गेल्याच आठवड्यात आफ्रिकेतील केनियामध्ये दहा सिंहांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. प्रसिद्ध ‘अंबोसेली नॅशनल पार्क’च्या सीमेवर केनियातील सर्वांत म्हातार्या सिंहाला मेंढपाळांनी भाल्याने मारले. त्यामुळे अलीकडच्या काळात मानव-वन्यजीव संघर्षाची प्रकरणे या देशात वाढलेली दिसतात. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल, जमिनीचा बदलता वापर आणि मानवी लोकसंख्येत सातत्याने होणारी वाढ, ही या मागची मूळ कारणे.
स्थानिक पशुपालकांच्या शेतांवर वारंवार होणारे हल्ले, नासधूस यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. म्हणूनच केनियातील सर्वांत ज्येष्ठ सिंहांपैकी एका सिंहाला पशुपालकांनी ठार मारले. तसेच वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ भटकत असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली, तर संबंधित सरकारी यंत्रणा उशिरा किंवा अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे. म्हणूनच सरकारने यापुढे सक्रिय होऊन शेती आणि पशुधनाच्या रक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची स्थानिकांची मागणी आहे. दुसरीकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयांनी या शेतकर्यांना वन्यप्राणी न मारण्याची सक्त ताकीद दिली आहे. केनिया वन्यजीव सेवा यांच्या संयुक्त निवेदनात, अधिकार्यांनी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी स्थानिकांसोबत काम करण्याचे आश्वासनही दिले आहे.
नव्याने झालेल्या वन्यजीव गणनेनुसार, केनियात सिंहांची संख्या अडीच हजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे केनियातील सिंह नामशेष होण्याचा धोका निर्माण होत आहे. गेल्या २० वर्षांत सिंहांच्या संख्येत ४३ टक्के घट झाल्याचे समोर आले असून देशाच्या भूभागावरील केवळ आठ टक्के क्षेत्र सिंहांनी व्यापले आहे. आफ्रिकेत सुमारे २० हजार सिंह असल्याचे आकडेवारी सांगते. परंतु, हवामान बदल आणि अन्न आणि पाण्याची टंचाई तीव्र झाल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अशावेळी या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी ते राखीव क्षेत्रातून बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. तसेच शांततापूर्ण सहजीवनासाठी विविध अंगी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो.
नारोक, तैता-तावेता, लामू, काजियाडो आणि लाईकिपिया या केनियातील पाच कोरडवाहू प्रदेशांत मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पर्यटन मंत्रालयाच्या मानव-वन्यजीव संघर्ष नुकसान भरपाई २०२२ अहवालावर नजर टाकली असता, हे स्पष्टपणे दिसून येते. या अहवालात मानव-वन्यजीव संघर्ष प्रकारांमध्ये पिकांचा नाश (५० टक्के), मानवावरील हल्ले (२७.३ टक्के) आणि पशुधनाचा नाश (१७.६ टक्के) यांसारख्या घटनांचा समावेश होतो. सर्वात उपद्रवी प्राण्यांमध्ये हत्ती, बिबट्या आणि सिंह आघाडीवर आहेत. हत्तींमुळे पिकांची नासधूस सर्वाधिक झाल्याचे दिसून आले (४६ टक्के), तर सिंहांनी (६३ टक्के) पाळीव पशु मारल्याच्या घटना घडल्या. बिबट्या आणि हायना हे अनुक्रमे मेंढ्या (४४ टक्के) आणि शेळ्यांवर (३७ टक्के) होणार्या आणि हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत.
हे हल्ले कमी करण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, या संघर्षाला पूर्णविराम लावणे अशक्य आहे. यानिमित्ताने आपल्याला असे वाटेल की, एकेकाळी वन्य प्राण्यांना आणि निसर्गाला देव मानणारे आज त्यांच्याच जीवावर उठले आहेत. पण, खरे तर दुष्काळाने आधीच बेहाल झालेले लोक स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. परंतु, सूडबुद्धीने वन्यजीवांची हत्या करण्यापेक्षा, सहजीवन कसे प्रस्थापित करता येईल याचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. प्राणी असोत की, मानव जगण्याची आस सर्वांना आहे. परंतु, ही पृथ्वी आपल्या सगळ्यांची आहे आणि याची जाणीव मानवाने ठेवणे गरजेचे आहे.
लोकं प्राण्यांना भाला मारत असल्याच्या घटना विनाकारण हिंसक वाटत असल्या तरी, या प्रदेशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त रहिवासी पोटापाण्यासाठी पशुधनावर अवलंबून आहेत. भीषण दुष्काळामुळे पाण्यासाठी मानव आणि वन्यप्राण्यांना संघर्ष करावा लागत आहे. हिंसा हा या हवामान-संबंधित संकटाचा एक दुर्र्दैैवी परिणाम. त्यामुळे केनियातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या समस्येवर लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, यासाठी सरकारी संस्था, स्थानिक समुदाय आणि संवर्धन संस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. सक्रिय उपायांच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले पाहिजे. कारण, सहअस्तित्वातच उज्वल भविष्याचे गुपित दडलेले आहे!