’ बाप दिला. तो काळ जेव्हा विधुरांचा पुनर्विवाह हा समाजमान्य नियमच होता, त्या काळातही ४०व्या वर्षी आलेले विधुरत्व सहज पेलून, आपल्या चिल्या-पिल्यांना, स्वतः शिजवून मायेचा घास भरवणारा मायाळू बाप. त्याची माया अशी की, त्याला मुलांनी ’अहो-जाहो’ केलेलेही आवडू नये. असा तो, मुलांत मूल होणारा, मुलांचा एकेरी ’अण्णा’ दिला. शेवटपर्यंत ज्यांनी सावलीसारखी सोबत केली, त्या भावांचा सहवास दिला. स्वतःच्या भावाशी उभा जन्म भाऊबंदकी करत झगडणारा, पण पुतण्यावर मात्र निरतीशय माया करणारा, त्याच्या बुद्धीचं, कवित्वाचं, सहृदयतेचं कौतुक करणारा चुलता दिला.
भगूरच्या या वाड्याने हृदयंगम असं एक ’मैत्र’ फुलताना आणि चिरंतन वाढताना पाहिलं. ते म्हणजे, सावरकरांचं आणि त्यांच्या थोरल्या वहिनी येसू वहिनी यांचं. अनेक स्त्री मुक्ती संघटना आणि असंख्य स्त्री-पुरुष समानतेसाठीच्या चळवळी नंतरसुद्धा, जे आजच्या काळातही सामान्य मध्यमवर्गीय स्त्रीला दुरापास्त आहे, असं एक मनोहर नातं, येसू वहिनींना १०० वर्षांपूर्वी या भगूरच्या वाड्यात सावरकरांच्या रूपात गवसलं होतं. १२-१३ वर्षांच्या छोट्या वहिनीचे डोळे आले आहेत, ते चिकटतात म्हणून काळजीने चूर होऊन, गरम पाण्याने ते डोळे पुसून काढणं काय किंवा प्रवासात पहाटेचं सुंदर ’पहाट चित्र’ दुखर्या डोळ्यांमुळे वहिनी पाहू शकत नाही म्हणून व्यथित होणं काय, स्वतःच्या धाकट्या दिराशी असं मैत्र, आजच्या ’सुधारित’ म्हटल्या जाणार्या काळात तरी शक्य आहे का? लहानशा नवविवाहित वहिनीला स्वयंपाक येत नाही, असे कळल्यावर स्वतः तिच्याबरोबर स्वयंपाक करणारे लहानगे सावरकर. तिला लिहिता-वाचता येत नाही, हे कळल्यावर व्यथित होऊन तिला लिहू-वाचू शिकविणारे सावरकर. स्वतःतला ’पुरुष’ विसरून तिच्याबरोबर झोपाळ्यावर ओव्यांच्या भेंड्या खेळणारे सावरकर. तिच्या मंगळागौरीला तिच्या बरोबरीने रांगोळ्या काढणारे सावरकर, या वाड्याने पाहिले आणि हे सारे कोणत्याही स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीने प्रभावित होऊन नव्हे, तर केवळ परस्परांप्रति असणार्या अंतःस्फूर्त ममत्वामुळे आणि आदरामुळे!
या भगूरच्या वाड्याने ती अष्टभुजा भवानी पाहिली, जिच्या भक्ती भावात छोटे सावरकर बुडून जात. ही सावरकरांच्या आजीच्या माहेरची देवी. आजीच तिला भगूरला घेऊन आली. तेव्हापासून ती सावरकर घराण्याची कुलदेवी झाली. दिव्यांनी उजळून निघालेल्या त्या देवघरात, त्या भवानीची स्तुतीपर स्तोत्रे म्हणताना, तिच्याकडे एकटक पाहत बसताना, सावरकर जवळपास समाधीस्थ होत. समाधी म्हणजे तरी काय? मनाची तद्रुपता, एकाग्रता, वय वाढले, विज्ञाननिष्ठा आणि देशनिष्ठा अंगी बाणवली. तेव्हा, हीच मनाची तद्रुपता भारतमातेशी जोडली गेली. पण, त्या एकाग्रतेची बीजे मात्र याच भगूरच्या वाड्याच्या देवघरात रोवली गेली होती.उद्याचे कवी सावरकरसुद्धा याच वाड्यात घडत होते. रोज रात्री झोपताना, वडिलांनी सावरकर व त्यांच्या बंधूंकडून ’हरिविजय’, ’पांडवप्रताप’ वगैरे ओवीबद्ध ग्रंथ वाचून घ्यावेत, त्यांचे अर्थ सांगावेत. यातूनच आपणही असंच एक महाकाव्य रचावं, असं सावरकरांच्या बालमनाने घेतलं आणि नियतीने ते कुठे पूर्ण करून घेतलं तर अंदमानच्या काळकोठडीत! हात-पाय साखळदंडांनी बांधलेले असताना, त्या काळकोठडीच्या भिंतीवर जेव्हा ’कमला’ उमटत होतं. तेव्हा, भगूरचा वाडा एक ’बालस्वप्न’ पूर्ततेस गेल्याचं समाधान अनुभवत होता.
सावरकरांच्या समाजकार्याचा बालेकिल्ला रत्नागिरी असेलही. पण, जातीपातीच्या या विशाल डोंगराला सुरुंग लावण्याच्या कामाची खरी सुरुवात या भगूरच्या वाड्याच्या पोटातच झाली. जात्युच्छेदनासाठी सावरकर पुढे असं काही भरीव कार्य करतील हे, हा वाडा त्यांच्या लहानपणीच छातीठोकपणे सांगू शकला असता. स्वतःच्या आमराईत कष्ट करणार्या कष्टकरी जीवांना, जेव्हा पाच-सहा वर्षांच्या छोट्या सावरकरांनी, आदराने, आग्रहाने वाड्याच्या ओसरीवर बसवून पाणी पाजलं, तेव्हा, कृतार्थतेचं पाणी या वाड्याच्या डोळ्यात साठलं होतं. परशुराम शिंपी आणि राजाराम शिंपी या मित्रांच्या घरच्या तांदळाच्या भाकरीची अन् झणझणीत लसणीच्या चटणीची चव सावरकरांबरोबरच या वाड्यानेही चाखली होती अन् तृप्त होऊन वाड्याने जे आशीर्वाद दिले, त्या आशीर्वादांच्या बळावरच पुढचं सावरकरांचं विशाल समाजकार्य उभं राहिलं!त्या लहानशा खेडेगावात वाढणार्या सावरकरांनाच नव्हे, तर त्यांच्या वयाच्या आसपासच्या मुलांनाही समाजभान जात्याच होतं. त्यात सावरकरांसारखा द्रष्टा त्यांचा पुढारी! मग विविध वृत्तपत्रांचे वाचन, त्यावर चर्चांचे फड आणि त्यातून तयार होणारी राजकीय भूमिका. इंग्रजांचे समूळ उच्चाटन. बिनशर्त, संपूर्ण स्वातंत्र्य हा विचार सावरकरांनी पहिल्यांदा या भगूरच्या मातीतच मांडला. त्या मातीला त्यांचा अभिमानही वाटला आणि काळजीही. सावरकरांच्या बालवयात त्यांनी मिळवलेले हे मित्र हेच त्यांचे पहिले कार्यकर्ते. ते आजन्म सावरकरांशी एकनिष्ठ राहिले. सावरकरांच्या अटकेनंतर अनेकांनी त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध नाकारले. सरकारचा रोष कोण पत्करेल? परंतु, अशा कठीण काळातही भगूरच्या मातीने घडविलेले हे कार्यकर्ते मात्र सावरकरांना अंतरले नाहीत.
क्रांतीच्या विचारांची ज्योत पेटली ती इथेच. निमित्त झाले चापेकरांच्या फाशीचे. सावरकरांच्या देवघरातील ती अष्टभुजा भवानी एका ऐतिहासिक शपथेस साक्षी झाली. या शपथेने खर्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. सावरकरांच्या देवघरात पेटलेल्या या नि:स्वार्थी देशभक्तीरूपी ज्योतीने पुढे कित्येकांच्या मनात वणवा पेटविला.या भगूरच्या वाड्याने एकदा सावरकरांच्या वडिलांना, ‘आरण्यक’ वाचल्याबद्दल सावरकरांना रागे भरताना ऐकलं होतं - “भरल्या घरात ‘आरण्यक’ वाचू नये. घराचे अरण्य होते.’‘ त्यांनी बजावलेलं, वाड्याने ऐकलं होतं. पण, सावरकरांनी ऐकलं नाही. सावरकर झाले असतील विज्ञाननिष्ठ वगैरे, त्यांना नाहीच पटणार. पण, भगूरच्या त्या मायाळू, श्रद्धाळू वाड्याला आजही वाटतं, नसतं वाचलं ‘आरण्यक‘ तर फार फार बरं झालं असतं. ‘प्लेग’ची साथ आली, अण्णांना म्हणजे सावरकरांच्या वडिलांना आणि मग प्रेमळ चुलत्यांना घेऊन गेली. सावरकर बंधू अनाथ झाले. सावरकर कुटुंबीय नाशिकला निघून गेले ते कायमचेच. भरल्या वाड्याचे अरण्य झाले.ते भगूर गाव, तो वाडा आजही सावरकरांच्या जीवनातील सर्वांत रम्यकाळ पोटात घेऊन उभा आहे. त्यांची गाथा सांगत!