प्रदर्शनाच्या वाटेवर असणार्या ‘सोंग्या’ चित्रपटातून अभिनय व गायनासह, भारूड आणि निरूपणाचे लेखन करणार्या तसेच लोककलेसाठी झटणार्या शिवपाईक योगेश चिकटगावकर या अवलिया लोककलावंताचा जीवनप्रवास...
शिवपाईक योगेश चिकटगावकर यांचा जन्म चिकटगाव, ता. वैजापूर, छ. संभाजीनगरचा. योगेश यांचे वडील माणिकराव चिकटगावकर हे तलाठी म्हणून कार्यरत होते. योगेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला, चिकटगाव येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण नवजीवन हायस्कूल आणि न्यू हायस्कूल, वैजापूर येथे झाले. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन ते पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत विनायकराव पाटील महाविद्यालयातून योगेश यांनी पूर्ण केले.
योगेश यांच्या गावात अखंड हरिनाम सप्ताहाची ६० वर्षांची जुनी परंपरा. त्यामुळे योगेश यांच्या आजोबांचा पंचांगाचा गाढा अभ्यास पाहून लोकांनी त्यांना ’शास्त्री’ ही पदवी बहाल केली. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’, ‘नामदेव गाथा’, ‘शिवलीला अमृत’ या सर्व धार्मिक ग्रंथांचा अभ्यास लहानपणापासून योगेश यांच्या घरी होत असे. त्यावेळी योगेश यांचे आजोबा आणि वडील दोघेही हरिनाम सप्ताहात सोंगी भारूड सादर करत. त्यामुळे लहानपणापासून सोंगी भारूड बघणार्या योगेश यांना गायन, अभिनयाचं बाळकडू घरातून मिळाल्याने वयाच्या सातव्या वर्षीच योगेश यांनी सोंगी भारूड करायला सुरुवात केली.
त्यानंतर शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात भारूड, जागरण, गोंधळ, नाटक, एकांकिका अशा अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमात योगेश हे सहभागी होऊ लागले. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात अभिनयाची गोडी लागल्याने अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे, म्हणून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर घरच्यांचा विरोध पत्करत मराठवाडा विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ ड्रॅमेटिक्स’ आणि ‘मास्टर ऑफ परफॅार्मिंग आर्ट्स’चे शिक्षण योगेश यांनी पूर्ण केले. त्यावेळी मराठवाडा युवक महोत्सवात भारूड, गोंधळ, लोकगीत यांसारख्या लोककला स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी भरघोस बक्षीसं त्यांनी मिळवली. मग पुढील शिक्षणासाठी २००७ साली योगेश यांनी मुंबईतील ‘लोककला अकादमी’त प्रवेश मिळवला आणि त्यावेळीच योगेश यांना त्यांचा सूर गवसला. त्यावेळी सुप्रसिद्ध लोककलावंतांसोबत विद्यार्थीदशेत लोककलांच्या कार्यक्रमात योगेश सहभागी होऊ लागले.
योगेश हे मुंबईत आल्यावर फिरस्त्यासारखे कधी हॉस्टेल, तर कधी भाड्याच्या खोलीत राहिले. आश्चर्य म्हणजे, योगेश यांना मुंबईत स्वतःचं घर घ्यायला १२ वर्षं परिस्थितीशी झुंज द्यावी लागली. योगेश यांच्या लग्नानंतर तर जवळजवळ एक ते दीड वर्ष त्यांच्या हाताशी कोणतेच काम नव्हते. त्यावेळी मानसिक त्रास होत असतानाही लोककलेशी असणारी नाळ न तोडता, आजही सामाजिक काम करणार्या संघटनेच्या कार्यक्रमात योगेश तुंटपुज्या मानधनात पोटतिडकीने प्रबोधन करतात.
योगेश यांनी ‘अस्मिता’, ‘कुलस्वामीनी’ मालिकेत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्यांचे ‘कुलस्वामिनी’ मालिकेतील चिमन्ना, तर ‘विधिलिखित’ या मालिकेतील शितोळे ही नकारात्मक भूमिका खूप गाजली. तसेच, ‘वा रे वा’, ‘धिना धिन धा’, ‘प्राजक्ता’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘राजा शिवछत्रपती’ यांसारख्या मालिकांमध्ये अभिनयासह गवळण, गोंधळ, पोवाडा, भारूडांचे सादरीकरणही योगेश यांनी केले.त्यानंतर ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या रियालिटी शोमधून लोककलेंचे नवे अंग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम योगेश यांनी केले आहे. आजतागायत सोंगी भारूडाचे १५०० कार्यक्रम आणि लोककलांचे २५०० कार्यक्रम योगेश यांनी केले आहेत.
‘कडके कमाल के’, ‘रात्रीचा पाऊस’ या चित्रपटात ही अभिनेता, गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून भूमिका निभावलेल्या आहेत. योगेश यांच्या एका गीताला ‘अंबरनाथ फिल्म फेस्टिवल’चा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच, ‘सोंग्या’ नावाच्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आणि गायक म्हणून ही काम योगेश यांनी केले आहे. योगेश यांचे ‘तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला’, ‘पिंगळा’ आणि ‘उचल तुझी तलवार मराठ्या’ या गाण्यांनी समाजमाध्यमावर धुमाकूळ घातला आहे. योगेश यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या ‘जोहार’ या भारूडासाठी ‘युवा प्रतिभा पुरस्कारा’सह राज्यस्तरीय ५० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या, ‘लोककला अकादमी’त प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
शेवटी लोककलेत करिअर करण्याची भरपूर संधी आहे. कारण, भविष्यात लोकं चित्रपट, मालिका या माध्यमांना कंटाळणार असून गावगाड्यातील लोककलाच लोकांना नवी ऊर्जा देणार असल्याचेही योगेश अधोरेखित करतात. त्यामुळे “एका रात्रीत यशाची अपेक्षा करू नका. त्यासाठी खडतर प्रवास करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा,” असा संदेश योगेश तरुणाईला देतात. त्याचबरोबर भविष्यात गावगाड्यातील १२ बलुतेदार पद्धतीवर अस्सल लोककलेचा बाज असणारा चित्रपट तयार करण्याची योगेश यांची इच्छा आहे. त्याचबरोबर ‘लोककला शिक्षण संस्था’ स्थापन करण्याचा आणि लोककलेचे सत्व सांभाळून रॅपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर लोककलेला वारसा पोहोचवायचा योगेश यांचा मानस आहे. त्यामुळे शिवपाईक योगेश चिकटगावकर यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!