‘युपीएससी’मध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशात फडकवणार्या ठाण्याच्या श्रीनगरमधील कश्मिरा संख्ये या डॉक्टर तरुणीची ही यशोगाथा...
ठाण्यात जन्मलेल्या डॉ. कश्मिरा संख्ये यांचे बालपण पालघर जिल्ह्यातील एकलारे गावात गेले. बालपणीपासूनच आपल्या ध्येयावर ठाम असलेल्या कश्मिराचे वडील डॉ. किशोर हे खासगी कंपनीत ‘व्हाईस प्रेसिडेंट’, तर आई डॉ. प्रतिमा या नॅचरोपथी डॉक्टर आहेत. घराजवळच त्यांचे स्वतःचे क्लिनीकही आहे. घरात कशाचीही तदात नसल्यामुळे कश्मिरासह सर्व भावंडे उच्चशिक्षित. कश्मिराचे प्राथमिक शिक्षण मुलुंडच्या सेंट मेरी कॉन्व्हेन्ट स्कूल येथे तर, माध्यमिक शिक्षण भांडुप येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये झाले.
इयत्ता आठवीत असताना ‘जीवनविद्या मिशन’च्या बालसंस्कार वर्गातून तसेच सदगुरू वामनराव पै यांच्या प्रबोधनातून तिला जीवनाचा मार्ग गवसला अन् अथक प्रयत्नांनी ‘एसएससी’ला ‘आयसीएसई’ बोर्डात तिने ९५ टक्के मार्क मिळवून घवघवीत यशाला गवसणी घातली. त्यानंतर तिचा शैक्षणिक आलेख सतत उंचावतच गेला. ‘बीडीएस’ (दंतवैद्यक) तसेच, ‘नॅचरोपथी’ची डॉक्टर बनली. मात्र, कश्मिराच्या कारकिर्दीची खरी सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली. लहानपणी आई नेहमीच वृत्तपत्रात छापून आलेले डॉ. किरण बेदी यांचे फोटो, बातम्या, लेख वाचून दाखवून प्रेरणा देत असे. त्यामुळे कश्मिरा ही भारावून जात असे.
शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत तसेच शाळेतील अन्य स्पर्धांमध्ये विविध पुरस्कार कश्मिरा यांनी पटकावले. वैद्यकीय अभासक्रम पूर्ण करून डॉक्टरी पेशा सुरू केला. मात्र, समाजाप्रती आपुलकी व देशहितार्थ झोकून देत कार्य करण्यासाठी डॉक्टरी पेशापेक्षा अधिक व्यापक समाजसेवा करण्याची उमेद बळावली. त्याच ध्येयातून कश्मिरा हिने ‘युपीएससी’ची परीक्षा देण्याचा चंग बांधला. दोन वेळा तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, पण त्यात यश आले नाही, तरीही आपला पक्का केलेला निर्धार तिने कायम ठेवत तिसर्यांदा परीक्षा दिली आणि आपले ध्येय पूर्ण केले.
लहानपणापासून घरात ‘जीवनविद्ये’चे संस्कार झाल्यामुळे तिच्यावर शिक्षणाचे महत्त्व कोरले गेले आणि तिने ‘आयएएस’ होण्याचे स्वप्न पाहिले. संस्कार केंद्रातून संतसंगातून प्रसादरुपी विश्वप्रार्थना करून विश्वकल्याणसाठी प्रत्येक नामधारकांना दिली जाते. आपली प्रत्येक कृती ही राष्ट्राच्या उन्नतीसाठी असली पाहिजे. राष्ट्राची प्रगती हेच आपले ध्येय असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका सद्गुरू आपल्या प्रवचनातून नेहमी मांडत असतात. याचा पगडा कश्मिरा हिच्या जीवनावर कोरला गेला. त्यामुळे, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार ...’हे सद्गुरू वचन तिने सत्यात उतरवत सद्गुरूंचे ‘तुम्ही टॉपला जाल’ हे भाकीत आज खरे करून दाखवले.
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या निकालात डॉ. कश्मिराने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कश्मिराला या यशाबद्दल विचारले असता ती सांगते की, “माझे कुटुंब आणि मित्रपरिवाराचे मला सहकार्य लाभल्याने हे यश शक्य झाले. कश्मिराची मोठी बहीण दंतचिकित्सक आहे. ‘युपीएससी’ परीक्षा देण्याआधी कश्मिरा तिच्या क्लिनीकमध्ये साहाय्यक डेंटिस्ट म्हणून काम करीत होती. दररोज १२ ते १४ तास अभ्यासात रमायची. त्यामुळे ‘युपीएससी’मध्ये मिळालेल्या या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय कश्मिरा आपल्या आई-बाबांना आणि ‘जीवनविद्ये’च्या बालसंस्कार केंद्राला देते. त्याचप्रमाणे तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक, परीक्षेतील ज्युरी यांच्यासह दादांनी शिकवलेली ‘सर्वांचे भले कर,’ या प्रार्थनेचा खूपच चांगला परिणाम झाला. ‘व्हिजुअलायझेशन’चादेखील फायदा झाला. लहानपणापासून या सर्वांनी उज्वल यशासाठी प्रेरणा दिली. सकाळची सुरुवात तर बाबांच्या, ’उठा, आयएएस ऑफिसर’, या वाक्याने व्हायची, अशी आठवणही कश्मिरा सांगते. ‘आयएएस’ बनल्याने तिला आता सनदी अधिकारी बनून देशसेवेसाठी पुरेपूर योगदान द्यायचे आहे.
यशाची खात्री असलेल्या, पण महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या कश्मिराला यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे ती सांगते. निकालानंतर ठाणेकरांकडून तिचे सत्कार होत असून, कौतुकाचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे आमदार संजय केळकर तसेच ठाणे मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांनीदेखील तिचे ठाणेकरांच्यावतीने कौतुक केले. यावेळी त्यांनी कश्मिराला ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय (सीडी देशमुख) प्रशिक्षण संस्थेत ‘आयएएस’चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. तुमचा आदर्श भावी ‘आयएएस’ बनू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसमोर राहील, असा मोलाचा सल्ला दिला. कश्मिरानेदेखील क्षणाचाही विलंब न करता होकार दिला असून तरुणांसमोर आपला आदर्श ठेवायला आवडेल, असेही तिने सांगितले. तिच्या या यशामुळे प्रत्येक ठाणेकराला आपल्या घरातीलच व्यक्ती ‘आयएएस’ झाल्यासारखे वाटू लागले आहे.
आजच्या युवा पिढीला संदेश देताना डॉ. कश्मिरा सांगते की, “कोणत्याही कामासाठी निर्धार हवाच. एकदा आपले ध्येय ठरले की, ते ध्येय साध्य होईपर्यंत सोशल मीडियाला रामराम ठोका. सनदी अधिकारी वा शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी बनायचे असेल, तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहात. हे लक्षात ठेवून वाटचाल करा. तुमचे विचार हेच ईश्वर मानून ध्येयाकडे कूच करा,” असेही ती आवर्जून सांगते. अशा या ठाणेकर स्कॉलरला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!