‘अभिनव भारत’ सांगता समारंभ आणि सावरकरांचे उद्बोधन

27 May 2023 16:22:47
Abhinav Bharat Association V D Savarkar

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी १८९८ साली ‘अभिनव भारत’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा या संघटनेचा मुख्य हेतू होता. दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, याचाच अर्थ ‘अभिनव भारत’च्या स्थापनेमागचा हेतू सफल झाला. म्हणूनच दि. १० मे, १९५२ या दिवशी ‘अभिनव भारत’ सांगता समारंभ पुण्यात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ संपन्न झाला. सांगता समारंभस्थळी तोपर्यंतच्या क्रांतिकारकांच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्तंभ उभारून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सावरकरांनी आपल्या मनातील विचार तसेच अनेक आठवणी जागवल्या. त्याचा या लेखातून घेतलेला हा आढावा...

क्रांतिकारक कोण होते व ते कसे दिसत, हे तत्कालीन तरुणांना माहीत व्हावे, या हेतूने स्वातंत्र्यलढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या बहुतेक सर्व देशभक्तांची छायाचित्रे पुण्यातील ‘अभिनव भारत’ सांगता समारंभातील प्रदर्शनात लावण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढताना आपण आपली मातृभूमी स्वतंत्र झालेली ‘याची देही याची डोळा’ पाहू शकू, अशी लालसा यात असलेल्या कोणाही स्वातंत्र्यसैनिकाने कधीही धरली नाही, असेही सावरकरांनी यावेळी बोलताना नमूद केले.

क्रांतिकारकांचे मनोगत

भारतमातेच्या वीर पुत्रांची आणि त्यांच्या कार्याची एक ओझरती आठवणच सावरकरांनी उपस्थितांना यावेळी करून दिली. अगदी खुदीरामपासून भगतसिंगपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते उधमसिंगपर्यंत सशस्त्र क्रांतीचा इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. दि. १२ मे, १९५२ या दिवशी महोत्सवाच्या समारोपाचे भाषण करताना सावरकरांनी उपस्थित तरुणांना आणि पुणेकरांना प्रेरणादायी वाटेल, असे भाषण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास उलगडताना सावरकरांना वर्तमानाचे किती भान होते, हे त्यांच्या भाषणातून जाणवते. समारोपाच्या भाषणात सावरकरांनी उपस्थितांना निक्षून सांगितले की, “आपलेच शासन आले असले तरी लगेचच गोष्टी सुकर होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. परकीयांना फेकून देऊन देश स्वतंत्र होतो याचा अर्थ असा की, भारताच्या परकीय शत्रूंनी देशाची जी दुर्दशा केली आहे, ती स्वातंत्र्यसंपादनाच्या पहिल्या दिवशी त्या देशात बहुतांशी तशीच असते. स्वकीय शासनसंस्था, मग ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली, तरी सर्व प्रकारची दुर्दशा एका दिवसात कोणत्याही जादूच्या कांडीने नाहीशी करणे केवळ अशक्य आहे,“ असे ते म्हणाले.

सैनिकीकरण महत्त्वाचे

आपल्या भाषणात सावरकरांनी सैनिकीकरणाचा अर्थ समजावताना उपस्थितांना आपल्या ग्रंथाचा दाखला दिला. त्यांच्या ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाला पंजाब, बंगाल तसेच भारतातल्या इतर भागांतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पुस्तकाचा भारतातील अनेक क्रांतिकारकांनी पंजाबी, हिंदी, उर्दू भाषेत अनुवाद करून इथल्या क्रांतिकारक पक्षाला वैचारिक आत्मबल देण्याचे काम केले होते.  ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यात हा सारा गुप्त प्रसार करताना ब्रिटिशांच्या सैन्यात सामील होऊ नका, असे आपण कधीही सांगितले नाही याचा पुनरुच्चार स्वातंत्र्यवीरांनी या भाषणादरम्यान केला. त्यांच्या मते, ब्रिटिश सैन्यात राहूनच, हिंदी तरुणांनी शक्य तितकी अधिकाधिक भरती ब्रिटिश सैन्यात करून संधी मिळताच इंग्लंड महायुद्धात गुंतलेले असताना सैन्यात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे, असा त्यांचा मूळ हेतू होता. स्वातंत्र्यवीरांच्या मते, १८५७च्या प्रसंगी ब्रिटिशांच्या हाताखालचे हिंदी सैन्य त्यांच्यावर तेव्हाच उलटले असते, तर इतिहास वेगळा ठरला असता.

शस्त्रसज्ज व्हा!

आपल्या भाषणात सावरकरांनी वारंवार तत्कालीन तरुण पिढीला प्रथम शस्त्रसज्ज व्हावे, असे कायम सूचवले. “शत्रूचे बळी घेत घेत अर्पिलेल्या स्वप्नांच्या बलिदानाचा आदर्श दृष्टिकोन पुढे ठेवून प्रत्येक कर्तव्य क्षेत्रात तुम्ही उतराल आणि अशाच वीर वृत्तीने झुंजाल, तर तुम्ही हे स्वतंत्र राष्ट्र संरक्षित करण्याचे तुमचे कर्तव्य निश्चितपणे पार पडू शकाल,“ असे सावरकर आपल्या समोरील उपस्थित तरुणांना उद्देशून म्हणाले. अहिंसा काही प्रमाणात योग्य असली तरीही भोंगळ शांतीपीठांचा आणि टोकाच्या अहिंसा धोरणाचा सावरकरांनी कायम विरोध केला.

याच सांगता समारंभात त्यांनी भारतीयांच्या मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या स्वभावाचा आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. “जर खरेखुरे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अजयपणे जगायचे असेल, तर भोंगळ्या आणि दुबळ्या शांतीपिठांच्या मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटण्याची तुमची हाडीमाशी खेळलेली खोड सोडून देऊन, आपल्या या स्वतंत्र हिंदूराष्ट्राचे रोखठोक शस्त्रबळ इतर आजच्या कोणत्याही राष्ट्राच्या शस्त्रबळाइतके तरी सामर्थ्यवान बनवण्याचे कार्य तत्काळ हाती घ्या,“ अशा कडक शब्दांत सावरकरांनी उपस्थित तरुणांना देशासमोर भविष्यात येऊ घातलेल्या सामरिक धोक्यांची जाणीव करून दिली.

अफाट दूरदृष्टी लाभलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उपस्थित लोकांना चीनच्या आक्रमक धोरणांची जाणीव करून दिली. चीनने गिळंकृत केलेल्या तिबेटमुळे ब्रिटिश राज्यसत्तेने हिंदुस्थानच्या आसपास तयार केलेली ‘किलक राज्ये‘ अर्थात ‘बफर स्टेट्स’ नष्ट करून हिंदुस्थानवर थेट आक्रमण करण्याचा चीनचा मनसुबा असू शकतो, ही भीती चीनने भारतावर आक्रमण करण्याच्या एक दशक आधीच सावरकरांनी ओळखली होती.

पहिल्याच दिवशी काही रामराज्य स्थापन होऊ शकत नाही

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच देशात आमूलाग्र बदल घडेल व हिंदुस्थान जगात अग्रस्थान पटकावेल, अशी भोंगळ दिवा स्वप्ने बघण्याची सवय सावरकरांना नव्हती. त्यामुळेच आपल्या समारोपाच्या भाषणात सावरकरांनी स्पष्टपणे लोकांना बजावले की, “कोणताही देश पारतंत्र्याचे जोखड फेकून दिल्यानंतर, त्या देशाची जी स्वराज्य शासन संस्था कारभार पाहू लागते, मग ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरीही पारतंत्र्यात झालेली देशाची दुर्दशा एका दिवसांत जादूच्या कांडीसरशी नाहीशी करणे, हे केवळ अशक्य होय.“ त्यावेळी लोकांनी काय केले पाहिजे, हे सांगताना सावरकर म्हणाले की, “लोकांनी थोडावेळ तरी कळ सोसायची तयारी ठेवली पाहिजे. लोकांच्या सहकार्यातूनच शासनकर्त्यांना दुर्दशा निवारण्यासाठी ऊर्जा मिळेल. तत्कालीन परिस्थितीत स्वराज्याची शासन व्यवस्था काँग्रेसकडे न जाता समाजवादी, साम्यवादी किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या हाती दिली गेली असली तरी सत्ता लोभामुळे त्यांनी चुका केल्याच नसत्या, असे अजिबात मानण्याचे कारण नाही.“

विरोधी नव्हे, अल्पमतीय पक्ष

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जसे स्वातंत्र्यलढ्यात अतुल्य योगदान आहे, तसेच भाषाशुद्धीच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या सूचना व इंग्रजाळलेल्या शब्दांना सूचवलेले पर्यायी शब्द आजही प्रचलित आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या मते, ब्रिटनच्या लोकतंत्रातून भारताने घेतलेला ‘विरोधी पक्ष‘ हा विधिमंडळात वापरला जाणारा शब्द चुकीचा आहे. त्यांच्या मते, ब्रिटनमध्ये लोकशाही भारताच्या काही शतके आधीपासून रुजलेली असल्याने तेथील जनतेला व राज्यकर्त्यांना ‘विरोधी‘ अर्थात ‘अपोझिशन’ या शब्दाचा योग्य अर्थ माहीत होता. परंतु, आपल्याकडे लोकतांत्रिक परंपरा नवीन असल्याने सरकारी पक्षाला केवळ विरोधाच्या नावाखाली विरोध करण्याची वृत्ती बळावू नये, यासाठी ‘अपोझिशन’ किंवा ‘विरोधी पक्ष‘ असे म्हणण्याऐवजी ‘सत्ताधारी पक्ष‘ व ‘अल्पमतीय पक्ष‘ हे शब्द विधिमंडळात वापरले जावेत, असे त्यांनी सुचवले.

राज्यक्रांतीचे आत्मविसर्जन

जोवर राज्यक्रांती चालू होती आणि ब्रिटिश सत्तेचे राज्य भारतावर होते, तोपर्यंत सशस्त्र क्रांती आवश्यक नि प्रथम कर्तव्य आहे, असे सावरकरांनी स्वतःच्या मनाशी ठरवले. परंतु, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्व विध्वंसक क्रांती वृत्तींचे तत्काळ विसर्जन करणे, हे आपल्या यशस्वी राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य होय. याची जाण सावरकरांना पदोपदी होती. म्हणूनच ब्रिटिश राज्य उलथून पाडले गेले. देश स्वतंत्र झाला आणि घटनात्मक स्वातंत्र्य भारताला प्राप्त होऊन भारतीय राज्य शासनाची प्रतिष्ठापना झाली, त्याच दिवशी सशस्त्र क्रांती संस्थेने आपले विसर्जन केले पाहिजे. या हेतूने ‘अभिनव भारत’ या गुप्त संस्थेचा सांगता समारंभ प्रकटपणे करण्याचे त्यांनी ठरवले.

याच हेतूने सावरकारांनी ‘अभिनव भारत’ संघटनेचा विसर्जन सोहळा आयोजित करून आपले उद्दिष्ट पूर्ण केले. दि. १२ मे १९५२, अभिनव भारत सांगत समारंभाच्या दिवशी पुणे महापौरांच्या निवासस्थानी खासगी सत्कार प्रसंगी; डावीकडून बसलेले- स. गो. बर्वे (महापालिका आयुक्त, पुणे), बाबुराव सणस (महापौर, पुणे), स्वतः स्वा. सावरकर, बाबाराव खापर्डे, पाठीमागे बसलेले सावरकरांचे स्वीय सचिव शांताराम शिवराम तथा बाळाराव सावरकर.

रोहन अंबिके


Powered By Sangraha 9.0